28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*भारत सरकारचे दोन महासंचालक लोदग्यात; बांबू इंडस्ट्रीजची पाहणी*

*भारत सरकारचे दोन महासंचालक लोदग्यात; बांबू इंडस्ट्रीजची पाहणी*

*देशातील सर्व कृषी विस्तार अधिकाऱ्यांची लोदगा येथे होणार कार्यशाळा-पाशा पटेल*मॅनेज आणि फिनिक्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य कराराच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्या अंतर्गत भारत सरकारच्या दोन महासंचालकांनी लोदगा येथे भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली आणि बांबू कार्यक्रम राबविण्याच्यादृष्टीने गांधी जयंतीचे औचित्य साधून मुहूर्तमेढ रोवली. लवकरच देशातील सर्व राज्यातील प्रमुख कृषी विस्तार अधिकारी आणि आदर्श शेतकऱ्यांसाठी हैदराबाद येथील मुख्यालयात एक दिवसाचे सेमिनार घेऊन तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी या सर्वांना लोदगा येथे आणून लोदगा पॅटर्न संपूर्ण भारतात कसा नेता येईल यावर काम करणे असा दोन दिवसाचा कार्यक्रम या भेटीदरम्यान महासंचालक डॉ. चंद्रशेखरा आणि डॉ. सौ एस ग्लोरी स्वरूपा यांनी आखला, अशी माहिती पाशा पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. 


लातूर/प्रतिनिधी – भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अधिपत्याखालील कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था अर्थात मॅनेज आणि बांबू लागवड चळवळीचे प्रणेते पाशा पटेल यांच्या फिनिक्स फाउंडेशन यांच्यात 5 दिवसांपूर्वी बांबूवर आधारित कार्यक्रम एकत्रित राबवण्याबाबतचा सामंजस्य करार झाल्यानंतर तत्परता दाखवत मॅनेजने प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली आहे. मॅनेजचे महासंचालक डॉ. चंद्रशेखरा आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाच्या महासंचालक डॉ. सौ एस ग्लोरी स्वरूपा यांनी गांधी जयंतीदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी लोदगा (जि. लातूर) येथे भेट देऊन संपूर्ण बांबू इंडस्ट्रीज, टिशू कल्चर लॅब, बांबूपासून फर्निचर निर्मिती आदी घटकांचा अभ्यास केला तसेच शेतकऱ्यांसोबत बांबूवर चर्चाही केली.        भारत सरकारच्या दोन्ही महासंचालकांचे लोदगा येथे आगमन झाल्यानंतर पाशा पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. चंद्रशेखरा आणि डॉ.सौ एस ग्लोरी स्वरूपा यांनी बांबू इंडस्ट्रीजची पाहणी केल्यानंतर सांगितले की, बांबू हा विषय राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे आहे, त्यासाठी कृषी मंत्रालय पुढाकार घेईल. बांबू उत्पादक म्हणून गाव, तालुका, जिल्हा तयार करा, भारत सरकार लागेल ती मदत करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.     

डॉ. सौ एस ग्लोरी स्वरूपा म्हणाल्या की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग महासंचालनालय आतापर्यंत फक्त 18 टक्के महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम झाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. शेतकऱ्यांप्रमाणेच महिलांचे उत्पन्न महिलांसाठीच्या रोजगारातून दुप्पट व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महिलांच्या हाताला काम द्यायचे असेल तर गावातील पिकावर गावात प्रक्रिया करणारे नवीन काही करायचे आहे. आम्हाला असे वाटायचे की बांबू मशिनरी चालवण्याचे काम फक्त पुरुषांचे आहे. मात्र, आपल्याकडे 22 पैकी मशीन चालवणारे फक्त तीन पुरुष आणि उर्वरित सर्व महिला पाहून, बांबू इंडस्ट्रीजतून आम्हाला महिलासाठी नवा रोजगार खुणावत आहे. आता महिलांसाठी नवा रोजगार शोधण्याची गरज नसून, तुम्ही तो शोधला, लोकांपर्यंत तो पोहोचण्याचे काम आम्ही देश पातळीवर घेऊन जाऊ, अशी ग्वाही डॉ. सौ एस ग्लोरी स्वरूपा यांनी दिली.यावेळी कोनबॅक चे श्री संजय करपे, श्री परवेझ पटेल, श्री अमर पटेल,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वसुंधरा शिंदे, गावचे सरपंच पांडुरंग गोमारे व परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]