एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात विविध उपक्रमातून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा जन्मदिन साजरा
लातूर दि.०३. – माईर्स् एमआयटी पुणे या शिक्षण संकुलाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा जन्मदिन लातूर येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. दि. ३ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सुरक्षा पंधरवडयाचा शुभारंभ करण्यात आला.

गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेले, शून्यातून विश्व निर्माण करणारे एमआयटी शिक्षण समूह पुणे आणि विश्वशांती केंद्र आळंदी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड साहेब यांचा ३ फेब्रुवारी ८२ व्या जन्मदिन यानिमित्ताने एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय लातूर आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सुरक्षा पंधरवडयाचा शुभारंभ एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य एन. पी. जमादार, उपप्राचार्य बी. एस. नागोबा, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, मानव संसाधन अधिकारी श्री. ऋषिकेश कराड, प्रशासकीय संचालिका डॉ. सरिता मंत्री, रुग्णालय अधिक्षक डॉ. चंद्रकला डावळे, डॉ. वर्षा कराड आदि मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

मोफत सर्व रोग निदान व उपचार आरोग्य सुरक्षा पंधरवाडा याबरोबरच यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत मधुमेह तपासणी शिबिर, महिलाकरिता आयोजित कर्करोगाची तपासणी, लहान बालकात आढळून येणाऱ्या थँलेसिमिया रुग्णांची तपासणी व उपचार शिबिर आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८५ जणांनी रक्तदान केले. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात आयोजित मोफत सर्व रोग निदान व उपचार आरोग्य सुरक्षा शिबिराचा पहिल्याच दिवशी सर्व प्रकारच्या रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला हे शिबिर सलग पंधरा दिवस सुरू राहणार आहे. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व प्रकारच्या रूग्णांना दिवसभर नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था रूग्णालयाच्या वतीने करण्यात आली होती.

या सर्व विविध कार्यक्रमास डॉ. अरुणकुमार राव, डॉ. सचिन भावठाणकर, डॉ. गजानन गोंधळी, डॉ. राजेंद्र मालू, डॉ. विद्या कांदे, डॉ. मीना सोनवणे, डॉ. संजीवनी मुंडे, डॉ. शिल्पा दडगे, डाँ. बी. डी. आडगावकर, डॉ. आशा पिचारे, डॉ सौ. कुलकर्णी, डॉ. महेंद्र बिक्कड, डॉ. शैला बांगड, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, रुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे, मधुकर गुट्टे, मारुती हत्ते यांच्यासह रूग्णालयातील सर्व अधिकारी,विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

आरोग्य सुरक्षा पंधरवाडा निमित्ताने सर्वसामान्य शस्त्रक्रिया हाडांच्या शस्त्रक्रिया, प्रस्तुती सेवा व सिजर शस्त्रक्रिया, कुटुंबकल्याण, कान, नाक, घशावरील सामान्य शस्त्रक्रिया, छातीचे आणि त्वचेचे आजार व उपचार या सर्व पूर्णपणे मोफत असून सिटीस्कॅन, मुतखड्यावरील आणि कॅन्सर वरील शस्त्रक्रिया, मेंदू रोग तपासणी व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया, मणक्याच्या शस्त्रक्रिया, यकृत जठर तपासणी व शस्त्रक्रिया, व्यंधत्व तपासणी व उपचार, कॅन्सर पीडित रुग्णांसाठी वेदना निवारण, प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग व मधुमेह उपचार, भौतिक उपचार, दुर्बिणीद्वारे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया माफक दरात करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा रुग्णांना देण्यात येत असून या रुग्णालयात ७५० बेड उपलब्ध आहेत. एक्स-रे सोनोग्राफी सिटीस्कॅन एमआरआय डायलिसिस स्वतंत्र विभाग पीआयसीयु, आयसीयू, एनआयसीयु, सुसज्ज १२ ऑपरेशन थेटर्स अद्यावत प्रयोगशाळा २४ तास अपघात विभाग आणि रक्तपेढी आदी सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत.
