जय जवान जय किसान आणि डॉ. शिवाजीराव पाटील
निलंगेकर सहकारी साखर
हे दोन्ही कारखाने ट्वेंटीवन शुगरकडे भाडेतत्त्वावर
महाराष्ट्र राज्य बँकेचा निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
लातूर प्रतिनिधी : गुरूवार दि. ३१ मार्च २०२२ :
लातूर जिल्ह्यात सध्या बंद असलेले निलंगा तालुक्यातील डॉ. शिवाजीराव पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि चाकूर तालुक्यातील जय जवान जय किसान शेतकरी सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने ट्वेंटीवन शुगरला दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील जय जवान जय किसान हे साखर कारखाने मागच्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहेत. थकित कर्ज वसुली व्हावी आणि कारखानेही चालू व्हावेत म्हणून महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने हे कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेऊन मागे अनेक वेळा त्यासाठी निविदा काढली होती, परंतु त्यासाठी फारसे कोणी पुढे आले नव्हते, दरम्यान हे कारखाने मांजरा परिवाराने चालवावेत म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं कडून विनंती होत होती. या पार्श्वभुमीवर मांजरा परीवाराने यासाठी पूढाकार घेतला आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे शिवाय एकरी ऊस उत्पादनही वाढले आहे, त्यामुळे ऊस तोडणी कार्यक्रम खूपच पुढे गेला आहे, माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या दूरदृष्टीतून उभारणी झालेल्या आणि माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख तसेच आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखाने दीड ते दुप्पट कार्यक्षमतेने सुरू आहेत, चालू गळीत हंगामात या परिवारातील आठ साखर कारखान्यांनी आजवर ४३ लाख मॅट्रिक टन एवढ्या उसाचे विक्रमी गाळप केले आहे, असे असले तरी जिल्ह्यात आणखीन मोठ्या प्रमाणात गाळप अभावी ऊस शिल्लक आहे, जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत असे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जाहीर करून नुकताच शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बँकेने अंबुलगा आणि नळेगाव येथील साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची निविदा काढले असता जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आग्रह आणि त्यांचे हित लक्षात घेऊन सदरील कारखाने चालू करण्याच्या दृष्टीने ट्वेंटीवन शुगरने त्यासाठी निविदा दाखल केली होती. अगदी गुणवत्तेच्या कसोटीवर ही निविदा मंजूर झाले असून हे दोन्ही कारखाने आता मांजरा परिवारात दाखल झाले आहेत. अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि नळेगाव येथील जय जवान जय किसान साखर कारखाना मांजरा परिवारात सहभागी होऊन चालू होणार, कार्यक्षेत्रातील उसाचे वेळेत गाळप होऊन या ऊसाला समाधानकारक भाव मिळणार हा विश्वास आता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा निर्णय कळताच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा होत आहे,
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दोन्ही कारखान्यात
मशनरी पूजन करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार
—विजय देशमुख
अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आणि नळेगाव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना ट्वेंटीवन शुगर मार्फत आगामी वर्षात गाळप करणार असून, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी दाम्पत्याच्यां हस्ते मशनरी पूजन करून मेंटेनन्सच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती ट्वेंटीवन शुगर चे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांनी दिली आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्यासह मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्याचे पदाधिकारी तसेच कारखाना परिसरातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शनिवार दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना मशिनरीची पूजा होईल त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता नळेगाव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याच्या मशनरीची ऊस उत्पादक शेतकरी दांपत्याच्या हस्ते पूजा होईल, या कार्यक्रमास कारखाना परिसरातील प्रमुख पदाधिकारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित राहतील, अशी माहिती ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांनी दिली आहे, आगामी वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता आहे हे लक्षात घेऊन कारखाने लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने हे मेन्टेनन्स यांचे काम हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले
———————-