सामूहिक दसरा अमृत महोत्सवाच्या ऐतिहासिक
शोभा मिरवणुकीने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले
लातूर दि.२५– अनेक वर्षापासून परंपरा असलेल्या लातूर येथील सामूहिक दसरा महोत्सव यावर्षी अमृत महोत्सव असल्याने ऐतिहासिक शोभा मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध ढोलताशा पथक, लेझीम पथक, सीआरपीएफचे जवान, घोडे, उंट, पारंपारिक वाद्यवृंदासह सहभागी झालेल्या जिवंत विविध देखाव्यांनी संपूर्ण लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. दसरा महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पंरपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवीत लातूरला साजेसा असा दसरा महोत्सव मोठ्या उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा झाला.

लातूरच्या दसरा महोत्सवाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने समितीच्या वतीने अत्यंत सुरेख नियोजन करून संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केले. आर्य समाज लातूर येथे दुपारी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी ना. बनसोडे, सीआरपीएफचे डीआयजीपी संजीव कुमारजी आणि स्वागताध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते शस्त्र पूजन आणि शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी लातूरचा ऐतिहासिक दसरा महोत्सव दरवर्षी भव्य दिव्य कसा होईल आणि दसरा मिरवणुक समारोपासाठी मैदान उपलब्ध व्हावे याकरीता आ. रमेशअप्पा कराड यांनी प्रयत्न करावेत असे सांगून उपस्थित जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या पन्नास वर्षाची परंपरा लातूरच्या सामुहिक दसरा महोत्सवाने जपली असून ही परंपरा यापुढील काळातही कायम चालू राहणार यात शंका नाही असे सांगून स्वागताध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या सोहळयाला दैदिप्यमान करण्याचा प्रयत्न केला असून आपली संस्कृती जतन करण्यासाठी यापुढेही सामुहीक दसरा महोत्सवाची परंपरा कायम ठेवू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आर्य समाज मैदान येथून सायंकाळी निघालेल्या शोभा मिरवणुकीत घोडे, उंट, लाठी, काठी, तलवारबाजी चालवणाऱ्या पन्नास हून अधिक मुला मुलींनी जागोजागी आपली कला सादर केली, बँडपथक, सीआरपीएफचे जवळपास २०० जवानाचे संचलन, अप्रतिम लेझीम पथक, पारंपारिक ढोलताशा पथक, बंजारा समाजातील वेशभूषेसह महिलांचे पथक, दीडशेहून अधिक कलावंताचे विविध देखावे सहभागी झाले होते. जळकोट येथील विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा जिवंत देखावा अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. वसुंधरा प्रतिष्ठाणच्या वतीने पर्यापुरक देखावा सादर केला. यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह रामायणातील प्रसंगावर आधारीत देखावा साकारला होता. त्याचबरोबर विविध देवीदेवतांच्या वेशभुषेतील बालक अनेकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या मिरवणुकीत लातूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक महिला पुरुष तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या मिरवणुकीत स्वागत अध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, महोत्सव समितीचे ग्रामीण अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, शहर अध्यक्ष ईश्वर बाहेती यांच्यासह इतर अनंकांनी उघड्या जीपमधून जनतेला विजयादशमीच्या निमित्ताने हात उंचावून शुभेच्छा दिल्या. एकूणच लातूर शहरात सामूहिक दसरा महोत्सवाची प्रचंड उत्साहाच्या वातावरणात निघालेली शोभा मिरवणूक ऐतिहासिक ठरली.

यशवंत शाळेच्या मैदानावर फटाक्याची आतिषबाजी करून विविध कलापथकांनी आपली कला सादर करून शोभा मिरवणुकीचा समारोप झाला. सामूहिक दसरा महोत्सव यशस्वी व्हावा यासाठी समितीच्या वतीने मेहनत घेण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रम, ध्वजारोहण शोभा मिरवणूक आणि समारोप कार्यक्रमास जयप्रकाश दगडे विष्णू भुतडा, ओमप्रकाश पाराशर, हुकुमचंद कलंत्री, धर्मवीर भारती, प्रकाश कासट, रामदास भोसले, श्रीकांत रांजणकर, संतोष तोष्णीवाल, व्यंकटेश हालिगे, शंकरराव मोरे, वैजनाथ आप्पा लातूरे, अमोल नानजकर, दिलीप कानगुडे, विजयकुमार सलगरे, महावीर काळे, गोपाळ बुरबुरे, ओमप्रकाश गोपे, सुरज व्यवहारे, महादेव खंडागळे, हनुमंत कोळेकर नितीन मोहनाळे, शिवराज पानगावे, अभिषेक पतंगे, संजय जमदाडे, राधिका पाटील, मनीषा बोळशेट्टी, योगिता ठाकूर, बाबासाहेब सूर्यवंशी, आकाश गडगळे लक्ष्मण शिंदे संदीप पुणेकर संभाजी कांबळे राजाभाऊ खंडाळे तुषार रेड्डी यांच्यासह सामाजिक, राजकीय, उद्योजक, व्यापारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, तरुण, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
