- बालेवाडीतील शानदार साेहळयात फार्मर कप स्पर्धा संपन्न
- हजाराे शेतक-यांची उपस्थिती
- अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाने पटकावला प्रथम क्रमांकाचा फार्मर कप
पुणे, १६ मार्च २०२३ : अमिर खान यांनी पाणी फाऊंडेशनची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर पाणी फाऊंडेशनने सातत्य दाखवत जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याचे कार्य केले आहे. आधी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार केली. आता फार्मर कपच्या माध्यमातून विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे गाैराेवदगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पाणी फाऊंडेशनतर्फे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ च्या पुरस्कार वितरणाचा शानदार साेहळा रविवारी पार पडला. त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पदमश्री पाेपटरावर पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुताेष गाेवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या सर्वच जिल्हयांतून हजाराे शेतकरी गट, शेतकरी महिला गट उपस्थित हाेते. या कार्यक्रमात पानी फाउंडेशनचा राज्यस्तरीय फार्मर कप २०२२ हा प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाला देण्यात आला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो. राज्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी आणलेल्या याेजनांचाही उल्लेख केला.
शेतकऱ्यांना थोडी मदत केली तर ते चांगली प्रगती करू शकतात. म्हणून शेततळे, शेड नेट, पेरणी यंत्र, विविध साधने आणि इतर कृषि निविष्ठा देण्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. शासनाच्या जलयुक्त शिवारालाच जोड म्हणून वॉटर कपने शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी प्रेरित केले. निसर्गाच्या फेऱ्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये असलेल्या क्षमतेची आठवण करून देण्याचे कार्य वॉटर कपने केले आणि ग्रामीण भागातील अनेक गावे जलस्वयंपूर्ण झाली, असाही उल्लेख फडणवीस यांनी आवर्जून केला.
सोलर फिडरद्वारे शेतकऱ्यांना १२ तास वीज
दिवसा १२ तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. यासाठी ॲग्रीकल्चर फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. यावर्षी ३० टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. पुढील दोन वर्षात उर्वरित फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील आणि शेतीसाठी दिवसा १२ तास वीज मिळू शकेल. यासाठी सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यात येईल. त्यासोबत फिडरजवळ असलेल्या शेतात काही पिकत नसेल तर अशी शेतजमीन सोलरसाठी ३० वर्षे भाड्याने घेण्यास शासन तयार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. ३० वर्षानंतर शेतकऱ्याला जमीन परत दिली जाईल. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळू शकेल.
शेतकऱ्यांनी करून दाखविले
पाणी फाउंडेशनची कथा सांगितली, तुम्ही केलेले परिवर्तन दाखविले तर निराशेतील शेतकरी पुन्हा उभा राहील आणि हे करण्याकरिता शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले. पानी फाऊंडेशनने ४ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे उद्दीष्ट ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.
अमिर खान म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनच्या प्रवासात नेहमीच सहकार्य केले. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात. वैज्ञानिक आणि संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे. येत्या काळात महाराष्ट्रात आणि भारतात हजारो कृषि उद्योजक तयार व्हावेत. शेतीला व्यवसायाच्यादृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, यातील समस्यांवर मात करून पुढे जावे. यावेळी सत्यजित भटकळ आणि पोळ यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते कृषि क्षेत्रातील संशोधानाचे महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सह्याद्री फार्मसीचे विलास शिंदे, विविध पिकांसाठी डिजिटल शेती शाळेचे मार्गदर्शक, विविध पिकांसाठी एसओपी देणारे मार्गदर्शक, कृषि विषयक माहितीपट पडताळणी करणारे तज्ज्ञ, पोकरा प्रकल्पाचे विजय कुवळेकर, एबीपी माझाचे राजीव खांडेकर, पानी फाऊंडेशनला सहकार्य करणाऱ्या संस्था, शेतकऱ्यांसाठी महितीपट निर्मितीत सहकार्य करणारे, कृषि तज्ज्ञ आदींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, कृषी सचिव एकनाथ डवले. अभिनेते अतुल कुलकर्णी, सहयाद्री ॲग्राे फार्मचे विकास शिंदे, राहूरी कृषी विदयापीठाचे कुलगूरू डाॅ. प्रशांत पाटील, पंजाबराव कृषी विदयापीठाचे कुलगूरू डाॅ. शरद गडाख आदी उपस्थित हाेते.
यावेळी ध्वनीचित्रफीत आणि शाहीर अवधूत गांधी, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्या पथकाने सादर केलेल्या नृत्याविष्काराच्या माध्यमातून पानी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देण्यात आली. नीरज नारकर व स्पृहा जाेशी यांनी सुत्रसंचालन केले.
पाणी फाउंडेशन आयाेजित राज्यस्तरीय फार्मर कप स्पधेतील विजेत्यांची नावे
प्रथम पुरस्कार- परिवर्तन शेतकरी गट, वाठाेडा, ता. वरुड , जि. अमरावती, रक्कम २५ लाख
दवितीय पुरस्कार- चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गाेळेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद, रक्कम १५ लाख रूपये
संयुक्त तृतीय पुरस्कार – जय याेगेश्वर शेतकरी गट , डांगर बुद्रूक, ता. अंमळनेर, जळगाव , रक्कम ५ लाख रुपये
संयुक्त तृतीय पुरस्कार – उन्नती शेतकरी गट, वारंगा तर्फे नांदापूर , ता. कळमनुरी, जि. हिंगाेली, रक्कम ५ लाख रुपये.