डॉ. प्रिया निघोजकर यांच्या ‘गोंदणखुणा’ या पुस्तकाचे नुकतेच पुण्यातील ‘मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रकाशन करण्यात आले . त्यानिमित्त राजहंस प्रकाशनाच्या या पुस्तकाचा हा परिचय.
००००
- रजनीश जोशी
प्रत्येकाच्या मनात, अंतःकरणात कितीतरी गोष्टी दडलेल्या असतात. आयुष्यातील विविध घटना-प्रसंगांनी घर केलेलं असतं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये रुजलेल्या आठवणी गोंदणखुणांसारख्या अमीट राहतात. त्यात कधी हूरहूर असते, कधी त्यांचा पुनःप्रत्यय हवाहवासा वाटतो. डॉ. प्रिया निघोजकरांनी आपल्या आत स्वतःला निरखताना उमटलेले शब्द रेखले आणि त्यातून ‘गोंदणखुणा’ हे पुस्तक आकाराला आले. या पुस्तकातील छोटेखानी ललितलेख सुटे सुटे वाचले होतेच, पण त्याचे एकत्रित ग्रंथरूप अधिक भिडणारे झाले आहे. या ललितलेखांच्या वाचनाने लेखिकेचा स्वतःशीच सुरू असलेला संवाद वाचकाच्या अंतर्मनात पोचतो, हे या लेखनाचे वैशिष्ट्य आहे, असं म्हणता येईल.

‘प्रेमपूर्ण मधू बाल्य अहा ते!’, ‘सौंदर्याच्या नव नव लीला’, ‘मानवतेचे महन्मंगल गाणे’ आणि ‘स्वानंदाच्या ‘त्या’ रानात…’ अशा शीर्षकांनी या ललितलेखांची विभागणी पुस्तकात करण्यात आली आहे. डॉ. प्रिया यांचं बालपण खेड्यात गेलं. तिथं टिपलेले अनुभव त्यांनी सहजतेनं जिवंत केले आहेत. ‘गुंजा’, ‘सागरगोटे’, ‘मेंदी’, ‘रांगोळी’तून ते प्रकटले आहेत. ‘दीपमाळे’तील कवी शंकर रामाणींच्या ‘तमाच्या तळाशी दिवे लागले’चा आधार घेऊन म्हणायचे तर नानाविध अनुभवांच्या नवेपणानं प्रियाताई उजळून निघाल्या आहेत, असे वाटते. जो स्वतःच सुंदर असतो, त्याला सगळी सृष्टी ‘सौंदर्यमयी’ वाटायला लागते. प्रिया यांनी ‘सौंदर्याच्या नव लीला’ अत्यंत अगत्याने न्याहाळल्या आहेत. झाड, पानं, फुलं, आकाश, खारूताई, पाऊस, पानगळ; इतकंच नाही तर निसर्गातील प्रत्येक घटकात दडलेलं सौंदर्य त्यांनी रसिक वाचकांना उलगडून दाखवलं आहे. चांगलं काही वाचल्यानंतर अंतःकरणात उमटणारे तरंग ‘गोंदणखुणा’त ठायी ठायी दिसतात. दुर्गा भागवतांच्या ‘ऋतुचक्र’ आणि इंदिरा संतांच्या ‘मृद्गंध’ वाचनानंतर निसर्गाचं विशुद्ध रसपान कशाला म्हणतात ते ध्यानात येतं. इंदिरा संतांचं ‘मृदगंध’ वाचल्यानंतर दुर्गाबाईंनी लिहिलंय, ‘इतरांनी लेखण्या किती जबाबदारीनं कागदावर ठेवाव्यात हे तुमची लेखमाला वाचल्यावर जाणवतं..’ कोणत्याही लेखकाची जबाबदारी काय असते, याचं भान देणारं हे वाक्य प्रियाताईंनी अत्यंत खुबीनं उद्धृत केलं आहे. ‘गोंदणखुणा’ वाचताना वाचकांना डॉ. प्रिया यांनी हे लेखन जबाबदारीनं केलं असल्याचं निश्चितपणे लक्षात येईल.

प्रेम ही माणसाला मिळालेली अपूर्व अशी देणगी आहे. अर्थात ती प्रत्येकालाच लाभते असे नाही. गौरी देशपांडेंच्या एका पुस्तकात ‘तू माझ्याकडं नुसतं पाहिलंस आणि मला श्वासच घेता येईनासा झाला’ अशा आशयाचं वाक्य आहे. प्रेम असं श्वासनिश्वासात असतं. सहवासात असतं आणि स्मरणातही! ज्यानं प्रेमाची अनुभूती घेतली तो चिरतरूण होतो. कसल्याही वार्धक्याची बाधा त्याला होत नाही. हे जग सुंदर असल्याची खुणगाठ त्याला पटलेली असते. खरं तर प्रेम हे ‘मानवतेचे महन्मंगल गाणे’च आहे. प्रियाताईंचे या पुस्तकातील लालित्यपूर्ण लेखन जीवनावरच्या प्रेमातून अक्षरांकित झालं आहे. माणसाप्रमाणेच भवतालावर असलेल्या त्यांच्या प्रेमाच्या छटा इथे आढळतात. आनंदलहरींप्रमाणे मन सुन्न करून टाकणाऱ्या शोककारी घटनादेखील त्यांनी टिपल्या आहेत. एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेल्या, डोंगराच्या कुशीत दडलेल्या पुणे जिल्ह्यातील माळीण नावाच्या गावात, तिथल्या डोंगरात केलेल्या भटकंतीची आणि तिथं राहणाऱ्या त्यांच्या विद्यार्थिनींच्या आठवणींची चिरदाह वेदना वाचकालाही विद्ध करते. दुःख आणि आनंदाच्या हेलकाव्यांवर जीवननौकेची सफर सुरू असते. ‘गोंदणखुणा’ वाचताना वाचकांनाही आपण त्या प्रवासाचाच एक भाग आहोत, असे वाटत राहते, डॉ. प्रिया यांच्या लेखनाचे हेच यश आहे.
आरंभी कवी हेमकिरण पत्की यांनी ‘गोंदणखुणा’ निरखून त्याची वैशिष्ट्ये हळूवारपणे टिपली आहेत. चित्रकार रविमुकुल यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवणारे पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि प्रियाताईंची कन्या तनिष्का व हेमकिरणांची रेखाचित्रे हेही या पुस्तकाचे बलस्थान ठरावे. राजहंस प्रकाशनाची ही निर्मिती अंतर्बाह्य देखणी झाली आहे. वाचकाची चित्तवृत्ती बहरून टाकणाऱ्या या ‘गोंदणखुणा’ मराठी सारस्वतात मानाचं पान ठरतील, यात शंका नाही.

- रजनीश जोशी
जेष्ठ पत्रकार, सोलापूर