माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त
लातूर : माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोद्दार एक्सीडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर व दिशा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरात १८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे १३६ वे मोफत अस्थिरोग शिबीर होते. तर माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेले हे १५ वे शिबीर होते. एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्तिगत पातळीवर मोफत शिबिरांचे आयोजन करण्याकामी डॉ.अशोक पोद्दार नेहमीच आघाडीवर असल्याचे दिसून येते. आ. अमित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आजच्या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते झाले.

यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष एड. किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी युवा नेते अभिजित देशमुख, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, माजी उपमहापौर कैलास कांबळे, डॉ. चेतन सारडा, डॉ. विश्रांत भारती ,डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रसाद जोशी, बालाप्रसाद सारडा, प्रसाद उदगीरकर, रामेश्वर सोमाणी, श्याम धूत आदींची उपस्थिती होती. धन्वंतरी पूजनाने या अस्थिरोग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटल परिवाराच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी मोफत आरोग्य शिबीर म्हटले की सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकमेव नाव येते आणि ते म्हणजे डॉ.अशोक पोद्दार यांचे असे स्पष्ट केले. डॉ. पोद्दार आरोग्यसेवेसोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यांची समाजसेवा आणि आरोग्यसेवा अत्यंत दर्जेदार आणि इतरांनाही प्रेरणादायी असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. डॉ. पोद्दार यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला समाजासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, असे वाटायला लागते. हे बाब खूप महत्वाची असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले. एड. किरण जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी मोफत तसेच सवलतीच्या दरात केली जात असल्याने रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा होत असल्याचे सांगितले. डॉ. पोद्दार या शिबिराच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा उपकरणाच्या सहाय्याने रुग्णाची तपासणी करत असल्याचे पाहून आपल्याला खूप आनंद झाल्याचे सांगतानाच त्यांच्या रुग्णसेवेबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच असल्याचे सांगितले.

युवा नेते अभिजित देशमुख यांनी यावेळी बोलताना डॉ.अशोक पोद्दार यांना माणुसकीच्या धबधब्याची उपमा दिली.समाज आपल्याला मोठे करत असतो. आपण मोठे झाल्यावर समाजाला न विसरता, कायम समाजासाठी काहीतरी करत राहिले पाहिजे, या उदात्त हेतूने डॉ. पोद्दार कार्यरत असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, जेव्हा बघावे तेव्हा ते हसतमुख असलेले दिसतात. त्यांचा हा उत्साहही सर्वांना एक आगळी वेगळी प्रेरणा देण्याचे काम करतो,असेही देशमुख यांनी सांगितले. डॉ. पोद्दार रुग्णसेवा आणि आरोग्य सेवेने झपाटल्याचे सांगितले. आपल्या नेत्यांच्या वाढदिवसाचे निमित्त असो की आणखी काही, मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याकामी ते कायम आघाडीवर असतात. लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा – महाराष्ट्रात त्यांच्याएवढे मोफत आरोग्य शिबिरे व्यक्तिगत पातळीवर क्वचितच कोणी आयोजित करत असेल, असेही त्यांनी सांगितले.
