स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि विचार अनेकांचे आयुष्य पार बदलून टाकते. तरुण वयात जर स्वामीजींचे विचार वाचले व ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाचे वेगळेच मर्म आपल्याला जाणवायला लागते. विवेक गिरिधारी असाच प्रबोधिनीचा कार्यकर्ता. पुणे येथील VIT अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना तो रामकृष्ण मठाच्या संपर्कात आला. दर सुट्टीत तो वडिलांचे नौकारीचे गाव असणाऱ्या नाशिकला जाताना स्वामींच्या ग्रंथावलीचे एक दोन खंड घेवून जात असे.सुट्टीचा पुरेपूर उपयोग तो विवेकानंद विचार समजून घेण्यात करत असे.त्यातून आपल्या आयुष्यात केवळ आपल्यासाठी जगणे म्हंजे व्यर्थ,आपले जीवन उदात्त अशा काही कामात समृद्ध केले पाहिजे या विचारांचा पाया त्याचा पक्का झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्याने पत्रकारीतेचा अभ्यास केला. वर्तमान पत्र वाचण्यात आणि बातम्या,संपादकीय समजून घेण्यास विवेकला भारी आवडे. याच काळात त्याची ओळख नीता ओसवाल आणि कांचन जहागीरदार या दोघींशी झाली. त्या ज्ञान प्रबोधिनीच्या प्रचिती गटाच्या सदस्य. विवेकनी ज्ञान प्रबोधिनीत यावे यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. योग्य वेळ आल्यावर मी प्रबोधिनीत येईल असे त्यावर त्याचे उत्तर होते. पुढे योगायोगाने अच्युतराव पटवर्धन यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी विवेक प्रबोधिनीत आला. अशी व्याख्याने तो नित्यनेमाने ऐकत असे. जोशातील तरुणाई विचारांच्या कुशीत घडवली तर काही तरी कृतार्थ काम आपल्या आयुष्यात होते यावरील विश्वास विवेकचा वाढत होता.
प्रबोधिनीत आल्यावर त्यांनी पहिले काम केले ते आद्य संचालक कै आप्पासाहेब पेंडसे यांचे चरित्र विकत घेवून वाचून काढले. त्याचा परिणाम असा झाला की विवेक प्रबोधिनीच्या वातावरणात रमू लागला. प्रबोधिनीचे मनुष्य घडणीच्या प्रकियेत अभ्यास दौऱ्यांचे खासे महत्व. अशा अभ्यास दौऱ्यातून अनेकांचे विचारविश्व विस्तारित होतात तर भावनाविश्व समृद्ध होतात. प्रचितीच्या माध्यमातून अशा अनेक अभ्यास दौऱ्यांचे नियोजन केले जायचे. विवेकानंद केंद्राचे पूर्वांचल मधील काम समजून घेणे. नानाजी देशमुखांचे ग्रामीण विकासाचे काम, रामकृष्ण मिशन यांचे रांची मधील आणि छत्तीसगडमधील काम. अशा अनेक भागात विवेक अभ्यास दौऱ्यात जाऊ लागला. छत्तीसगडच्या अभ्यास दौऱ्यात त्याचे यायचे तिकीट काढलेले नव्हते. इतर गटाचे मात्र ते आधीच आरक्षित करण्यात आलेले होते. त्यामुळे विवेक पुढे जबलपूर मार्गे श्री राम गोडबोले यांचे काम पाहण्यास गेला. त्यावेळे पासून रामभाऊ आणि त्याचे विशेष ऋणानुबंध जुळले.
रांची येथील विकास भारतीच्या श्री महेश शर्माशी त्यांची भेट त्याच्या आयुष्यात कलाटणी देणारी होती. महेश शर्मा जयप्रकाश नारायणांच्या चळवळीतील कार्यकर्ते. आंदोलना नंतर त्यांनी ग्रामीण भागात कामाला सुरुवात केली. त्यांनी सहज विवेकला विचारले,
“पुढे जाऊन तू काय करणार ?”
विवेकने सहज उत्तर दिले,“ सहा महिने ग्रामीण भागात काम करणार !”
“सहा महिन्यात तुला फक्त गावाची तों ओळख होईल. ग्रामीण भाग समजून घ्यायचे असेल तर तुला निदान दोन वर्षे तरी काम करावे लागेल. त्या नंतर खऱ्या अर्थाने तुला समज येईल.”
महेश शर्मांशी विवेकचा झालेला हा संवाद भविष्याची एक वेगळीच उभारणी करत होता. गेली तीस वर्षे विवेक ग्रामीण भागात काम करतोय आणि अनेक आघाड्यांवर लढतोय. अनेक विषय हाताळतोय. अनेकांना प्रेरणा देतोय.
अनेक अभ्यास दौरे,अभ्यास शिबिरे यांच्यासोबतच आंदोलनातील सहभागातून पण व्यक्तिविकास होत असतो असे प्रबोधिनी मानते. ज्ञान प्रबोधिनीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हजारे यांच्या १९९४ मधील भ्रष्टाचारा विरुद्धच्या जनआंदोलनात प्रबोधिनीने मला अण्णासाहेबांचे स्विय सहाय्यक म्हणून दायित्व दिले होते. अण्णांच्यासोबत आळंदी मुक्कामी होतो. त्यांच्या सोबत राहत असताना एक वेगळीच प्रेरणा मिळाली व मी आयुष्याची वेगळी वाट निवडली. माझ्या नंतर विवेक अण्णांचा स्विय सहाय्यक होता. या नंतर मात्र विवेकची आणि माझी चांगली मैत्री होण्यास सुरुवात झाली. कन्याकुमारी आणि अरुणाचल प्रदेशहून महाराष्ट्रात काही काळासाठी आलो की विवेक गिरिधारी, योगेश झोपे,सुबोध कुलकर्णी असे खास मित्र भेटत असत. त्यांच्याशी मनातले बोलता येत असे. आम्ही एकमेकांशी बोलून आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करत होतो. विवेकने या काळात प्रबोधिनीत काम करण्याचे ठरवले. तसा मनोदय त्यांनी विवेक कुलकर्णी सरांना सांगितला. त्याला अपेक्षा होती की छात्र प्रबोधनच्या कामात त्याला सहभागी केले जाईल. प्रत्यक्षात मात्र त्याला कार्यवाह सुभाषराव देशपांडे यांना भेटायला सांगितले. येथून विवेकच्या ग्रामीण भागातील कामाची सुरुवात झाली.

वेल्हे की शिवापूर या दोन ठिकाणी काम करता येणार होते. शिवापूरला राहण्याचे-जेवण्याची व्यवस्था होती. प्रबोधिनीचे आधी तिचे काम पण होते. वेल्ह्यात मात्र ह्या सुविधा नव्हत्या. दोन खिंडीच्या पलीकडे असलेला वेल्हा तालुका म्हणजे तोरणा आणि राजगडच्या पायथ्याशी असणारा शिवप्रदेश. विवेकनी ठरवून ह्या मागास भागात काम करायचे ठरवले. त्याला पहिले वर्षभर वीस गावांचे सर्वेक्षण करण्याचे सांगण्यात आले. गावात जायचे ओळखी काढायच्या, लोकांना भेटायचे, स्वतःचे जेवण कुणाकडे तरी लाऊन घ्यायचे, कुणाच्यातरी घरी मुक्काम करायचा. रोज नवीन गाव,नवीन ओळख,नवीन लोक. उमेदीत असताना असे जीवन जगल्याने एक वेगळीच कणखरता येते.१९९५ ते २००५ अशी दहा वर्षे विवेक वेल्हे तालुक्यातील वेगवेगळ्या गावात भाड्याची खोली घेवून राहायचा. तिथेच जेवायचा दिवसभर वेगवेगळ्या प्रकल्पांचे काम करून पार दमून जाऊन खोलीवर झोपायचा. कित्येक दिवस त्याचे पुणे दर्शन नसायचे. हळूहळू त्याला परिसराची ओळख व्हायला लागली. प्रश्न कळायला लागले. लोकमानस समजायला लागले. प्रबोधिनीचे काम करणे हे पण तो समजून उमजून घेत होता. मा. सुभाषरावांच्या मार्गदर्शन त्याला वेळोवेळी मिळत होते. स्वच्छता गृह नाही, कित्येक दिवस वीज नाही, पावसाळ्यात प्रचंड पडणारा पाऊस आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई हे सगळी जिवंत प्रश्न अनुभवल्यावर त्याचे कार्यक्षेत्र नक्की होत गेले.
ज्ञान प्रबोधिनी मध्ये असणाऱ्या नैसर्गिक संसाधन विभागाचा तो सध्या विभाग प्रमुख आहे. पाणलोट क्षेत्र विकास, पिण्याच्या पाण्यासाठी झरे विकास प्रकल्प, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आणि फेरो सिमेंटच्या टाक्या,सौर दिवे अशा विविध दिशांनी प्रबोधिनीचे काम वेल्हा भोर आणि आता मुळशी याच्या सोबतच महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु करण्याचे प्रयत्न विवेकचे चालेलेले असतात. लग्न होई पर्यत तो आपल्या कार्यक्षेत्रात राहिला.लग्नानंतर तो फक्त रविवारी पुण्यात येई तर उन्हाळ्यात तो पूर्ण काळ कार्यक्षेत्रात असे. वेदवती म्हणजे त्याच्या मुलीचा जन्म झाल्यावर तो आता थोडा जास्त काळ पुण्यात स्थिरावतो आहे.
प्रबोधिनीने या काळात वेल्हा-भोर तालुक्यात मोठे परिवर्तन केले. ३६ गावात पाण्याच्या विहिरी. चाळीसच्यावर गावात पाण्याच्या टाक्या. काही हजार घरात सौर दिवे. आजच्या घडीला वेल्हे भोर तालुका टँकर मुक्त झाला आहे. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. आता कामाची सुरुवात अधिक अवघड अशा जावळीच्या खोऱ्यात सुरु झाली आहे. विवेक आता आम्हा सर्वाना पाण्याच्या कामात मोलाची मदत करतो. ज्ञानापासून आर्थिक व्यवस्था लाऊन धरण्याचे कौशल्य अफलातून आहे. त्याचा संपर्क प्रचंड आहे. फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील अनेक स्वयंसेवी संस्थांशी त्याचे मैत्र आहे. त्यांना वेळोवेळी तो मदत करत असतो.मुळचा मराठवाड्यातील असल्याने त्याचे मराठवाडा प्रेम खासच आहे. आजच्या घडीला त्याच्या सोबत विभागात आठ जण काम करतात.
कार्यकर्ता प्रतिसादी,जबाबदार,कल्पक आणि आपल्या सारखे अनेक कार्यकर्ते निर्माण करणारा असावा असे प्रबोधिनीचे आद्य संचालक म्हणतात. ज्ञान प्रबोधिनीचे संस्कार तरुण वयात आणि प्रबोधिनीच्या शाळेत शिक्षण न घेता पण संक्रमित होऊ शकतात. त्यातून एक उमदे सामाजिक नेतृत्व विकसित होते. ते स्वतःचे व्यक्तिमत्व सामाजिक उत्तरदायित्व सांभाळत अधिक विकसित करू शकते. तीस वर्षे जीव तोंडून काम करून आता अनेकांना कामासाठी प्रेरणा देणारे होऊ शकते असे विवेककडे पाहिले की वाटते. स्वतःचा वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस न साजरा करणारा विवेक म्हणजे प्रबोधिनीच्या विकासकामाचा अविरत झरा आहे.

प्रसाद चिक्षे ,अंबाजोगाई