माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची ग्वाही
निलंगा (प्रतिनिधी ) :- ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असुन गावागावांत निवडणुका लढविण्यासाठी पॅनल उभे करण्याची तयारी होत आहे. गावच्या विकासाला चालना मिळावी आणि गावातील एकोपा कायम राहावा याकरीता ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा असे आवाहन करून बिनविरोध ग्रामपंचायतीना विकास निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
निवडणुक आयोग प्रशासनाकडुन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या असुन त्यासाठीचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत निलंगा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील ६८, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ११ तर देवणी तालुक्यातील ८ ग्रामपंचायत अशा एकुण ८७ ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकासाठी आता ग्रामस्तरावर तयारी सुरू झालेली असुन वेगवेगळे पॅनल उभे करून निवडणुक लढविण्यात येणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून होणारे राजकारण यामुळे निर्माण होणारे गटातटातील वाद परिणामी गावातील एकोपा भंग होण्याची भिती निर्माण होत असल्याचे सांगून माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी गावाच्या विकासाकरीता सर्व गावक-यांनी एकत्रित बसून एक विचारांने निवडणुकाबाबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या माध्यमातून होणारे राजकारण आणि निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी एकमत करावे अशी अपेक्षा माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी व्यक्त केली.
निलंगा मतदारसंघाअंतर्गत होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून गावातला एकोपा कायम ठेवत विकासाला चालना देण्यासाठी गावक-यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. ज्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणार आहेत. त्या ग्रामपंचायतीना विकास निधीची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही यावेळी माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी दिली. बिनविरोध निघणा-या ग्रामपंचायतींना तात्काळ विकास कामाच्या निधीची मंजूर करण्यात येईल असा विश्वास यावेळी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.
एक महिन्याच्या आत १० लाखांचा निधी
बिनविरोध ग्रामपंचायतींना एक महिन्याच्या आत १० लाख रूपयांचा विकास निधी देणार असल्याची घोषणा यावेळी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. या निधीच्या माध्यमातून गावांतील प्रमुख ५ विकास कामांची यादी तयार करून ती कामे पूर्ण होण्यासाठी या १० लाख रूपयांच्या निधीचा वापर करण्यात यावा असे आवाहन यावेळी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.