भाजपा जाहीरनामा म्हणजे विकासाचे अधिष्ठान
आमदार संभाजी पाटील निलंगेकर
लातूर/प्रतिनिधी ः भाजपाने 2019 च्या निवडणुकीत जो जाहीरनामा प्रकाशित केला होता त्यातील सर्वच संकल्पांची पुर्तता करण्यात आली आहे. विकासाचे घोषणापत्र पुर्ण झाल्याचा अनुभव जनतेला आलेला आहे. त्यामुळेच देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असून 2024 च्या निवडणुकीचे संकल्प पत्र म्हणजे विकासाचे अधिष्ठान आहे, असे मत लातूर लोकसभा संयोजक तथा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेस भाजपा महायुतीचे लातूर मतदारसंघाचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे, आ. रमेशअप्पा कराड, लोकसभा प्रभारी किरण पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी आ. बब्रुवान खंदाडे, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपने जाहीर केलेल्या संकल्प पत्रासंदर्भात माहिती देताना आ. निलंगेकर म्हणाले की, भाजपच्या घोषणापत्रामध्ये तरूण, शेतकरी आणि महिलांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तरुणांसाठी स्टार्टअपला चालना देण्याचे काम केले जाणार आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होणार आहे. शेतकर्यांसाठी विविध नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. शेतकरी व सरकार यांच्यात थेट संपर्क स्थापित केला जाणार आहे. शेतकर्यांसाठी शेतीला पाणी हा महत्वाचा विषय असून त्या अनुषंगाने काम केले जाणार आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढावा यासाठी सरकार काम करणार असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.
आ. निलंगेकर म्हणाले की, मोदी सरकारने नारी शक्ती कायदा मंजुर केला आहे.यातून महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. देशातील एक कोटीहून अधिक महिलांना लखपती बनविले जाणार आहे. देशाच्या आर्थिक उलाढालीत आज महिलांचे प्रमाण केवळ 12 टक्के आहे.आगामी पाच वर्षात ते 25 टक्के करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून महिलांचा सहभाग वाढला तर आपण लवकरच तिसर्या क्रमांकावर पेाहोचणार आहोत. देशात मागील दहा वर्षात मुलभूत सुविधांवर मोठे काम झाले आहे. देशात महामार्गांचे जाळे विणले गेेले असून आता रेल्वेचे जाळे तयार केले जात आहे. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सरकार काम करणार आहे. आ. निलंगेकर यांनी सांगितले की, विकासाचे व्हिजन ठेवून काम करणारा व विचारांचे अधिष्ठान असणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. धर्म व संस्कृती जपण्याचे काम मोदी सरकारने केले असून या संदर्भात ठोस धोरण आखले जाणार आहे. लातूर मतदार संघाबाबत बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की, मागील दहा वर्षात जिल्ह्यात महामार्गांचे जाळे तयार झाले. रेल्वे कोच प्रकल्प कार्यान्वित झाला. खा. सुधाकर श्रृंगारे यांनी रेल्वेच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला. पाच वर्षापूर्वी लातूर येथून केवळ एक रेल्वे धावत होती आज 24 गाड्या लातूर येथून धावतात. आगामी काळात चाकूर येथे रेल्वे जंक्शन स्थापित करण्यासंदर्भात रेल्वेने निर्णय घेतलेला आहे.
कोविडसारख्या संकटात केंद्र सरकार लातूरकरांच्या पाठिशी उभे राहिले. त्यातूनच लातूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मीती झाली. समाजातील सर्व घटकांसाठी सरकारने विविध योजनांचा लाभ दिला. आगामी पाच वर्षात पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी व केंद्रीय विद्यापीठ निर्मितीसाठी आम्ही काम करणार आहोत, अशी माहिती आ. निलंगेकर यांनी दिली.
खा. सुधाकर श्रृंगारे यांनी मतदार संघात प्रचाराच्या चार फेर्या पूर्ण केल्या आहेत. 325 गावांपर्यंत ते पोहोचले असून प्रत्येक गावात पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. ठिकठिकाणी जनतेचा प्रचंड प्रतिसाद उमेदवार श्रृंगारे यांना मिळत असल्याचेही आ. निलंगेकर यावेळी बोलताना म्हणाले.