16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeकृषी*पावसामुळे सोयाबीन बाजाराचे चित्र बदलणार*

*पावसामुळे सोयाबीन बाजाराचे चित्र बदलणार*

शेतकरी

देशात जवळपास १५ दिवसांपासून वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांना (Soybean Producer State) बसत आहे. या तीनही राज्यांतील बहुतांशी सोयाबीन सध्या काढणीच्या (Soybean Harvesting) टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २० ते २५ टक्क्यांपर्यंत सोयाबीनची काढणी झाली. तर साधारण एवढंच सोयाबीन कापणी करून शेतात आहे. तर ५० टक्क्यांपर्यंत सोयाबीन (Soybean) शेतात उभं आहे. पावसामुळे शेतात असणाऱ्या ७५ टक्के सोयाबीनला फटका (Soybean Crop Damage) बसला आहे. ऑक्टोबरमधील पावसाने जवळपास २० ते २५ टक्के उत्पादन घटल्याचे शेतकरी आणि जाणकार सांगत आहेत. देशात पावसानं सोयाबीनचे कसं आणि किती नुकसान झालं? कोणत्या राज्यात किती फटका बसला? या नुकसानीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याचा घेतलेला आढावा…

महाराष्ट्रातील स्थिती

महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर यंदा अगदी सुरवातीपासूनच निसर्गाची अवकृपा राहिली, असंच म्हणावं लागले. कारण जून महिन्यात अगदी थोड्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला. बहुतांशी भागातील पेरण्या जुलै महिन्यात झाल्या. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्याने सरासरी भरून निघाली. मात्र ऐन फुलं आणि शेंगा लागण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण बसला. तसेच कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी पिकांमध्ये चार ते पाच दिवस पाणी साचले होते. नदी-नाल्यांच्या शेजारील क्षेत्रामध्ये ही परिस्थिती होती. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. राज्यात अनेक ठिकाणी येलो मोझॅक, खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. अन्नद्रव्याची कमतरताही जाणवली. सततच्या पावसाने वेळेवर तणनियंत्रण करता आले नाही. जास्त दिवस पाऊस झालेल्या भागात पिकापेक्षा तणाची वाढ जास्त होती. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना अनेक दिवस तण काढता आले नाही. त्यामुळे सोयाबीन पीक मोडण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली होती.

सप्टेंबरपर्यंत पिकाला बसलेला फटका:

  • पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाला नाही.
  • अनेक ठिकाणी पेरण्यांना उशीर झाला.
  • जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडला.
  • आठवडाभरापेक्षा जास्त दिवस पाऊस झाल्याने पिकात पाणी साचून नुकसान.
  • शेंगधारणा तसेच दाणे परिपक्व होण्याच्या काळात आलेल्या पावसाने अधिक नुकसान.
  • शेतांमध्ये अनेक दिवस पावसाचे पाणी साचलेले होते. सोयाबीन पाण्यात राहिल्याने झाडांवरील शेंगा परिपक्व होऊ शकल्या नव्हत्या. काही शेंगांमध्ये दाणेच नाहीत.
  • पावसात खंड पडल्याने पिकाला पाण्याचा ताणही बसला.
  • पिकावर येलो मोझॅक, खोडकीड, अन्नद्रव्य कमतरतेचा परिणाम.
  • तण वाढल्याने उत्पादकतेवर परिणाम.

ऑक्टोबरमधील पावसानं केला घात :

राज्यात साधारणपणे ऑक्टोबरपासून सोयाबीनची काढणी सुरु होते. मात्र मागील १० ते १२ दिवसांपासून राज्यातील बहुतांशी सोयाबीन उत्पादक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळं या पावसाने होणारे नुकसान अधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. तेथे दसऱ्यापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात २५ टक्केही सोयाबीनची काढणी झालेली नाही. म्हणजेच जवळपास ७५ टक्के सोयाबीन या पावसात सापडले. राज्याच्या विविध भागांमध्ये कुठे सोयाबीनची सोंगणी करून ढीग लावलेला आहे, तर कुठे केवळ कापणी केलेलं आणि उभं पीक आहे. कोल्हापूर, सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्यांत सोयाबीन कुजू लागले आहे. सोयाबीनला मोड फुटू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही सोयाबीन हातचे जाण्याची वेळ आली. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर तसंच वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकाला मोठा तडाखा बसला. सलग होणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी शेतात जाणही मुश्कील झाले आहे. यंदा मजुरांनी काढणीचा दर वाढवला आहे. जास्त पैसे देऊनही मजूर मिळत नाहीत. यामुळे अनेक भागात सोयाबीन काढणीला येऊनही शेतातच आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना एकरी ८ ते ९ क्विंटलपर्यंत उत्पादनाची आशा होती. मात्र आता ३ ते ४ क्विंटल मिळणंही मुश्कील असल्याचं शेतकरी सांगतात. अनेक भागात सोयाबीनचे नुकसान ५० टक्क्यांवर पोहोचले आहे.

ऑक्टोबरमधील पावसानं काय झालं?

  • काढणीला आलेलं पीक भिजल्याने नुकसानीची पातळी वाढली.
  • भिजलेले सोयाबीन काढण्यास मजुरांकडून नकार.
  • पावसामुळे वाळलेल्या शेंगामुळे होणारे नुकसान जास्त.
  • काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचले.
  • अनेक ठिकाणी कापणी करून ठेवलेलं पीक वाहून गेलं.
  • सोयाबीनच्या गंजीही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.
  • बऱ्याच भागांमध्ये सोयाबीनला मोड आले.
  • जास्त पावसामुळे शेतात हार्वेस्टर जाण्यास अडथळे.
  • बहुतांशी शेतकऱ्यांना ३ ते ४ क्विंटल उत्पादन मिळण्याचीही आशा नाही.
  • उत्पादनासाठी खर्च जास्त करूनही पीक साधणार नाही.
  • मजूर टंचाईमुळे सोयाबीन काढणी अनेक भागांमध्ये रखडली.
    मध्य प्रदेशात मोठा फटका

देशात सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश आघाडीवर आहे. मात्र मध्य प्रदेशातही यंदा सोयाबीन पेरणीवर उशिराच्या पावसाने परिणाम केला होता. तरीही यंदा मध्य प्रदेशात जवळपास ५१ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरा झाला. तसेच सुरवातीच्या काळात काही भागांमध्ये पिकाला पाण्याचा १५ ते २० दिवसांपर्यंत ताण बसला होता. असे असतानाही यंदा मध्य प्रदेशात ५३ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल असा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया( सोपा) व्यक्त केला.
मात्र हा अंदाज वादग्रस्त ठरला आहे. कारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला पावसाचा मोठा तडाखा बसतोय. मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये सलग १० ते १२ दिवस पाऊस पडला. मध्य प्रदेशातील इंदूर, खरगोण, सागर, मंदसौर, नीमच, रायसेन, उज्जैन, रतलाम, ग्वाल्हेर, मालवा आणि निमाद, भोपाळ आणि नर्मदापूरम या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये नुकसान वाढले. मंदसोर जिल्ह्यात मल्हारगड, पिपलीयामंडी, दालोदा, फतेहगड, बुधा, नागरी, गारोथ, भानपुरा, सितामाऊ, सुवारसा, शामगड, क्यामपूर, बसाई, तितरोद या भागांत सोयाबीन पीक हातचे गेले आहे.

मध्य प्रदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमधील ७० टक्क्यांपर्यंत सोयाबीन काढणीला आले आहे. तर २५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन उशिरा पेरणी झाल्याने शेंगा वाळण्याच्या स्थितीत आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून पीक शेतात ठेवले होते. तर कुठे पिकाला ऊन देण्यासाठी गंजी मारून ठेवलेले होते. पण पावसाने या सोयाबीनला मोठा तडाखा दिला. नद्या आणि नाल्यांशेजारील शेतातून पाणी वाहत आहे. काही ठिकाणी तर मातीही वाहून गेली. त्यामुळे पीक होत्याचे नव्हतं झालं.
बऱ्याच ठिकाणी उभ्या पिकात पाणी साचलं. तर कुठेकुठे पाण्यानं पीक झाकलं गेलं. ऐन काढणीच्या काळात झालेल्या या पावसामुळे सोयाबीनचा उतारा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे, असं मध्य प्रदेशातील बाजार विश्लेषकांनी सांगितलं. काही भागांमध्ये गोदामांमध्ये पाणी शिरल्याने साठवून ठेवलेले सोयाबीनही पाण्यात गेले. तसेच शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी नेलेले सोयाबीनही पावसाने भिजले आहे. काही बाजार समित्यांमधील गाळ्यांमधूनही पाणी वाहत होते. तसेच उघड्यावर आणि विक्रीसाठी गाड्यांमधून आणलेल्या सोयाबीनचेही नुकसान झाले आहे.

इतर राज्यांतील स्थिती

देशात सोयाबीन उत्पादनात राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील सोयाबीन पिकालाही पावसाचा मोठा फटका बसतोय. राजस्थानमधील ७५ टक्के सोयाबीन उत्पादन बुंदी, बाराण, झालावाड आणि कोटा या चार जिल्ह्यांत होतं. मात्र या चारही जिल्ह्यांमधील पिकाला सध्या फटका बसत आहे. कोटा जिल्ह्यात नुकसान जास्त आहे. राजकोट जिल्ह्यातही पावसाने पिकाला जोरदार तडाखा दिला. राजस्थानमध्ये जवळपास २० ते २५ टक्के पिकाचे नुकसान झाल्याचे येथील जाणकारांनी सांगितले.

बाराण जिल्ह्यातील अटरु, केलवाडा, किशनगंज, शाहाबाद, छीपाबडौद आणि छबडा मंडळात पावसाने सोयाबीन धोक्यात आले आहे. बाराण, किशनगंज, शाहाबाद, छबडा, छीपाबडौद आदी भागांत शेतात कापणी करून ठेवलेलं सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे. या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तसेच तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात राज्यातही पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत आहे. तेलंगणातील निर्मल आणि इतर काही महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमधील जवळपास ३० टक्के सोयाबीन हातचे गेले आहे.

कसं असू शकतं बाजाराचं गणित?

उत्पादनाचे अंदाज काय?

केंद्र सरकारने यंदा देशात १२० लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाल्याचे म्हटलंय. तर सोपाच्या मते ११४ लाख हेक्टरवर पेरा झाला. सरकारने यंदा जवळपास १२९ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल असा अंदाज जाहीर केला. तर सोपानं १२० लाख ३९ हजार टन उत्पादनाचा अंदाज दिला. मात्र दोन्ही अंदाज सप्टेंबरपर्यंतच्या पिकाची स्थिती लक्षात घेऊन जाहीर केले आहेत. पण हे सुरवातीचे अंदाज असून नंतर त्यात कपात होऊ शकते. परंतु सध्या सुरु असलेल्या पावसानं उत्पादनाचे संपूर्ण गणितच बदलले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सोयाबीन उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशातील उत्पादनही २० टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

उत्पादनाची खरी परिस्थिती उद्योग आणि सरकार सुधारित अंदाजातून सांगतील. पण त्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी उजाडेल. उत्पादन घटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दरात सुधारणाही होऊ शकते. मात्र तोपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेले असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीच्या काळात मागणी आणि पुरवठ्याचे गणित समजणे गरजेचे आहे. काही जाणकारांच्या मते यंदा ११० लाख टन तर काही जणांच्या मते १०० लाख टनांपर्यंत सोयाबीन उत्पादन होऊ शकते. सोयाबीन पिकाचे नुकसान होत असल्यानं देशातील बाजारात त्याचे पडसाद उमटत आहेत. महत्त्वाच्या बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती :

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनही यंदा घटले आहे. युएसडीए या संस्थेने ब्राझील, अर्जेंटिना आणि पेरुग्वे या देशांमध्ये सोयाबीन उत्पादन वाढेल असे म्हटले आहे. परंतु या देशांमध्ये सोयाबीन पिकाबाबत सर्व काही आलबेल नाही. ला निनाची स्थिती यंदाही कायम आहे. त्याचा फटका येथील शेतीला बसतो. मागील वर्षी हेच झाले होते. त्यामुळं सध्या युएसडीएने जास्त उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला तरी नंतर त्यात कपात होऊ शकते. ही शक्यता सर्वांनीच गृहीत धरली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर १३ ते १४ डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहेत.

बाजारासाठी आशादायक :

सध्या सोयाबीन बाजार काहीसा दबावात असला तरी सोयापेंड निर्यात वाढली आणि सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढवले, तर देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो. उद्योगांच्या संघटना या दोन्ही मागण्या लावून धरत आहेत. सोपा संस्थेने सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान आणि खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी लावून धरली आहे. सॉल्व्हंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया( एसईएन) खाद्यतेल आयातशुल्क वाढ करण्याची मागणी केली. सरकारने या दोन्ही मागण्या मान्य केल्या तर याचा सोयाबीन बाजाराला आधार मिळेल.

दर काय राहू शकतात?

सप्टेंबरपर्यंत देशात सोयाबीन पिकाची स्थिती चांगली होती. त्यावेळी उत्पादनही चांगले राहील, असं वाटत होतं. त्यामुळं यंदा सोयाबीन उत्पादकांना सरासरी किमान ५ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल, असा अंदाज होता. सध्या नव्या सोयाबीनध्ये १८ ते २५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. त्यामुळे या सोयाबीनला दर कमी आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात नव्या सोयाबीनला ४ हजारांपासून ते ४ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.

तर जुन्या सोयाबीनची विक्री ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होत आहे. पण सध्या होत असलेल्या पिकाच्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल, तसे त्याचे पडसाद बाजारात उमटतील. पण आजचे चित्र सांगायचे झाले तर सोयाबीनचे दर सध्याच्या पातळीपेक्षा सुधारू शकतात. जाणकारांच्या मते शेतकऱ्यांना ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतील. मात्र बाजारावर इतरही काही घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे दरात चढ-उतार होतात. या काळात शेतकऱ्यांनी आपल्याला अपेक्षित दरात टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]