लेखमाला भाग :३
लेखमाला
भेटी लागे जीवा
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील सुपुत्र व सध्या माहिती संचालक गणेश रामदासीयांनी प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन शेअर केलेल्या मागील तीन वारींमधील अनुभवावर आधारित लेखमाला माध्यम
वाचकासाठी प्रसिद्ध करीत आहोत ( या सारख्या या आधीच्या विविधांगी लेखांचा आस्वाद घेण्यासाठी लेखकाचे ‘राग दरबारी’फेसबुक पेज https://www.facebook.com/ramdasiganesh/ या लिंकचा उपयोग करावा तसेच त्यांनी घेतलेल्या दिल्लीतील विविध विषयांवरील मुलाखतींचा आस्वाद घेण्यासाठी त्यांचे युट्यूब चॅनल ‘ दिल्ली निवासी गणेश रामदासी’ याच्या https://youtube.com/channel/UCzXEBaxXKN-05jO-5TaWQOA या लिंकचा उपयोग करावा) -संपादक
ज्ञानराजाचे दर्शन घेऊन दिल्ली-पुणे टीमने वारी चालायला सुरुवात केली तेव्हा पाऊस चाहूल देवून हुलकावणी द्यायचा.जागोजागी टप्प्यांवर आमचे गरूड जसे पाणी घेऊन उभे तशा हाती छत्र्याही ठेवायचे.त्यामुळे सचैल स्नान घडले असे पहिल्या दोन दिवसांमध्ये घडले नाही पण नाही-नाही म्हणता पावसाने आमच्या टीमला गाठले ते जेजुरीला.त्याने आठवण जागी झाली मागच्या दोन्ही वारींची.दोन्ही वेळेस उजव्या पायाने परीक्षा घेतली परंतू विठूरायाने माझेकडून वारी पूर्ण करूनच घेतली.
पहिल्या वेळी माझा उजवा पाय आळंदीहून पुण्यात येताच रात्रीतून सुजलेला,शिर आखडलेली आणि मी पाय अक्षरशः ओढत दुसरे दिवशी दिवेघाट पार करण्याचे दिव्य कसे पार पाडायचे या चिंतेत! दोन्ही वारीमध्ये मला विठुमाऊली आणि गुरू महाराजांनी दिलेले साक्षात्कार व अनुभूतींचा पाऊसच पाडला होता मात्र संपूर्ण वारीमध्ये एखाद दुस-या सरी आल्या.आम्ही ते स्थान सोडून पुढचा टप्पा गाठला की, वृत्तांत यायचा की नंतर त्या भागात धो-धो पाऊस पडला.एकूणच सर्व वारींमधील निरनिराळे अनुभव 'राग दरबारी' फेसबुक पेजवर आणि 'दिल्ली निवासी गणेश रामदासी' युट्यूब चॅनलवर वेळोवेळी नोंदवले आहेत व पुढेही यथावकाश संदर्भ येत राहतील.
या वेळी मात्र पाऊस कसा धुवून काढतो याचा पहिला अनुभव आमच्या वारक-यांनी जेजुरीत घेतला.आज व उद्या जर पावसाने जोर धरून वाटच रोखली नाही तर आमचे वारकरी वाल्हे- लोणंद करून उद्या फलटण ओलांडू शकतील.आज एकादशी त्यामुळे तसे पाय ज्यास्त शिणवून चालणारही नाही परंतू पावसाळी वातावरणाचा एक लाभ असाही होतो की,उन्हाच्या कडक मा-यापासून व शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने पायाला पेटके येण्याचे प्रमाण कमी राहते.बुटांना घासल्याने पायाला फोड येणे,सालटी निघणे या पासून मात्र कोणतेच वातावरण सुटका करीत नाही.
मग दमलेल्या, दुखावलेल्या,जखमी पायांची देखभाल करण्यासाठी वेळ काढला जातो तो अशा विसावा थांब्यांवर.पहाटे चालायला सुरूवात केल्यानंतर जो तो आपापल्या क्षमतेनुसार जागोजागी थांबून 'वाईच दम' घेतो,नव्हे तो तास-दिड तास किंवा चार-पाच किलोमीटर चालल्यावर घ्यावाच.दुस-या टप्प्यावर चहा आणि मग असा चटई विसावा घेतो तेव्हा प्रत्येकाची फिजियोथेरेपी सुरू होते.कोणी मलम,कोणी तेल लावते,कोणी पाणी भरल्या फोडांना इंजेक्शन देतात,कोणी अक्युप्रेशर,कोणी रज्जुतणावांद्वारे आपले स्नायू हलके करून घेतो.असाच उपक्रम जेवणाच्या सुट्टीवेळीही करणे आवश्यक.आता पायांना सराव झालेला असल्याने दुपारच्या विश्रांतीनंतरही संध्याकाळचा आठ-दहा किलोमीटरचा टप्पा उरकला जातो.त्यामुळे पहिल्या दोन दिवसांचे @25 किमीचे चालणे पुढे @32-34 बनत जाते.रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाता क्षणी कपडे धुणे आणि बादलीभर गरम पाण्यात खडेमीठ टाकून पाय शेकणे उपचार करताच जेवतानासुद्धा झोप अनावर होते.
कष्टांविना वारी पूर्ण होत नाही हे तर खरेच आहे पण पूर्वसुकृताशिवाय आणि माऊलींच्या आशीर्वादाशिवायही ती पुरी होत नाही हेच खरे.
लेखन :गणेश रामदासी
माहिती संचालक