जगातील पहिल्या बांबूपासून 30,000 लिटर क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा नागार्जुना ग्रुप बरोबर करार: माजी आ.पाशा पटेल
लातूर, प्रतिनिधी
जगातील पहिल्या बांबूपासून 30,000 लिटर क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा नागार्जुना ग्रूप बरोबर लातूर जिल्ह्यातील लोदगा बांबू इंडस्ट्रीज सोबत शुक्रवारी हैद्राबाद येथे सामंजस्य करार झाला. या करारावर लोदगा बांबू इंडस्ट्रीज च्यावतीने माजी आ पाशा पटेल व नागार्जुना ग्रुपच्यावतीने डॉ. बनिब्राता पांडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. बांबू पासून दररोज तीस हजार लिटर क्षमतेची इथेनॉल निर्मिती करणारी रिफायनरी ही जगात पहिल्यांदाच बनणार असल्याची माहिती माजी आ पाशा पटेल यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
नेदरलँड, फिनल्यांड व भारत या तिन्ही देशांच्या सहकार्याने जगातील पहिल्या बांबूपासून दररोज दोन लाख क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाची उभारणी भारतात आसाम राज्यातील नुमालिगड येथे ऑगस्ट 2022 मध्ये होत आहे. पाच लाख टन बांबू पासून वार्षिक सहा कोटी लिटर इथेनॉल निर्माण करण्याचे ध्येय नुमालिगड मधील आसाम बायो रिफायनरी प्रकल्पाचे आहे. या प्रकल्पामध्ये लागणारी 99% मशिनरी ही भारतीय बनावटीची असून त्यातील बहुतांशी मशिनरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तयार होत आहे. परंतु यासाठी लागणाऱ्या परकीय तंत्रज्ञानासाठी जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा खर्च लागला आहे. आसाम मध्ये उभा करण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन 2017 मध्ये झाले आहे, असे पाशा पटेल म्हणाले.
पाशा पटेल पुढे म्हणाले की, “नुमालिगड येथील रिफायनरी प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यापासून मला मनोमन वाटायचे की आपल्या भारतात लहान आकाराची व देशी तंत्रज्ञान असलेली रिफायनरी आली तर या प्रकल्पामुळे आपल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. मध्यंतरी माझी भेट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर चे प्रमुख केजीपी रेड्डी यांच्याशी झाल्यानंतर समजले की आयआयसी बेंगलोर आणि नागार्जुना ग्रुप मिळून बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे पायलट प्रकल्प उभे करून चाचणी करत होते. त्याचवेळी मी या प्रकल्पाला वेळोवेळी भेटी दिल्या असून त्यांच्या या प्रकल्पाच्या चाचण्या यशस्वी झाल्याचे दिसून आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि नागार्जुना ग्रुप यांनी केलेल्या प्रयोगाअंती दररोज तीस हजार लिटर क्षमतेची दीडशे टन बांबूपासून 65 कोटी रुपये गुंतवणुकी मध्ये पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून वार्षिक पंधराशे एकर बांबूमधून हा रिफायनरी प्रकल्प चालवता येऊ शकतो. अशा पद्धतीचे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ डॉ.बनिब्रता पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर च्या साह्याने सिद्ध केले आहे.”
आपण गेली चार वर्षापासून या दोन्ही संस्थेच्या सक्रिय सानिध्यात असून त्यांच्या प्रयोगाचे निष्कर्ष पाहून मनस्वी आनंद झाल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की,” मेरा किसान अन्नदाता है, लेकिन अब ओ ऊर्जा दाता भी बनने वाला है.” जमिनीच्या पोटातील डिझेल, पेट्रोल आणि कोळसा जर जाळला तर पृथ्वी वरील मानवजात संपुष्टात येणार आहे. म्हणून पोटातील न जाळता पाठीवरचा म्हणजेच शेतातल्या वस्तू पासून ऊर्जा निर्माण करावी. न्यूयॉर्क मधून शुक्रवारी प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार अठरा वर्षानंतर पृथ्वीवर भूक, गरीबी, महापूर, महारोग, महा दुष्काळ याचे थैमान घातले जाईल. हे संकट जर थांबवायचे असेल तर पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. 1 किलो ग्रॅम कोळसा जाळला तर 2.8 किलोग्राम कार्बन तयार होते आणि 1 लिटर पेट्रोल जाळले तर 3 किलो ग्रॅम कार्बन तयार होते. म्हणून शेतातील बांबूपासून इथेनॉल तयार करून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतील फ्लेक्स इंजिनची गरज भविष्यात बांबू पासून तयार होणाऱ्या इथेनॉल मुळे पूर्ण करता येईल, असेही पटेल म्हणाले.
भारतात सुमारे साडे आठ लाख कोटी रुपयांचे डिझेल आणि पेट्रोलची आयात केली जाते. आता ही आयात न करता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या सहकाऱ्याने आणि सहकाराचा माध्यमातून संपूर्ण देशभरात बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभे राहतील, अशाच तंत्रज्ञानाचा शोध आम्ही गेली अनेक वर्षापासून घेत असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा एप्रिल मध्ये लोदग्याला येणार असून त्यांच्या भेटीदरम्यान. नुमिलगड रिफायनरीचे सीएमडी नेदरलँड, फिनल्यांड, भारत यांच्या सहकाऱ्याने तयार होत असलेल्या रिफायनरीचे तसेच नागार्जुना ग्रुपचे डॉ बनिब्राता पांडे, फर्टिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व लोदगा बांबू इंडस्ट्रीज च्यावतीने अमितजी शहा यांच्यासमोर बांबूपासून इथेनॉल निर्मितीबाबत प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. या दरम्यान पाशा पटेल व डॉ पांडे देशाच्या बांबूपासून इथेनीलचा धोरणासंदर्भात अमितजी शहा यांना प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा हे धोरण मान्य करतील अशी अपेक्षा पाशा पटेल यांनी व्यक्त केली आहे.
नागार्जुना ग्रुप आणि लोदगा बांबू इंडस्ट्रीज यांच्यात शुक्रवारी झालेल्या करारानुसार सुरुवातीला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, बिहार आदी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रतेकी एक इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारण्याचे मान्य करण्यात आले आहे, असे पाशा पटेल यांनी सांगितले. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना कॉलबॅक संस्थेचे संचालक संजीव करपे, जिओ लाईफ अॅग्रोे चे विनोद लाहोटी, तेलंगणाचे शेतकरी रवी पाटील आदींची उपस्थिती होती.