औसा (प्रतिनिधी)
5 डिसेंबर 1963 रोजी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे यवतमाळ जिल्ह्यातील तांड्यावरचे नाईक असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. नंतर त्यांनी 11 वर्ष सलग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्य करीत महाराष्ट्र राज्यामध्ये हरितक्रांती व्हावी आणि कृषी क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडावा म्हणून अथक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना हरितक्रांतीचे जनक असे म्हटले जाते. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बंजारा समाजातील तांड्यावरील नाईकांनी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीसाठी प्रयत्न करावे आणि तांड्यावरचे नाईक म्हणून समाजासाठी प्रामाणिकपणे काम करावे याची प्रेरणा मिळावी म्हणून औसा येथे गोर सिकवाडी
कटीमाळी म्हणजे बंजारा समाजाचा जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्ह्यातील तांड्यावरच्या नाईकांचा पारंपारिक शेला व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कन्हेरी तांडा येथील विद्यार्थिनी प्रियंका राठोड या विद्यार्थिनीने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल आणि विश्वनाथ राठोड यांनी आदर्श नाईक म्हणून काम केल्याबद्दल त्यांचाही या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री मोतीराज राठोड, आशिष चव्हाण, ॲड.दिलीप राठोड, दीपक राठोड, अशोक चव्हाण, बालाजी राठोड, सुभाष राठोड सेवानिवृत्त तहसीलदार एल टी चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रारंभी बंजारा समाजातील महिलांनी पारंपारिक बंजारा वेशभूषा मध्ये गीत सादर करून मेळाव्यातील उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या मेळाव्यासाठी लातूर जिल्ह्यातून शेकडो बंजारा बांधव आणि महिला पारंपारिक बंजारा वेशभूषा मध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर पवार यांनी केले.