लातूर : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून येथील पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिरात एकूण १६५ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ. अशोक पोद्दार यांनी दिली.
पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. वर्षातून किमान सहा ते सात मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जाते, हे विशेष. आजचे हे शिबीर १४४ वे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे खा. डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अति.पोलीस अधिक्षक अजय देवरे,आयएमएचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, डॉ. कल्याण बरमदे,डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. इमरान कुरेशी आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी लोकनेत्याच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. या सर्वांचे स्वागत पोद्दार हॉस्पिटलचे संचालक डॉ.अशोक पोद्दार यांनी केले. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती आणि पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून नियमितपणे अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केले जाते. या महान नेतृत्वामुळेच लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याच्या भावना वैद्यकीय समस्त डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते. डॉ.अशोक पोद्दार यांनीच लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा नवा वैद्यकीय सेवा पॅटर्न कार्यान्वित करण्याकामी पुढाकार घेतला, हे सर्वज्ञात आहे. आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रातही ते कायम कार्यरत असतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद खऱ्या अर्थाने जोपासण्याचे काम डॉ.अशोक पोद्दार आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने सातत्याने करत असतात.

यावेळी बोलताना खा. डॉ.शिवाजी काळगे यांनी डॉ. पोद्दार यांनी मोफत आरोग्य विषयक शिबिराच्या आयोजनात सातत्य राखल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करुन आज समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकातील नागरिकांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी डॉ. पोद्दार आपल्या सर्व सहकाऱ्यांसह प्रयत्नशील असतात, असे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. अशोक पोद्दार यांच्या मोफत आरोग्य शिबिराविषयी सर्वांना आकर्षण असल्याचे आपण ऐकून होतो. आज त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याचे त्यांनी सांगितले. अति. पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी अशा प्रकारच्या आरोग्य विषयक शिबीरांचा आदर्श राज्य व देशभरातील डॉक्टरांनी घ्यायला हवा असे मत व्यक्त केले.डॉ. अशोक पोद्दार यांनी यावेळी बोलताना अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग व तपासणी शिबिरांच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रुग्णांची सेवा करण्याची संधी आपणास मिळते,असे सांगितले. भविष्यातही आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने अशा प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाचे देणे लागतो. अशा प्रकारच्या शिबीराच्या माध्यमातून आपण समाज ऋणातून अंशतः उतराई होण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या गाजलेल्या भाषणांच्या चित्रफित उपस्थितांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिरात एकूण १६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १११ रुग्णांच्या हाडांची ठिसूळता तपासण्यात आली. ४९ रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले. ३२ रुग्णांची रक्त तपासणी तर ९० रुग्णांची फिजिओथेरपी करण्यात आली. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रुग्णांसाठी विविध औषधी कंपन्यांच्या मेडिकल रिप्रेझेंटिटीव्हनी उपलब्धतेनुसार ७ ते १० दिवसांची मोफत औषधे उपलब्ध करून दिली.