काँग्रेसने तोंड बघून तर भाजपाने गरजू आणि पात्र
लाभार्थ्यांना विविध योजनेचा प्रत्यक्ष लाभ दिला
भातखेडा येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी आ. रमेशआप्पा कराड
लातूर दि.०५ :- काँग्रेसने आपल्या परिवाराचे आणि बगलबच्चाचेच हित साधले शासकीय योजना तोंड बघून देण्यात आल्या, मात्र केंद्रातील आणि राज्यातील भाजपा महायुती शासनाने गोरगरीब सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरू केल्या आणि जो पात्र आहे जो गरजू आहे अशा सर्वांना थेट लाभ देण्याचे काम केले असे प्रतिपादन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

लातूर तालुक्यातील मौजे भातखेडा येथील १ कोटी ३९ लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते रविवारी सकाळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी विविध वाजंत्रीच्या जल्लोषात फटाके फोडून आ. कराड यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, संगायो समिती अध्यक्ष वैभव सापसोड, अमोल पाटील, गोविंद नरहरे, सुरेखा पुरी, मारुती शिंदे, हनुमंत गव्हाणे, सचिन साबदे, पांडुरंग बालवाड, अशोक बिराजदार भातखेडा येथील सरपंच उमेश बेद्रे, उपसरपंच संगीता काळे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की काँग्रेसने वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली मात्र अनेक गावात मूलभूत सुविधाही पुरवू शकले नाहीत. उसाच्या टिपऱ्याचे राजकारण करून शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचे पाप केले. बाहेरचा ऊस आणायचा आणि कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा वाढवायचा असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तरुणांनी आपल्या हक्कासाठी विकासासाठी आणि न्यायासाठी काँग्रेसच्या आडवा आणि जिरवा या नीती विरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, भातखेडा गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देऊन नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार हे सूर्यप्रकाशा इतके सत्य असून संपूर्ण देशात, राज्यात आणि गावागावात सर्वांगीण विकास कामाचा डोंगर निर्माण करणाऱ्या, विविध ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीला जनतेने मोठे समर्थन द्यावे, साथ द्यावी असे आवाहन आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

मौजे भातखेडा येथील जनसुविधा योजने अंतर्गत २२ लक्ष रुपयाच्या सिमेंट रस्ता, आमदार स्थानिक विकास निधीतून १० लक्ष रुपयाचे रस्ता मजबुतीकरण, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून ९ लाखाचा सिमेंट रस्ता, मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत ५ लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता, पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत ६ लक्ष रुपयाच्या नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक रस्ता, दलित वस्ती सुधार योजनेतून ५ लक्ष रुपयांच्या नाली बांधकाम व सिमेंट रस्ता, तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत १० लक्ष रुपयाच्या सिमेंट रस्ता या सर्व कामाचे लोकार्पण आणि १८ लक्ष रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत इमारत बांधकाम, आमदार निधीतून १० लक्ष रुपये खर्चाचे रस्ता मजबुतीकरण, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून १५ लक्ष रुपये खर्चाचा सिमेंट रस्ता, केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत २५ लक्ष रुपये खर्चाच्या पाणी टाकीचे बांधकाम आणि पाईपलाईन, तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ४ लाख रुपयांची पाईपलाईन या सर्व कामाचे भूमिपूजन असे एकूण एक कोटी चाळीस लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजनेतून मंजूर असलेल्या भातखेडा येथील लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेअंतर्गत १८ घरकुल, ३५ शेतकऱ्यांना जनावराचा गोठा आणि संजय गांधी निराधार योजनेतून ४२ निराधारांना अनुदान मंजुरीचे पत्र आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी विक्रमकाका शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सरपंच उमेश बेद्रे यांनी आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामाची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी आदिनाथ मुळे, लक्ष्मण मुळे, रुपेश काळे, धनराज मुमाने, हनुमंत बोळेगावे, रजाक पठाण, शिवदास बेद्रे, दीपक कांबळे, रामेश्वर मुमाने यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी भातखेडा आणि परिसरातील नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.