लातूर : मानवी जीवनात वावरताना प्रत्येक व्यक्तीने आपल्यापरीने चांगले काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण समाजातील गरजूंची शक्य एवढी मदत करण्याचे धोरण अंगीकारूनच आपण खऱ्या अर्थाने समाजहित साधू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा यांनी केले.
लातूर येथील अभिनव मानव विकास शिक्षण संस्थाद्वारा संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयात हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पन्नालालजी सुराणा बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुराणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, उपाध्यक्ष सीए तेजमलजी बोरा, रामप्रसाद राठी, सोमाणी, सुभाष कासले , अतुल देऊळगांवकर, मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन करताना पन्नालालजी सुराणा पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबरच आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजातील विविध घटकातील नागरिकांचा विचार करून चालले पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन स्वतःसोबतच आपल्या सहकाऱ्यांचा, देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. चांगले काम करायचे असेल तर आपण स्वतः चांगले वागले पाहिजे. आपले शरीरस्वास्थ चांगले राहील याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. समाजात वावरताना संवेदनशीलता जपणे खूप गरजेचे आहे. आपली प्रत्येक कृती इतरांसाठी प्रेरणादायी राहील, यादृष्टीने कायम चांगले वागण्याचा, समाजाची सेवा करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार तथा पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगांवकर यांनी सुराणा यांचा परिचय करून दिला. पन्नालालजी सुराणा हे ज्ञानाचे चालते बोलते मुक्त विद्यापीठ असून त्यांच्याकडे सर्वच विषयांचे परिपूर्ण ज्ञानाचे भांडार असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र घडविणाऱ्या मोजक्या लोकात पन्नालालजी सुराणा यांचे स्थान अग्रस्थानी असल्याचे सांगून देऊळगांवकर यांनी अशा या महान व्यक्तिमत्वाची आपल्याला साथ लाभली ती अत्यंत मौल्यवान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सुराणा यांनी श्रीकिशन सोमाणी विद्यालयातील शिक्षकांशी संवाद साधून त्यांनाही यथोचित असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, सौ. सुनीता जाधव, राहुल पांचाळ यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षिकांनी परिश्रम घेतले. —————–