लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित शिबीर
लातूर 🙁 वृत्तसेवा ) -दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटल ऍक्सीडेन्ट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरात एकूण ३१० रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.
या मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सोमवार, दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी दहा वाजता लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी , मनपा उपायुक्त श्रीमती विणा पवार, पोद्दार हॉस्पिटलचे संचालक डॉ.अशोक पोद्दार, युवा नेते अभिजित देशमुख, अभय साळुंके, माजी उपमहापौर कैलास कांबळे, डॉ. दीपक गुगळे, रामेश्वर सोमाणी, जयेश बजाज, प्रसाद उदगीरकर, डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. प्रतिक चव्हाण ,डॉ. रेणुका पंडगे, डॉ. मयुरी खोंडेकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने प्रतिवर्षी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून अशा प्रकारचे मोफत अस्थिरोग व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते. पोद्दार हॉस्पिटलमध्ये प्रतिवर्षी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती व पुण्यतिथीचे औचित्य साधून दिवसभर त्यांच्या लोकप्रिय भाषणाच्या व्हिडीओ दाखविण्यात येतात. यावर्षीही त्या दाखवण्यात आल्या. व्यक्तिगत पातळीवर डॉ. अशोक पोद्दार हे प्रतिवर्षी मोफत शिबिरांचे आयोजन करतात. लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात असा आगळा वेगळा आरोग्यसेवा व महाआरोग्य शिबिराचा पॅटर्न आणण्याचे काम डॉ. अशोक पोद्दार यांनी केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून डॉ. अशोक पोद्दार प्रतिवर्षी अशा प्रकारच्या मोफत शिबिराचे आयोजन करून रुग्णांच्या सेवेत नेहमीच अग्रेसर असतात ही बाब अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. युवा नेते अभिजित देशमुख यांनीही या उपक्रमास आपल्या शुभेच्छा देताना डॉ. अशोक पोद्दार आणि देशमुख परिवाराचे नातेसंबंध अत्यंत जिव्हाळ्याचे – कौटुंबिक असल्याचे नमूद केले. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे औचित्य साधून पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने ज्या शिबिरांचे आयोजन केले जातें त्याला तोड नाही, असेही ते म्हणाले. आरोग्यसेवेच्या माध्यमातून आपल्या आवडत्या नेत्याला आदरांजली वाहण्याची त्यांची पद्धती हृदयस्पर्शी असल्याची भावनाही देशमुख यांनी व्यक्त केली. डॉ. अशोक पोद्दार यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रतिवर्षी आपल्या हॉस्पिटलच्या वतीने अशा प्रकारचे शिबीर घेण्यात येत असल्याचे नमूद केले. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशा प्रकारचा उपक्रम कायम चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.