*प्रा. नंदू कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रंगला*
*भावस्पर्शी… प्रेरणादायी… ऋणनिर्देश सोहळा* !
लातूर ; दि.१८ (प्रतिनिधी )- कुटुंबवत्सल, प्रेमळ ,मनमिळावू , स्नेही अजातशत्रू मित्र… ज्याचे शेकडो-हजारो जीवाभावाचे मित्र असलेला …. असा सर्वांना आपलेसे करणारा प्रा. रघुनाथ उर्फ नंदू कुलकर्णी यांच्या शासकीय सेवानिवृत्ती निमित्त आयोजित ऋणनिर्देश सोहळा भावस्पर्शी व प्रेरणादायी ठरला असेच म्हणावे लागेल. !
निमित्त होते .. पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन मधील प्राध्यापक नंदू हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा आयोजित करण्यात आलेला ऋणनिर्देश सोहळा ! यानिमित्त पी एल जी पी एल मेगा अलुमनाय असोसिएशन आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने रविवारी येथील स्वानंद मंगल कार्यालयात त्यांच्या ह्र्द सत्काराचे आयोजन करण्यात आले होते . नंदू सरांचे वर्गमित्र व पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते म्हैसूर संस्थानची प्रसिद्ध पगडी परिधान करून , सन्मानपत्र , शाल साडीचोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कार सोहळ्यानंतर गाडगीळ यांच्या मुलाखतीवर आधारित *गप्पाष्टक* हा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी आमदार सतीश चव्हाण व सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते कोरोना योद्धाचा सत्कार करण्यात आला .तसेच या कार्यक्रमापूर्वी पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व एकत्रीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास मेगा अलुमनाय असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत हिरेमठ, माजी अध्यक्ष चेतन कुलकर्णी , प्राचार्य विशाल नितनवरे , सुनील मेंढेकर, संजय जेवरीकर , महादेव मुळे , महेंद्र जोशी , प्रा. संतोष कुलकर्णी , सौ. सीमा कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी बोलताना आ. सतीश चव्हाण यांनी आपले वर्गमित्र नंदू कुलकर्णी यांच्या अनेक आठवणी सांगताना सभागृहात हास्याचे फवारे उडवले . मराठवाडा आर्थिकदृष्ट्या मागास असला तरी , मराठवाड्यात नंदू सरांसारखे मनाची श्रीमंती असलेली माणसे आहेत . शिक्षणाचे महत्त्व आम्हाला चाळीस-पन्नास वर्षापूर्वीच कळाले आहे म्हणून मराठवाड्यातील मुले – मुली विविध क्षेत्रात सर्वदूर पोहोचले आहेत असेही गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले.नंदूवर कुठलेही काम सोपवा ते काम तो यशस्वी करून दाखवतोच , असेही ते म्हणाले.
सत्कारास उत्तर देताना प्रा. नंदू कुलकर्णी भावूक झाले होते .सध्याचा काळ खूप वाईट आहे , गुरु आणि शिष्य यांचे नाते संपत चाललेले आहे, विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना प्रती आदर , स्नेहभाव राहिलेले नाही. समाजातून शिक्षकांचा सन्मान होत नाही , त्यामुळे शिक्षक खचून जात आहे. सारेच दीप लोप पावत चालले आहेत. समाजाच्या जडणघडणीत शिक्षक जमातीचे योगदान मोठे आहे. संवेदनशील विद्यार्थी निर्माण करणे ही काळाची गरज आहे , अशी अपेक्षा त्यांनी यावेळी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन कुलकर्णी यांनी केले . प्राचार्य विशाल नितनवरे , श्रीकांत हिरेमठ , अतुल ठोंबरे , भूषण खंदारे , प्रा. ओमप्रकाश झुरळे , आदींनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जेवरीकर व निर्मला थोरमोठे यांनी केले .