क्रिकेट
हाता-तोंडाशी आलेला सामना गमावल्यानंतरही खुश आहे
–भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या
त्रिनिदाद: गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा (WI vs IND) चार धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजच्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याचा संघाला विंडीजच्या होल्डर (२/१९), ओबेद मॅकॉय (२/२८) आणि रोमॅरियो शेपर्ड (२/३३) झटपट विकेट्स घेत आळा घातला. भारतीय संघाला केवळ १४५ धावाच करता आल्या. भारताकडून पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या. विंडीजचा कर्णधार कर्णधार रोव्हमन पॉवेल (४८) आणि निकोलस पूरन (४१) यांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ६ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या. भारताकडून लेगस्पिनर युजवेंद्र चहलने २४ तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ३१ धावांत २ विकेट घेतले.
पराभवावर काय म्हणाला पांड्या
टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, युवा संघ चुका करेल. सामन्यानंतर प्रसारकांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘आम्ही पाठलाग करताना योग्य मार्गावर होतो. आम्ही काही चुका केल्या ज्या आम्हाला महागात पडल्या. युवा संघ चुका करेल. संपूर्ण सामन्यात आम्ही खेळावर नियंत्रण ठेवले जे सकारात्मक होते. अजून चांगले चार सामने खेळायचे आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये विकेट गमावल्यास कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होऊन बसते, नेमके तेच झाले. अजून चार सामने बाकी आहेत.’
युवा खेळाडूची केली स्तुती
या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. त्याने षटकारासह आपले खाते उघडले. हार्दिक म्हणाला, ‘तिलक – त्याने ज्या पद्धतीने डावाची सुरुवात केली ते पाहून खूप छान वाटले. तुमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दोन षटकारांनी सुरुवात करणे ही एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यात आत्मविश्वास आणि धैर्य आहे. तो भारतासाठी चमत्कार घडवणार.’
इथे फिरला सामना
१५व्या षटकाच्या अखेरीस भारताची धावसंख्या ४ विकेट गमावून १०७ अशी होती. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन पूर्णपणे क्रीजवर सेट झाले होते. विजयासाठी ३० चेंडूत फक्त ३७ धावांची गरज होती. मात्र इथून वेस्ट इंडिजने चमत्कारिक पुनरागमन केले. वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने हार्दिक पांड्याला क्लीन बोल्ड केले. एका चेंडूनंतर संजू सॅमसन धावबाद झाला. तीन चेंडूंत पडलेल्या या दोन विकेट्सनी भारताला विजयापासून दूर नेले आणि परिणामी भारताला अवघ्या ४ धावांनी पराभव पत्करावा लागला.