# रविवार ४ जून रोजी आयोजन #
उद्घाटन सत्रातील मधुर भांडारकर यांची प्रकट मुलाखत रसिकांसाठी ठरणार पर्वणी
पुणेः– ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ (पश्चिम विभाग)च्या वतीने रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील पहिल्याच ‘ स्किन सिटी चित्रपट रसिक संमेलना’ चे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मधुर भांडारकर यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सत्रात होणारी मधुर भांडारकर यांची प्रकट मुलाखत रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष संयोजक वीरेंद्र चित्राव आणि स्किन सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन ढेपे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नेक्स्टजेनइनोव्ह ८ चे डायरेक्टर राहुल जैन, सचिव दिलीप बापट आणि आशयचे सचिव सतीश जकातदार आदी उपस्थित होते.

हे संमेलन रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, पुणे येथे होणार आहे. चित्रपट चळवळ भारतभर पोहोचविण्यासाठी चार दशकांहून अधिक काळ प्रयत्न करणारे पत्रकार, समीक्षक, लेखक सुधीर नांदगावकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या संमेलन स्थळाचे नाव स्व. सुधीर नांदगावकर सभागृह असे करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य कॅबिनेट मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री *चंद्रकांत पाटील* यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला फेडरेशनचे अ. भा. अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.