त्यागमुर्ती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेला मुदतवाढ; रूग्णांना मोठा दिलासा
लातूर दि. ०५– एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गोर गरीब सर्वसामान्यांसाठी सुरु केलेल्या त्यागमुर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेला दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असल्याची घोषणा एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांनी केली असून या योजने अंतर्गत दत्तक घेतलेल्या हजारो कुटूंबातील रुग्णांना आरोग्याच्या सुविधा मोफत दिल्या जात असल्याने सर्वसामान्य जनतेला खुप मोठा दिलासा मिळत आहे.
अनेक जण वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असताना हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेकांना उपचार घेता येत नाहीत ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन सतत संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना व गरजू रुग्णांना आरोग्याच्या बाबतीत आधार देता यावा, गोरगरीब वंचित आणि गरजू लोकांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांनी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजना गेल्या १ जानेवारी २०१९ पासून सुरू करून लातूर ग्रामीण भागातील ७२ हजार कुटुंबांना दत्तक घेतले असून ३ लाखाहून अधिक लोकांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे.
श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेचे ज्या कुटुंबांना कार्ड मिळाले अशा कुटुंबातील रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी ७०० खाटांच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील जवळपास ४२५ तज्ञ डॉक्टरांचा समूह २४ तास तत्पर असून रुग्णांना सर्व सामान्य आरोग्य सुविधेपासून सुपरस्पेशालिटी पर्यंतच्या सर्व आरोग्य सेवा अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्त्, लघवी तपासणी, एक्सरे व सोनोग्राफी तपासणी, सर्वसामान्य् शस्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया, कान-नाक-घशावरील शस्त्रक्रिया, छातीचे आजार, त्वचेचे आजार व उपचार, कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत केल्या जात आहेत. तसेच प्रसुतीसेवा आणि प्रसुती शस्त्रक्रिया सुविधा औषधींसहित मोफत दिली जात आहे.
अतीदक्षता विभाग (आय.सी.यु.), नवजातशिशु अतीदक्षता विभाग (एन.आय.सी.यु.), सिटी स्कॅन, एम.आर.आय. स्कॅन, मुतखड्यावरील शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार व शस्त्रक्रिया, मेंदुरोग तपासणी, उपचार शस्त्रक्रिया, यकृत व जठररोग तपासणी व उपचार शस्त्रक्रिया, दुर्बिणव्दारे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण तपासणी व उपचार, प्लॅस्टीक सर्जरी, ह्रदयरोग व मधुमेह उपचार, आदी आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रिया माफक दरात करण्यात येत आहेत. दात साफ करणे, दात काढणे, दातामध्ये चांदी व सिमेंट भरणे, कवळी बसवणे, आवश्यक रक्त तपासण्या आदी सुविधा पुर्णपणे मोफत दिल्या जात असून पक्के व कृत्रिम दात बसवणे, मुख व शल्य चिकीत्सा उपचार, दाताच्या विविध आजारावरील उपचार, वेड्यावाकड्या दातांवरील उपचार, क्ष-किरण अत्याधुनिक उपचार, दातावरील इतर उपचार या योजने अंतर्गत माफक दरात केले जात आहेत.
या योजने अंतर्गत दत्तक घेण्यात आलेल्या कुटूंबातील असंख्य् रुग्णांवर यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात दररोज उपचार करण्यात येत असून आरोग्यासाठी होणारा वाढता खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. हा खर्च हलका झाल्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळत असून आरोग्याचे उपचार मोफत होत असल्याने सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रु पहावयास मिळत आहेत. ज्या भागात आपण जन्मलो, वाढलो त्या भागाचे आपल्याला काही देणे लागते, माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्याच्या कामी यावे याच भूमीकेतून आणि आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांनी आरोग्य सेवेचे चांगले काम हाती घेतले आहे. श्रीमती प्रयाग अक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेला मुदत वाढ दिल्याने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
——————————————————————–