■एका लाकुडतोड्याची दुसरी गोष्ट ■
◆ राजेंद्र शहापूरकर ◆
औरंगाबाद : राजकीय दृष्ट्या अत्यंत अडचणीत आलेले ‘धूर्त’ पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे काल सायंकाळी झालेले फेसबुक लाईव्ह म्हणजे धुर्तपणाचा कळस आहे असे म्हणावे लागेल. ‘तुमचा त्रिफळा उडालेला आहे…पण अंपायरने तुम्हाला भेटून तुमच्या कानात सांगावे की तुम्ही आऊट झाला आहे, तर मी क्रिज सोडेन..’ अशा विचित्र प्रकारचे उद्धवजीचे हे लाइव्ह मनोगत आहे.

आता ते ठाकरे आहेत आणि ठाकरे काहीही बोलू शकतात ही बात अलहिदा ! एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागण्या ठाऊक असताना त्या मागण्यांचा साधा उल्लेख न करता त्याना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचाच प्रयत्न धूर्त उद्धवजींनी केला आहे.काॅग्रेस राष्ट्रवादीचे साथ सोडा, भाजपाला सोबत घ्या, या एकनाथ शिंदे व समर्थकांच्या मागण्या आहेत . त्यातच लाईव्ह मनोगतात उल्लेख केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.पण त्याकडे सोयीस्करपणे पाठ फिरवून उद्धव ठाकरेंनी भावुकतेला प्राधान्य दिले आहे.अर्थात त्यांच्याकडे याशिवाय दुसरा सोयीस्कर पर्यायही नव्हता म्हणा !

उद्धवजींनी मनोगतात लाकुडतोड्याची गोष्ट सांगितली आहे त्या बद्दल मात्र त्यांच्या विवेकबुद्धीचे आणि समयसुचकतेचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.सर्वसामान्य जनतेबरोबरच शिवसैनिकांना त्यांच्या गोष्टीचा कळालेला अर्थ मात्र मजेदार आणि वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन करणारा आहे. उद्धवजींना जसे शिवसैनिकाने ‘केमिकल लोचा ‘ फोन करून सांगितला होता तसेच हे प्रकरण आहे.

म्हणजे काय तर पक्षप्रवक्ते संजय राऊत हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खासमखास आहेत. त्याच्या घरी खुर्च्या उचलण्यातही त्यांना वाटणारा स्वाभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. म्हणजे दस्तुरखुद्द राऊत साहेबांनीच ‘मी शरद पवारांचा ‘ असे कधीच जाहीर करून टाकले आहे. आता शरद पवारांचा राष्ट्रवादी हा पिव्वर प्रादेशिक पक्ष आहे आणि त्यांना त्यांच्या कन्येला सुप्रियाताईला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेले पाहायचे आहे . त्यात काही गैरही नाही .म्हणजे तुमचा चिंटू तिशीत मंत्री बनतो तर त्याच्या साठीतील (५५ म्हणा)कन्येने मुख्यमंत्री का होऊ नये ? त्यासाठी ‘राष्ट्रवादी’ साडेतीन-चार जिल्ह्याच्या बाहेर जायला पाहिजे आणि शिवसेना प्रबळ, एकजूट आणि मजबूत असेल तर तसे होणे अशक्य आहे.शिवसेना आणि भाजपा युती होऊ नये हे पवारांचे उघड डावपेच आहेत , त्यांनी जाहीरपणे कबुली सुद्धा दिलेली आहे. २०१८ मध्ये पवारांनी राज्यात एकच प्रादेशिक पक्ष असू शकतो असे वक्तव्य केले होते. पवारांचे हे इसिप्स केवळ आणि केवळ संजय राऊत यांच्यामुळे साकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, संजय राऊत किंवा शरद पवारच नव्हे तर तळागाळातला शिवसैनिकही हे सत्य मान्य करतात. अर्थात उद्धवजींच्या समोर जाऊन कुणी सांगितले नसेल ही गोष्ट वेगळी… म्हणून शिवसैनिक म्हणतात ‘पवारांचा राऊत,शिवसेनेचा काळ !!

लेखन:राजेंद्र शहापूरकर