ढगफुटी सदृश्य पावसाने पिकाचे नुकसान; पहाणी करून पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना आ. कराड यांची सूचना
लातूर दि.१४- रेणापूर तालुक्यातील अनेक गावात आणि लातूर तालुक्यातील मौजे निवळी व त्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत अशा सूचना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत विमा कंपनीला ऑनलाईन द्यावी असे आवाहन केले.

रेणापूर तालुक्यातील आसराचीवाडी, रामवाडी (ख), तळणी, मोहगाव, कुंभारवाडी, चुकरवाडी, मुरढव, पाथरवाडी, भंडारवाडी, घनसरगाव, खरोळा यासह अनेक गावच्या परिसरात त्याचबरोबर लातूर तालुक्यातील मौजे निवळी व त्या परिसरात आज शुक्रवारी मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनसह शेतीतील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पडून आसराचीवाडी येथे पाच शेळ्या आणि रामवाडी (ख) येथे एक म्हैस दगावली. सखल भागात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे ओढे नाल्यांना पूर आल्याने काही काळ त्या त्या भागातील वाहतूक बंद होती.
सदरील ढगफुटी सदृश्य पावसाची माहिती समजतात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत अशा सूचना महसूल विभागासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रेणापूर तालुक्यासह जिल्ह्यात सर्व दूर पाऊस होत असून खरीप पिकांची काढणी सुरू असल्याने या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत नुकसानीची माहिती क्रॉप इन्शुरन्स कंपनीला मोबाईल ॲपद्वारे द्यावी त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नुकसानीची माहिती कळवावी असेही आव्हान भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.