लातूर: दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. अजय महाजन यांच्या ३४ वर्षापासून सुरु असलेल्या सेवापूर्ती निमित्त, महाविद्यालयात सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयप्रकाश दरगड होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ मिलिंद माने, पर्यवेक्षक प्रा हेमंत वरुडकर आणि उमाकांत झुंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयातील दैनंदिन अध्ययन-अध्यापना सोबत प्रा. डॉ. अजय महाजन यांनी नवीन आणि वेगळ्या पद्धतीने विज्ञान प्रसारासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख प्राचार्य दरगड यांनी केला. तसेच उत्तम शैक्षणिक कार्य असल्यामुळेच महाजन यांना शासनाचा आदर्श पुरस्कार आणि इतरही अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले, असेही सांगितले.
सत्कार मूर्ती प्रा. डॉ. अजय महाजन यांनी शिक्षक कधी निवृत्त होत नसल्यामुळे, कुतूहल निर्माण करून, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, वृद्धिंगत करण्यासाठी सेवापूर्ती नंतरचा वेळ व्यतीत करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सत्कारमूर्ती महाजन यांचा सपत्निक आणि यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. मिलिंद माने, प्रा. हेमंत वरूडकर यांनीही महाजन यांच्या कार्याचा गुणगौरव करून आठवणी सांगितल्या.
याप्रसंगी निवृत्त प्राचार्य आणि लातूर विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष क. हे. पुरोहित आणि पुणे येथील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ तथा स्तंभ लेखक डॉ. उमेश प्रधान यांचे महाजन यांच्या कार्याबद्दल आलेले शुभ संदेश वाचून दाखवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब सरवदे तर आभार प्रदर्शन प्रा. हवा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डी. एम. सूर्यवंशी, प्रा. कैले. प्रा. मांदळे, प्रा अमोल सांजेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सेवापूर्ती कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
फोटो ओळ: निरोप समारंभ कार्यक्रमात प्रा. डॉ. अजय महाजन यांचा यथोचित सत्कार करताना प्राचार्य डॉ जयप्रकाश दरगड. व्यासपीठावर डावीकडून सूत्रसंचालक प्रा. भाऊसाहेब सरवदे, प्रा हेमंत वरुडकर, डॉ मिलिंद माने, डॉ. संगीता महाजन, प्रा. उमाकांत झुंजारे