काल इर्शाळवाडी येथे मोठी दुर्घटना झाली. आणि अनेकांनी विचारणा केली ‘भाऊ’ ‘इर्शाळगड’ नेमके कुठे आहे.
जुन्या मुंबई-पुणे मार्गावर चौक गावाजवळून नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरणाच्या वरच्या बाजूला नानिवली नावाचे छोटे गांव लागते. तेथूनच पुढे इर्शाळगड आणि त्यात ठाकर वस्ती असणारी 48 घरांची वाडी आहे. तेथे ही दूरर्घटना झाली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी तब्बल अकरा तास तेथे थांबून मदत कार्याला दिशा दिली. इर्शाळगडाचा इतिहासात फारसा उल्लेख येत नाही. पण रायगड परिसरातले गडकिल्ले आणि आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता, टेहळणीसाठी आणि मुख्यत: संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर होत असावा. कारण या गडावर एक उंच सुळका आहे. शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा मुलूख घेतला तेव्हा हा गड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा, असे स्थानिक संशोधक सांगतात.
जवळच्या चौक गावाला ऐतिहासिक महत्व आहे. शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता. सतराव्या-अठराव्या शतकात चौक ही या परिसरातली मध्यवर्ती बाजारपेठ होती. बाजारपेठचे संरक्षण आणि टेहळणीसाठी इर्शाळगड महत्त्वाचा होता. चोर, लुटारू, परकीय सत्ता, दरोडेखोर यांचे नेहमीच या बाजारपेठेवर लक्ष असायचे. अशाच एका व्यंकोजी वाघ नावाचया लुटारुला नेताजी पालकर यांनी चौक पासून पाच किलोमीटरवर असलेल्या वडगाव येथे गाठले होते. आणि चकमकीत ठार केले होते. हा इतिहास आहे.
चौकमध्ये आज नेताजी पालकरांचे स्मृतीस्थान म्हणून चौथरा उभारला आहे. दरवर्षी दोन फेब्रुवारीला उंबरखिंडीतल्या लढाईची आठवण म्हणून चौक ते उंबरखिंड अशी मशाल यात्रा काढली जाते. शाहिस्तेखानाचे सरदार कार्तलबखान आणि रायबाधन यांचा शिवाजी महाराजांनी या उंबरखिंडीत पराभव केला होता. त्या लढाईत नेताजी पालकरांचाही मोठा वाटा होता. इंग्रजांच्या काळात हळूहळू दऱ्या-डोंगराचे सामाजिक महत्व कमी होत गेले. युरोपियनांनी इर्शाळगडाचा आकार पाहून त्याला “सॅडल हिल” असे नाव ठेवले. स्थानिक लोक या गडाला “जिन खोड” म्हणतात. मुंबई-पुण्याचे लोक या गडावर हमखास जात.
इर्शाळगड हा समुद्र सपाटीपासून साधारण 3700 फूट (1127 मीटर) उंचीवर आहे. हायवेवरून गडाच्या पायथ्याशी असलेल्या नानिवली गावापर्यंत रस्ता जातो. नानिवलीपासून पुढे चालत जावे लागते. साधारण 2-3 किलोमीटर पायवाटेने इथे चढत जावे लागते. हा रस्ता तसा थोडासा अवघड आहे. तासभर चढाई केल्यावर माचीवर डोंगर पठारासारख्या भागात इर्शाळवाडी आहे. तिथून साधारण शंभर मीटर उंच असा इर्शाळगड दिसतो. पायथ्याशी इर्शाळवाडी हे गाव असून तेथून गडाचा चढ सुरु होतो. तेथेच काल दूर्घटना घडली. गडाकडे येण्यापूर्वी गडाच्या दक्षिणेकडील नढाळ येथे यावे लागते व तेथून प्रथम इर्शाळवाडी गाठून मग गडावर जाता येते.
इर्शाळगड हा किल्ला माथेरानच्या दक्षिणेस आहे व पूर्वी या ठिकाणी राहणारे युरोपियन लोक किल्लयास ‘सँडल हिल’ या नावाने ओळखत होते. गडास ही नावे मिळण्याचे कारण म्हणजे किल्ल्याच्या दोन बाजूस दोन सुळके असून लांबून पाहता हा किल्ला एखाद्या अश्वासारखा दिसतो. किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी खडक फोडून पायवाट तयार करण्यात आली आहे. किल्ल्याच्या माथ्याचा चढ थोडा अवघड असून कातळारोहण करून वर जावे लागते. कडयावर पिण्याच्या पाण्याची टाकी कोरलेली दिसून येते. कडा चढतांना अवघड ठिकाणी शिडी तसेच दोरखंडाचा आधार घेऊन वर जावे लागते. वाटेत एका गुहेत गडाची देवता इर्शाळ देवीचे मंदिर दिसून येते. मंदिरात देवीची मूर्ती आणि बाजूस दोन लहान मूर्ती दिसून येतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्ये म्हणजे या किल्लयास इतर किल्ल्यांसारखी तटबंदी नाही मात्र पाण्याची एकूण सहा कोरीव टाकी आणि चार निवासी गुहा या ठिकाणी आहेत. त्यामुळे या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा. याला पुष्टी मिळते.
गिर्यारोहकांना सतत इर्शाळवाडीमध्ये चहा, जेवणाची सोय होत होती. अनेक गिर्यारोहकांना या घटनेमुळे दु:ख झाले आहे. समाज माध्यमांद्वारे अनेकांनी या वाडीचे जूने फोटो शेअर केले आहेत. असे हे इर्शाळगड आणि इर्शाळवाडी…..
गणेश मुळे , मुंबई
( साभार :फेसबुक )