#स्वदेशी’ बाण्याचे डॉ. #सायरस_पूनावाला यांना
यंदाचा #लोकमान्य_टिळक_पुरस्कार !
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष
डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने” गौरविले जाणार आहे. पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या “कोव्हिशील्ड” लशीने भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवले हे सर्वश्रृत आहे. स्वतंत्र भारत सर्वार्थाने स्वयंपूर्ण व्हावा यासाठी “स्वदेशी”चा आग्रह धरणारे लोकमान्य टिळक यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार डाॅक्टर पुनावाला यांच्या सारख्या भारतीय संशोधन क्षेत्रात अजोड कामगिरी बजावलेल्या संशोधक, उद्योजकाला मिळणं हा अपूर्व योग म्हणता येईल.
गेल्या पन्नास वर्षांत विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सीरम’ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डॉ. सायरस पूनावाला यांनी 1966मध्ये सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. प्रारंभी सीरमने धनुर्वात प्रतिबंधक लस विकसित केली. 1974 मध्ये डांग्या खोकला, धनुर्वात आणि घटसर्प यापासून संरक्षण देणार्या डीटीपी या त्रिगुणी लशींच्या निर्मितीतून ‘सीरम’ने जगभरातील कोट्यवधी मुलांना आरोग्याचे वरदान दिले.
सर्पदंशावरील सीरमची लसही महत्त्वपूर्ण ठरली. लस निर्मितीच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करण्याचे श्रेय सीरमकडे जाते. केवळ जीव रक्षक औषधे आणि लस बनविणे नव्हे तर प्रत्येक मुलाच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही सायरस पूनावाला यांची संकल्पना राहिली आहे.
लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या तत्त्वासाठी
डॉ. पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली पूनावाला समूहाच्या या कंपनीने मोठी झेप घेतली. ते अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.
डॉ. पूनावाला यांचे शिक्षण बिशप स्कूलमध्ये झाले. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली.
आज त्यांचे चिरंजीव आदर पूनावाला सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत.
आरोग्य क्षेत्रात घडवलेल्या क्रांतीकारी बदलाबद्दल डॉ. सायरस पूनावाला यांना असंख्य पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्र सरकारने 2005मध्ये पद्मश्री किताब देऊन त्यांचा गौरव केला. ग्लोबल अलायन फॉर व्हॅक्सीन अॅण्ड इम्युनायझेशनच्या वतीने ‘व्हॅक्सीन हिरो’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा डॉक्टरेट देऊन गौरव केला. दी पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन, दी पॅन अमेरिकन हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन यांनी पूनावाला यांना सन्मानित केले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सन्माननीय डि.लीट पदवी देऊन डॉ. पूनावाला यांना गौरवले आहे. आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान अणि जैवतंत्रज्ञान परिषदेत तसेच बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
पूनावाला समूहाने विविध सामाजिक उपक्रमांना सदैव पाठबळ दिले. यामध्ये शाळांची उभारणी, कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन यांसह अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी आज पुण्यात तर विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. १३ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे कोविद नियमानुसार निमंत्रितांच्या उपस्थितीत वितरण होईल.
#पुनावाला_पितापुत्रांचे #हार्दिक_अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी #भरपुर_शुभेच्छा!
महेश म्हात्रे