———-
आषाढी एकादशीनिमित्त ‘हेचि दान देगा देवा’ या संगीतमय कार्यक्रमात साक्षात पांडुरंगाचे दर्शन
———-
लातूर ः( वृत्तसेवा ) सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित ‘हेचि दान देगा देवा’ या भक्तिमय संगीत कार्यक्रमाने दयानंद सभागृहात श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. संगीतमय कार्यक्रमाने सभागृहातील उपस्थितांना साक्षात् पांडुरंगाचे दर्शन झाले.
निवेदिता तथा अभिनेत्री विदुल बावीस्कर यांनी अतिशय ओजस्वीपणे संचलन करून कार्यक्रमात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम केले. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह प्रत्येक अभंग व गीतावर दाद दिल्याने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची संकल्पना असून, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता सांस्कृतिक विभाग सेलचे प्रमुख ॲड. शैलेश गोजमगुंडे, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग कोळगे, कार्यक्रमाचे प्रमुख पाईकराव, लातूर येथील नवोदित गायिका आसावरी बोधनकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या वेळी या कार्यक्रमाचे समन्वयक कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांसह गायकांचा सत्कार केला.
गायक रवींद्र खोमणे यांनी ‘बोला पुंडलिक वरदे’ असा जय जयकार करताच ‘जय जय रामकृष्ण हरी’ या अभंगाने सुरूवात झाली. या अभंगाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर ‘सुर नवा ध्यास नवा’ उपविजेती श्रावणी महाजन यांनी ‘सुंदर ते ध्यान, उभा विटेवरी’ या अभंगाने रंगत आणली. भक्तिमय वातावरणात ‘माझे माहेर पंढरी’ या संज्योत जगदाळे गायिकेने सर्वांना मंत्रमुग्ध केले. जवळपास तीन तास चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेत्री तथा निवेदिका विदुल बावीस्कर यांनी कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने रंगत वाढवली. त्यानंतर ‘या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिवे योगीराजांचा’ या भक्तिमय भावगीतानंतर ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिरसाने अख्खा दयानंद सभागृह रममाण झाले. त्यानंतर ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या गायक रवींद्र खोमणे यांनी अभंगाची सुरूवात केल्यानंतर सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यानंतर ‘बाजाराला विकण्या निघाली दही दुध लोणी’ या गवळणीने तर अक्षरशः सभागृह डोक्यावर घेतले. त्यानंतर ‘बोलावा विठ्ठल, सांगावा विठ्ठल’ या भक्तीगीताला श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली.
कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना ‘अहो शेजारणीनं बरं नाही केलं गं बया, मला पंढरीला नेलं गं बया’ या गवळणीला उपस्थितांकडून दाद मिळाली. ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ या भक्तिरसाने कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर लातूर येथील सिने अभिनेता रितेश देशमुख यांनी निर्मित ‘लय भारी’ या चित्रपटातील ‘विठ्ठल, विठ्ठल’ या गाण्याला सभागृहातील प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ‘अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग’ या संज्योती जगदाळे या गायिकेने गायिलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगत झाली. श्रोत्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. शेवटी उपस्थितांना गायिका व संचासह सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. अतिशय भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
——————–