शोर या चित्रपटातील पाणी रे पाणी हे सुश्राव्य गीत सध्या आठवण्याचं कारण लातूरकरांना सांगायची गरजच राहिली नाही. गेल्या एक महिन्यापासून लातूर शहरात होत असलेला दुर्गंधीयुक्त पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा लातूरच्या सदैव तहानलेल्या आत्म्यांना अजून चिंतीत करीत आहे. वेळीच यावर उपाययोजना नाही झाल्या तर आगामी काळात याचे गंभीर दुष्परिणाम (राजकीय आणि लातूरकरांच्या आरोग्यावर) होणार हे मात्र निश्चित झाले आहे.
पाणी हा विषय गत एका तपापासून लातूरकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे आणि या पाण्यावरच लातूरचे राजकारण टिकून आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. लोकसभा, राज्यसभा यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत लातूरकरांना “पाण्याचे” अमिष दाखवून मृगजळात ओढण्याचे काम सातत्याने राजकारण्यांकडून यशस्वीपणे केले जात आहे. 10 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होणारे शहर म्हणून जगाला ओळख असलेले लातूर आणि ही नामुष्की दूर करण्यात सपशेल अपयशी ठरलेले नेते, प्रशासन यांच्याबद्दलची चीड आता सर्वसामान्य जनतेतून वाढत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
त्याला कारणही तसेच गंभीर आहे. शहरात गेल्या दीड महिन्यांपासून पिवळे आणि दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत राहिला. जनतेतून वाढता विरोध पाहता हा पुरवठा तात्काळ बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पहिल्यांदा शहरात अशा पाण्याचा पुरवठा झाला त्याचवेळी लातूर शहरातील सजग पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. संबंधितांनी यावर उपाययोजना करण्यात येत असल्याची ग्वाही देखील दिली मात्र अथक प्रयत्नांती पिवळं पाणी येण्याचं काही थांबलं नाही. सुदैवाने अजूनही शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम दिसून आले नाहीत मात्र या पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याची चर्चा होते आहे. लातूरकर किती संयमी आणि सहनशील आहेत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने अनुभवयास आले. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवरील रोष या प्रकरणाने वाढतो आहे. या गंभीर विषयाला राजकारणाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न लातूरकरांनी याची डोळ्यांनी पाहिला. निदान पिण्याच्या पाण्यावरून तरी राजकारण होऊ नये अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
शुद्ध, स्वच्छ पाणी हा आपला अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे त्यासाठी काय केले पाहिजे हे सांगण्याइतपत आपले लोकप्रतिनिधी दुधखुळे नाहीत. हे पिवळं पाणी पेटत असल्याचं लक्षात येताच आता हालचालींना वेग आलेला आहे. लातूरच्या अनेक नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी थेट मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना मेल करून तक्रार केली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आता प्रशासन युद्धपातळीवर काम करेल याबाबत शंका नाही मात्र याचे श्रेय घेण्यासाठी जर कुणी समोर आले तर……सहनशील लातूरकरांच्या संयमाचा बांध फुटला की काय परिणाम होतात हे देशाने अनुभवले आहे.
लवकरच शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा होईल या अपेक्षेसह…..

सतीश तांदळे
माझं लातूर