प्रासंगिक
गोवा निसर्गाचे वरदान लाभलेली सुवर्णभूमी. त्या सुवर्णभूमीत (सुनापरान्त) बोरी नदीच्या काठावर वसलेले हिरवाईने नटलेले, झाडापेडांनी भरलेले संपन्न गाव. त्या गावचा अभिमान असणारे बोरकर नेहमी म्हणतय या बोरीचे गाव नाव लेऊन मी मिरवतो आहे.
हिरवळ आणिक पाणी तेथे मजला सुचती गाणी असे म्हणणारे बोरकर निसर्गप्रेमी तर होतेच परंतु निसर्गात रमलेले ते एक रगेल व रंगेल व्यक्तिमत्त्व. घरात मुलामुलींचा गोंगाट असूनही त्यांची काव्यतंद्री कधी भंगली नाही. रस्त्यावरून जाताना ते कविता गुणगुणत जात. भास्कर रामचंद्र तांबे यांचा आदर्श जोपासणारे व वसा चालवणारे बोरकर. बडोदे येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक पोरसवदा तरुण जातो आणि आपल्या कवितागायनाने सारा आसमंत दुमदुमून सोडतो. त्याला पाहून भा. रा. तांबे यांनी हा मुलगा सरस्वतीचे वरदान घेऊन आलेला आहे आणि तो साहित्यसृष्टी गाजवून सोडेल असे भाकित केले होते. लहानपणापासूनच अभंग ओवीचा छंद जोपासणारे बाकीबाब. तरल मनाचे. त्यांचे सौंदर्यावर खूप प्रेम.
त्यांनी बहुतेक कविता अष्टाक्षरी छंदात लिहिल्या. अगदी लहानपणी त्यांनी एक अभंग लिहिला. त्यांच्या घरात परवचा म्हणण्याची परंपरा होती. संतांचे अभंग प्रत्येकाने म्हणायचे तेही मुखोद्गत. त्या दिवशी बाकीबाबची पाळी होती. त्यांनी स्वतःच एक अभंग रचला आणि संत जसे आपली नाममुद्रा अभंगाच्या शेवटी उमटवतात तसे बाकी म्हणे असे आपले नाव त्यांनी आपल्या अभंगात गुंफले व तो अभंग सायंकाळी सादर केला. त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारी आज्जी मात्र त्यांच्यावर रागावली. असे संतांचे अभंग चोरून आपले नाव त्याखाली घालण्याचा वात्रटपणा कधी करू नको असे बजावले. मात्र ती काव्य प्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते सतत कविता गुणगुणत त्यामुळे त्यांच्या अनेक कविता त्यांना मुखोद्गत असतं. त्यांनी कविसंमेलनातून कधीही हातात कवितेचा कागद घेतला नाही.
त्यांनी गद्य साहित्य लिहिले तरी तें कवी म्हणूनच ख्यात झाले. कवी म्हणून असल्याचा त्यांना अभिमान होता. कुणाचा फोन आली ते मोठ्या अभिमाने म्हणत ‘पोएट बोरकर स्पीकिंग‘ ‘पावला पुरता प्रकाश’ हा लेखसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. बोरकर एरव्ही कुटुंबवत्सल कवी. त्यांच्या कन्या भारती हेबळे आबांच्या म्हणजे बाकीबाबच्या आठवणी सांगताना सद्गद होतात. त्यांचे पुतणे डॉ. घनश्याम बोरकर हेही प्रतिभावान आहेत.
खणखणीत कवितावाचन हा त्यांचा गुणधर्म. त्यांचे बहुतेक कवितासंग्रह मराठीतच आहेत. माझ्या मराठी भाषेचा मला बहु अभिमान असे असलेतरी त्यांचे कोकणी भाषा प्रेम सर्वश्रुत आहे. पोर्तुगीज भाषा त्यांना अवगत होतीच. निसर्गाप्रमाणेच शृंगारिकता त्यांना आवडे. त्यांची जपानी रमलांची रात्र ही कविता त्यासाठीच प्रसिध्द आहे. त्यांच्या कवितांतून निसर्ग भरभरून वाहतो आहे. निळ्या रंगाची त्यांना ओढ. निळे निळे पाखरू सकाळच्या गं पारा नुपुर बांधुनी गं आले माझ्या दारा ही त्यांची कविता गोवात सदैव दिसणाऱ्या खंड्या किंवा किंग फिशरवर आधारित आहे. ते उत्तम खवय्ये होते. कोणाही नातेवाईकाकडे गेले की बिनधास्त खाण्याच्या गप्पा रंगत.
कुडचडे येथे आजोळी त्यांचा जन्म झाला. तेही गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. १९३० त १९४५ या कालावधीत गोव्यात विविध ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. महात्मा गांधींवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. गांधी वधानंतर त्यांनी महात्मायन नावाचे काव्य लिहिले. कविवर्य रवींद्रनाथ टागोरांबद्दल त्यांना नितांत आदर. त्यांना गीतांजलीचे मराठी रुपांतर करायची इच्छा होती. मात्र ती अपूर्णच राहिली. मात्र आनंदयात्री रवींद्रनाथ हे चरित्र त्यांनी लिहिले.
आकाशवाणीवर काम करताना त्यांना जितेंद्र अभिषेकी बुवा भेटले. त्यांनी बाकीबाबच्या अनेक कवितांना चाली लावून ती गाणी अजरामर केली आहेत. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी हे त्यांचे अजरामर गीत. त्याशिवाय झिणझिण वाजे बीन, चढवू गगनी निशाण, बोला कुणाकुणाला हवे याशिवाय नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती अशी कितीतरी गाणी आहेत.
बाकीबाब म्हणजे निसर्गाला पडलेले रमणीय स्वप्नच होते. ते स्वतः गाऊन कविता सादर करीत. त्यांच्या कवितेत जात्याच गोडवा व लय होती. तू गेल्यावर ही कविता अतिशय हृद्य आहे. मनाला चटका लावते. आपली पत्नी थोड्या काळासाठी माहेरी गेल्यावर घराची अवस्था कशी होते. त्याचे हे वर्णन आहे.
प्रतिभा, जीवनसंगीत, दूधसागर, आनंद भैरवी, चित्रवीणा, आदी त्यांचे मराठी कवितासंग्रह. मात्र त्यांचे सासाय, चैत्रपुनव, गीताय आदी कोकणी कवितासंग्रह देखील प्रसिध्द आहेत. त्यांनी विपुल मराठी साहित्य लिहिले तरी त्यांना कोकणी कवितासंग्रहासाठीच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
कवितेशिवाय त्यांनी प्रियदर्शनी, समुद्राकाठची रात्र हे कथासंग्रह, मावळता चंद्र, अंधारातील वाट व भावीण आदी कादंबऱ्याही लिहिल्या. असे जरी असले तरी ते प्रामुख्याने कवी म्हणूनच ख्यात होते.
आज ३० नोव्हेंबर त्यांची जयंती. त्यानिमित्त त्यांना अभिवादन.
लेखन:डॉ. प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ,गोवा
९०११०८२२९९