भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन

0
182

 

सबका साथ सबका विकासातून आत्मनिर्भर भारत –

केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांचे मत ः

एमआयटी डब्ल्यूपीयूत ११व्या ‘भारतीय छात्र संसदे’चे ऑनलाइन उद्घाटन

पुणे, दि.२३ सप्टेंबर:“ कोरोनाच्या काळात १०० पेक्षा अधिक देशांना जीवनरक्षक औषधे पाठवून विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाचे कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा देऊन देशाला मजबूत केले आहे. सबका साथ सबका विकास या तत्वानुसार देशातील युवकांना कार्य करावयाचे आहे.” असे मत केंद्रीय मत्स व्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी व्यक्त केले.

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी झारखंडचे राज्यपाल रमेश बायस हे होते.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री तारीक अन्वर, खासदार माणिकम तगोरे आणि राज्यसभेचे खासदार तिरूची शिवा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, प्रभारी कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि भारतीय छात्र संसदेचे समन्वयक रविंद्रनाथ पाटील हे उपस्थित होते.

भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे.

पुरूषोत्तम रूपाला म्हणाले,“ विविधतेने नटलेल्या या देशात एकता आहे. विश्वकल्याणाचे जे कार्य आहे त्याचे आम्ही वाहक आहोत ही परंपरा पुढे युवकांनी सुरू ठेवावी. कोरोनानंतर देशात उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना आम्ही केला. या संकटातून वाचविण्यासाठी ८० कोटी जनतेचे लसीकरण केले . त्याच प्रमाणे ३ हजार लॅबोरेटरीची निर्मिती केली. पुनः या देशाने दाखवून दिले की, संकटाच्या काळात संपूर्ण भारत एक असतो त्यातून संपूर्ण जगातील मानवतेला सहयोगाचे दर्शन घडविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचे कार्य करावे.”

रमेश बायस म्हणाले,“ राजकारण हे सामाजिक व आर्थिक परितर्वनाचे सर्वात मोठे साधन आहे. भविष्यातील राष्ट्रनिर्मितीसाठी नवी पिढी तयार करून समस्यांचा सामना करण्यासाठी त्यांना मजबूत करावे. त्यासाठी शिक्षित युवकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणावे. जोपर्यंत समस्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होणार नाही, तो पर्यंत त्यांचे निदान होऊ शकत नाही. त्यासाठी राजकारण हे समाजसेवेचे सर्वात सशक्त माध्यम आहे. हा देश युवाशक्तीचा असून त्यांची उर्जा राष्ट्रनिर्मितीसाठी करावी. हे सर्व शिक्षणप्रणालीच्या माध्यमातून होऊन समाजाला नवी दिशा मिळेल.”

तिरूची शिवा म्हणाले,“ हा देश वेगवेगळ्या संस्कृती व भाषांनी बनलेला आहे. त्यामुळे येथे धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता यासाठी कार्य करावे. त्याच प्रमाणे युवकांना प्रेरित करून देशाच्या प्रगतीत सहभागी करून घेऊन त्यांना राजकारणाचे धडे दयावे. डीएमकेचे संस्थापक नेहमी म्हणत असत की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळागळात जावून जनतेचे कार्य करावे. कोणत्याही देशातील परिस्थिती ३० वर्षानी बदलते. त्यानुसारच कार्य करावे. आज देशाच्या घटनेच्या आधारे या परिस्थीतीनुसार बदल करणे गरजचे आहे.”

माणिकम तगोरे म्हणाले,“देशात युवकांची संख्या अधिक असल्याने त्यांना विकास कार्यात सहभागी करून घ्यावे. आज पंचायत व लोकसभेची निवडणूक वेगळी असली तरी त्यांचे कार्य हे देश विकासाचेच आहे. त्यामुळे युवकांच्या शक्तीचा उपयोग योग्य प्रकारे करून घ्यावा. भविष्यात चांगले नेतृत्व निर्माण करण्यासाठी शिक्षित तरूणांची गरज आहे.”

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“ या देशात एकता आणि विविधता ही सर्वात सुंदर आणि मोठी गोष्टी आहे. येथे लोकसंख्या शास्त्रानुसार कार्य केले जावे. या देशातील प्रत्येक व्यक्ती अतिशय बुद्धिमान असून त्याचा उपयोग देशासाठी करावा. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी युवकांनी कार्य करावे. एमआयटीने भविष्यातील नेते तयार करण्याची सर्वात मोठी प्रशिक्षण शाळा सुरू केली आहे.”

तारिक अन्वर म्हणाले,“ देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी समर्पित वृत्तीचे नवे नेतृत्व तयार करण्याची वेळ आली आहे. आजही महात्मा गांधीजीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. देश एक राहण्यासाठी कार्य करुन मजबूत भारताची निर्मिती करावी. तसेच देशाचा ७५ वर्षाचा इतिहास पाहून नवे नियोजन करावे.देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी आहे. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या मार्गावर सर्वांना चालण्यासाठी प्रेरित करावे. तसेच, गरीबी हा या देशाला लागलेला शाप आहे. येथे दोन तृतियांश लोक द्रारिद्—य रेषे खाली आहेत. त्यामुळे त्याचे निर्मूलन करण्यासाठी युवकांनी पुढे यावे.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“राजकारणात वाटचाल करतांना शिस्त आणि चारित्र्य असावे. याच्या जोरावरच समाजकारणात यशस्वी होता येईल. शारीरिक दृष्टया मजबूत, मानसिक दृष्टया जागृत, कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि आत्मिक दृष्टया उन्नत व्यक्तीमत्व घडते. राजकारणात त्याग आणि समर्पण हे अत्यंत महत्वाचे आहे. चांगले नेतृत्व घडविण्याचे कार्य भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून केले जात आहे. *राजकारणाला अध्यात्माचा स्पर्श असावा.”

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ शिक्षित राजकारणी निर्माण करण्याचे कार्य एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होत आहे. याच माध्यमातून देशाचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे. देशातील सर्व लोकसभा, विधानसभा व महानगरपालिकांनी या पद्धतीचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था सुरू केल्यास देशात परिवर्तनाची मोठी लाट येईल. तसेच आजच्या युवकांनी वसाहतवादी मानसिकता सोडून भारतीय विचारधारा स्वीकारून ती अमलात आणावी.”

यावेळी छात्र संसदेच्या युवा प्रतिनिधी विधी पळसापुरे हिने युवकांना संबोधित केले.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण व प्रास्ताविक केले.प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्रनाथ पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here