भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रा. किरण पाटील यांच्या
विजयासाठी नियोजनबद्ध परिश्रम घ्यावेत
निवडणूक प्रचार प्रमुख आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे आवाहन
लातूर दि.२२ – मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असून भाजपाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करून भाजपाचे उमेदवार प्राध्यापक किरण पाटील यांच्या विजयासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन निवडणूक प्रचार प्रमुख आ राणा जगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.
मराठवाडा शिक्षक मतदार संघातील भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचार नियोजनाची बैठक भाजपाच्या लातूर येथील संवाद कार्यालयात झाली त्यावेळी आ. राणा पाटील बोलत होते यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते प्रवीण घुगे, प्रदेशाचे शैलेश लाहोटी, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी आ. राणा पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना आ. राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत इतर पक्षातील अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने ऊर्जा, ताकद आणि वेगळं चैतन्य निर्माण झाले आहे. केंद्रात आणि राज्यात आपले डबल इंजिनचे सरकार असल्याने न्याय मिळेल या आशेने सरकारसोबत राहण्याची भूमिका शिक्षक मतदारांची आहे त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय हा निश्चित आहे.
देशाची पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक कल्याणकारी निर्णयामुळे शिक्षकासह सर्वसामान्य जनतेत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे असे सांगून आ. राणा पाटील म्हणाले की येणाऱ्या काळातील निवडणुकीसाठी या शिक्षक मतदार संघातील निवडणुकीतील विजय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घ्यावेत आणि प्रा. किरण पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत असे बोलून दाखवले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला घरी बसवण्याचा निर्णय मतदारांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही दरोडेखोराची संस्था आहे पैशाच्या जोरावर काही विकत घेण्याचा प्रयत्न करतात मात्र ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना ते विकत घेऊ शकत नाहीत.
शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना न्याय देणारे सरकार राज्यात आल्याने परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. तेव्हा भाजपाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी आणि राणा जगजीत सिंह पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या निवडणुकीत बहुमताने विजय हस्तगत करावा असे आवाहन आ. कराड यांनी केले.
प्रारंभी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील जिल्हा प्रचार प्रमुख रामचंद्र तिरूके यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून जिल्ह्यातील प्रचार नियोजनाची सविस्तर माहिती दिली या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्ध प्रमुख चंद्रकांत कातळे यांनी केला या बैठकीस भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.