हरंगुळ बु. येथील विद्यार्थिनीच्या खून प्रकरणातील
फास्टट्रॅक कोर्ट लातूरात होऊन त्या कोर्टातील
न्यायाधीशांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातुर प्रतिनिधी : दि. १२ एप्रिल २०२४ लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. येथील भाग्यश्री सूर्यकांत सुडे ही विद्यार्थिनी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. त्या विद्यार्थिनीचा खून करण्यात आला, या खून प्रकरणाचा कसून तपास करावा, आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, ते फास्टट्रॅक कोर्ट लातूरात होऊन त्या कोर्टातील न्यायाधीशांची नियुक्ती आठ दिवसात करावी, अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली.
लातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी हरंगुळ बु. येथील विद्यार्थिनी भाग्यश्री सूर्यकांत सुडेला न्याय मिळावा म्हणून कॅन्डल मार्च काढण्यात आला त्यावेळी आयोजीत श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, भाजपा शहराध्यक्ष देविदास काळे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडीले, डी. एन. शेळके, रामचंद्र तिरुके, स्वाती जाधव, संभाजी रेड्डी, रमेश सूर्यवंशी, गणेश गोमसाळे, सचिन बंडापले, युनूस मोमीन, संजय पाटील खंडापूरकर, व्यंकट पन्हाळे, श्याम बरुरे, बालाजी कैले, श्रीनिवास शेळके, संभाजी रेड्डी आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी यलम समाज बांधव, लातूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थिनी भाग्यश्री सूर्यकांत सुडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली, तसेच महिला प्रतिनिधींनी यावेळी आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, हरंगुळ बु. येथील विद्यार्थ्यांनी भाग्यश्री सूर्यकांत सुडे यांची क्रूर हत्या झाली. सुडे कुटुंबियांच्या दुःखात मी व आपण सर्वजण सहभागी आहोत, सरकारने या घटनेची नोंद घेतली आहे. सरकार पावले उचलत आहेत, सुडे कुटुंबियांच्या भावना याच आहेत, की हे प्रकरण घडायलाच नको होते. या राज्यात महिला मुली सुरक्षित आहेत का, आपला समाज हा सुरक्षित असला पाहिजे असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, अशा घटना यापूर्वी दिल्ली, पुणे, कोपर्डीत घडल्या अशा घटनेतील आरोपीला फाशी देण्याचा कायदा महाराष्ट्र सरकारने पारीत करावा. लातूरातून पुण्याला विद्यार्थी शिकायला जातात, ही घटना घडल्यामुळे हरंगुळ बु. येथील अनेक मुलींना पालकांनी परत बोलावले आहे. प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे, पुणे येथील रायसोनी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना भाग्यश्री हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखल्या जायच्या. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुडे कुटुंबियांच्या भावना आम्ही लेखी स्वरुपात दिल्या आहेत. सुडे कुटुंबियांच्या भावनाशी आम्ही एकरूप आहोत, कुटुंबीयांच्या मनात संशय आहे, अटक झालेल्या आरोपीच्या मागे आणखी कोणी आहे का, हे पाहण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला देण्यात यावे, या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात कुठलेही राजकारण कोणी करू नये असे सांगून त्यांनी जोपर्यंत भाग्यश्री सुडे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण सुडे कुटुंबीयांसोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, विद्यार्थिनी भाग्यश्री सुडे खून प्रकरण हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घोषणा करून फास्टट्रॅक कोर्टात, हे प्रकरण चालवले जाईल त्यासाठी उज्वल निकम वकील म्हणून मिळतील, असे सांगितले. अशा घटना पुन्हा घडू नयेत ९ जुलैच्या अधिवेशनात मी आमदार अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, विधानसभेच्या पायरीवर बसू सर्व मागण्या मान्य करून घेऊ असे त्यांनी सांगितले.
आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, आमच्या लातूरच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे पुणे व लातूर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. पुणे येथे ही घटना घडणे, काळीमा फासणारे आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कानावर हे प्रकरण घातले आहे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल, वकील उज्वल निकम यांना हे प्रकरण द्यायला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी होकार दिला आहे. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे, आरोपी सुटणार नाहीत असे सबळ पुरावे आहेत, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पावले उचलली जातील सरकारवर आपण विश्वास ठेवावा, हा विषय राजकारणाशी जोडू नये, हा लातूरकरांचा विषय आहे, आम्ही सगळे सुडे कुटुंबीयांसोबत आहोत असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर भाजपा अध्यक्ष देविदास काळे, डी.एन. शेळके, स्वाती जाधव, श्याम बरुरे, रामचंद्र तिरुके यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनी भाग्यश्री सुडे हिला न्याय मिळावा अशी मागणी केली.
—