विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल जवळगा बेट ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्कार
पेठसांगवी, ता. उमरगा, ता. २३( प्रतिनिधी) : जवळगा बेट ता.उमरगा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उमेश खोसे, अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने डी.लीट पदवी मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. महेश मोटे तर जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांचा ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी (ता. २१) रोजी ग्रामपंचायत परिसरात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी माजी चेअरमन सुरेशअप्पा वाडीकर, माजी सरपंच संतरामअण्णा बिराजदार व रामानंद मुकडे यांच्या हस्ते तिघांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.लक्ष्मी सुरेश झाकडे होत्या. या प्रसंगी नूतन तलाठी सौ.अश्विनी मारेकर या रुजू झाल्याबद्दल तर एन.पी. बेंबळीकर हे येथून त्यांची बदली झाल्याबद्दल त्यांचाही गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, उपसरपंच सचिन वाडीकर,सुरेश झाकडे,प्रा.भरत मारेकर,माजी सरपंच प्रभाकर बिराजदार, अँड. शिवाजी बिराजदार, ग्रामसेवक एस. पी. नंदर्गे, बालाजी गायकवाड, पत्रकार दिनेश पाटील, उमेश सुरवसे, राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक डी. बी. जाधव, पुणे येथील नवनीत प्रकाशनचे सचिन पाटील, कृषी सहाय्यक प्रशांत जाधव,प्रभाकर गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना उमेश खोसे यांनी पुरस्काराचा उपयोग निश्चितच माझ्याकडून अधिक चांगले शैक्षणिक काम करण्यासाठी होणार असल्याचे सांगितले आणि हा पुरस्कार मी विद्यार्थ्यांना अर्पण केला आहे, असे स्पष्ट केले. डॉ. महेश मोटे यांनी अशा प्रकारच्या सत्कारामुळे अधिक चांगले काम करण्याला प्रेरणा व बळ मिळते. मी या सत्काराला आयुष्यभर पात्र राहण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. अश्विनी मारेकर, किशोर औरादे, सचिन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड म्हणाले की, ज्या समाजात सद्गुणांचा सत्कार होतो त्या समाजाचे भवितव्य उज्वल असते. त्यासाठी समाजाचा योग्य कार्यास सक्रिय पाठिंबा मिळावयास हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शिवाजी कवाळे तर आभार संतराम बिराजदार यांनी मानले यावेळी ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.