बँकातून नोकर भरती करा मागणीसाठी ‘एआयबीईए ‘चे दीर्घ आंदोलन
कॉ. धनंजय कुलकर्णी यांची पत्रकार परिषदेत माहिती
लातूर;दि.24( वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षापासून केंद्र शासनाच्या मालकीच्या असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया सह बारा राष्ट्रीयकृत बँकातून शिपाई, क्लार्क व सफाई कर्मचारी या तिन्ही संवर्गातील नोकर भरती टप्प्याटप्प्याने कमी कमी करत जवळपास नगण्य करण्यात आलेली आहे. या नोकरभरती वरील अघोषित बंदीच्या विरोधात इंडिया बँक एम्प्लॉयमेंट असोसिएशन च्या वतीने संपाचे हत्यार उपसण्यात आले असून दीर्घ आंदोलन छेडण्यात येणार आहे ,अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्लाँईज फेडरेशनचे समन्वयक कॉ.धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली

4डिसेंबर पासून वेगवेगळ्या टप्प्यावर बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत .यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील कर्मचारी ४ डिसेंबर रोजी संपावर जाणार आहेत. बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया मधील कर्मचारी ५ डिसेंबर रोजी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया स्ट्राइक मध्ये कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील कर्मचारी ६ डिसेंबर रोजी संपावर जाणार आहेत .तसेच इंडियन बँक अँड यु सी ओ बँक मधील कर्मचारी 7 डिसेंबर रोजी , युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी ८ डिसेंबर रोजी आणि 11 डिसेंबर रोजी सगळ्या खाजगी बँकेतील कर्मचारी संपावर जाणार आहेत.
2 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू ,केरला ,आंध्र प्रदेश ,तेलंगणा ,कर्नाटक ,पांडिचेरी ,अंदमान अँड निकोबार व लक्षदीप येथील कर्मचारी संपावर जाणार आहेत. 3 जानेवारी रोजी गुजरात ,महाराष्ट्र, गोवा, दादर दमन आणि दिव येथील कर्मचारी संपावर जातील. 4 जानेवारी रोजी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि चंदीगड येथील कर्मचारी संपावर जाणार आहेत. 5 जानेवारी रोजी दिल्ली, पंजाब, हरियाणा ,जम्मू अँड काश्मीर, लडाख ,उत्तराखंड ,हिमाचल प्रदेश येथील बँकातील कर्मचारी संपावर जातील. 6 जानेवारी रोजी वेस्ट बेंगॉल ,ओडिसा ,बिहार ,झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर ,अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथील कर्मचारी संपावर जातील, अशी माहिती धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि सर्व सरकारी बँकात बहुमतात असलेल्या संघटनेच्या गुहाटी आसाम येथे सप्टेंबर 2023 दरम्यान संपन्न झालेल्या कार्यकारणी सभेत संमत झालेल्या ठरावानुसार संघटनेने सरकारी राष्ट्रीयकृत बँकातील नोकर भरती या प्रश्नावर प्रदीर्घ आंदोलनाची घोषणा केलेली आहे. ही नोकर भरती लिपिक ( क्लार्क ) शिपाई व अंशकालीन सफाई कर्मचारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आहे. गेल्या काही वर्षापासून केंद्र शासनाच्या मालकीच्या असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया सह बारा राष्ट्रीयकृत बँकातून क्लार्क, शिपाई व सफाई कर्मचारी या तीनही संवर्गातील नोकर भरती टप्प्याटप्प्याने कमी कमी करून जवळपास नगण्य करण्यात आलेली आहे. नोकर भरतीवरील या अघोषित बंदीमुळे एकीकडे अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्यावर कामाचा बोजाही वाढला असून, त्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन त्यांचे’ वर्क लाइफ बॅलन्स’ (कामकाज आणि कौटुंबिक सामाजिक आयुष्य यातील संतुलन) संबंधीचे प्रश्न निर्माण होत आहेत दुसरीकडे केंद्र सरकार आपली प्रत्येक योजना सरकारी बँका मार्फत राबवत असल्याने सामान्य माणसाचा बँकेचे संबंध जोडला गेलेला आहे. या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या ग्राहक संखेला समाधानकारक सेवा देणे अपुऱ्या कर्मचाऱ्यांना अशक्य होत आहे. ग्राहक सेवा व वित्तीय समावेशकही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत.
बँकांच्या सेवा आणि व्यवहार यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा (डिजिटलायझेशन ) वापर होत आहे यामुळे व्यवसाय वाढला आहे. ग्राहक संख्या वाढली म्हणून कर्मचाऱ्यांची पूर्वीसारखी आवश्यकता नाही हा व्यवस्थापन ,सरकारचा दावा असत्य आणि दिशाभूल करणारा आहे .कारण एकीकडे आजही सर्वसामान्य बँक ग्राहक बँकांच्या शाखेत येऊन व्यवहार करण्यास प्राधान्य देणारा आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणारे फ्रॉड आणि आवश्यक तंत्रज्ञान या आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यामुळे बँकेच्या काउंटरवर असणारी गर्दी कायम आहे. शिपाई ,सफाई कर्मचारी यासंवर्गातील नोकर भरती तर पूर्णतः थांबलेली आहे व या कर्मचाऱ्यांनी करावयाची कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून केली जात आहे .हे लोन आता लिपिक क्लार्क संदर्भातील लागू होत आहेत. लिपिक वर्गाचे करावयाची असंख्य कामे आउट सोर्स केली जात आहेत .त्यामुळे फाँडसचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच ग्राहकांच्या हितास बाधा येत आहे. विविध संवर्गातील नोकर भरती जवळपास थांबल्यामुळे आजमितीस 12 सरकारी बँकातून दोन लाख रिक्त जागा असताना केवळ सात ते आठ हजार लिपिकांची भरती केली जात आहे. शिपाई व सफाई कर्मचाऱ्यांची पदे संपुष्टात आणली गेली आहेत .त्याच्या परिणामी पदवीधर तरुण-तरुणीसाठी उपलब्ध असलेल्या बँकेतील नोकरीच्या संधी संपुष्टात आलेल्या आहेत आणि आज मितिला 10.40% इतक्या भयावह प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण असलेले देशात ही अतिशय गंभीर बाब समजली पाहिजे ,अशी अशी टीकाही कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
