- वर्षा ठाकूर घुगे
लातूर ( वृत्तसेवा )-मी मराठवाड्यातील पहिली महिला उपजिल्हाधिकारी आहे.मी प्रशासनात आले,त्यावेळी प्रशासन हे पूर्णपणे पुरुष प्रधान होते.मी पहिली महिला प्रांत,पहिली मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लातूर जिल्ह्याची पहिली महिला जिल्हाधिकारी असल्याने ,प्रत्येक वेळी पहिलीच असल्याने केवळ व्यक्तिशः माझ्यासाठीच नाही तर प्रशासनात पुढे येणाऱ्या महिलांच्या दृष्टीनेही मला स्वतःला प्रत्येक ठिकाणी यशस्वी अधिकारी म्हणून सिध्द करावे लागले,असे मनोगत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी व्यक्त केले. त्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलत होत्या.विशेष म्हणजे त्या स्वतःही या पुस्तकातील एक कथा नायिका आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधताना प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर काम करीत असतानाचे विविध आव्हानात्मक प्रसंग सांगून स्वतःवर असलेल्या विश्र्वासामुळे , वरिष्ठ अधिकारी,सहकारी आणि जनतेचे प्रेम यामुळे त्या त्या प्रसंगांवर कशी मात करता आली,विविध उपक्रम कसे यशस्वी करता आले आणि करता येत आहे हे सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की,स्त्रीला यशस्वी होण्यासाठी तिच्या माहेर च्या आणि विवाहानंतर सासरच्या मंडळींचा पाठींबा असण्याची नितांत गरज जरी असली तरी प्रथमतः स्त्री ने स्वतःचे ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे.

या वेळी बोलताना प्रा गणेश घुगे यांनी आजचा विद्यार्थी हा पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाढत असल्याने पालकांनी त्यांना समजून घेण्याची गरज प्रतिपादन केली.न्युज स्टोरी टुडे पोर्टल हे अतिशय सकारात्मक काम करीत असल्याबद्दल त्यांनी पोर्टल चा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी प्रा डॉ अंकलीकर, डॉ अर्चना बजाज,शिवाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ उषाताई भोसले,ज्येष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे आदींची समयोचीत भाषणे झाली.
प्रारंभी पुस्तकाचे लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद करून एकच महिन्यात पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत वाचकांचे आभार मानले.तर प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी महिलांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन लिखाण केले पाहिजे,अशी अपेक्षा व्यक्त केली.