नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचेही आयोजन
लातूर ;(माध्यम वृत्तसेवा):-नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने हैदराबाद मुक्ती संग्रामाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रवीण सरदेशमुख यांनी लिहिलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी होणार आहे.याच कार्यक्रमात राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच वयाची ८० वर्ष केल्याबद्दल राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास राज्याचे क्रीडा व युवकल्याण मंत्री संजय बनसोडे,माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,आ.रमेशअप्पा कराड व आ.अभिमन्यू पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रवीण सरदेशमुख लिखित या पुस्तकात हैदराबाद मुक्ती संग्रामातील १२ प्रमुख महापुरुषांचे चरित्र व लढ्याचा इतिहास वर्णन करण्यात आला आहे. बागडे यांच्या सन्मान सोहळ्यासोबतच या कार्यक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक व राष्ट्रीय विचाराने कार्य करणाऱ्या शिक्षण संस्था प्रमुखांचा सन्मानही करण्यात येणार आहे.
शनिवार दि.२८ रोजी दुपारी ३.३० वाजता दयानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी १५ मिनिटे सभागृहात स्थानापन्न व्हावे. सभागृहातील समोरील १० रांगा मान्यवरांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून त्यासाठी प्रवेशिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमास येताना नागरिकांनी कॅमेरा, मोबाईल,पाण्याची बाटली व तत्सम वस्तू आणू नयेत,असे आवाहन नवनिर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण सरदेशमुख,उपाध्यक्ष महेंद्र जोशी,कोषाध्यक्ष उमेश कुलकर्णी,कार्यवाह अशोक शिवणे,ॲड.सौ. प्रणाली रायचुरकर,सुधीर धुतेकर,शैलेश कुलकर्णी, संजय गुरव,सौ.प्राजक्ता सरदेशमुख,किशोर कुलकर्णी,उमेश सेलुकर व चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे.