भाजपा बूथप्रमुखांना प्रभू श्रीराम मूर्तीचे
आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते वाटप
लोकसभेला लातूर ग्रामीणमधून बहुमताचा विक्रम करावा
लातूर दि.२५ :- अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झाले असून ही किमया देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामुळे झाली आहे. अशा नेतृत्वाला खंबीर साथ देण्यासाठी येणाऱ्या लातूर लोकसभा निवडणुकीत सर्वांनी जिद्दीने जोमाने काम करून भाजपा उमेदवाराला प्रचंड मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर झाले, मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली, अनेकांचे स्वप्न सत्यात उतरल्याने देशभर आनंद उत्सव साजरा करण्यात आला यानिमित्ताने श्रीरामाची घरातही पूजा व्हावी याकरिता भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सर्व बूथ प्रमुखांना पितळ धातूची प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट देऊन मिठाई वाटप केली. लातूर येथील संवाद कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपाचे नवनाथ भोसले, वसंत करमुडे, अॅड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, श्रीमंत नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बूथप्रमुखाशी संवाद साधताना भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, बूथ प्रमुख ही जबाबदारी छोटी नसून खूप मोठी आहे. बूथ प्रमुखांनी पक्षाच्या आदेशानुसार बुथप्रमुखांनी प्रभावीपणे काम करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्याशी सातत्याने संवाद करावा. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्यांना बारा बलुतेदारांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा एकूणच प्रत्येकानी आपले बुथ मजबूत करावे.

राम राज्य आणण्याचे काम भाजपा नेतृत्वाने केले असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आणि राज्यातील महायुती शासनाने घेतलेल्या विविध निर्णयाची माहिती देऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विक्रमी मताने निवडून आला पाहिजे. त्यात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असावा याकरिता सर्व बूथ प्रमुखांनी मताधिक्य वाढविण्याचा संकल्प करावा असेही आवाहन आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

प्रारंभी नवनाथ भोसले आणि अॅड. दशरथ सरवदे यांनी कार्यकर्त्यांना मान सन्मान देणारे भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड आहेत असे सांगून त्यांच्या माध्यमातून गावागावात वाडी तांड्यात झालेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. बूथ प्रमुखांनी ५०% पेक्षा अधिक मतदान मिळावे यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.