अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार,महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री,सूप्रसिद्ध वक्ते,थोर विचारवंत, लेखक,अभ्यासू व्यक्तिमत्व, जुने जाणते नेते भाई किशनरावजी देशमुख साहेब यांचे वृद्धपकाळाने आज निधन झाले आहे.
आज सकाळी त्यांच्या निधनाचे बातमी समजली आणि क्षणभर मी स्तब्ध झालो.जुन्या आठवणीचे माझ्या मनात सुरुवात काहूर उठले.भाई किशनराव देशमुख म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ असंच म्हटलं तर धाडसाचे ठरणार नाही.एखादा व्यक्ती समर्पित भावनेने कसे जीवन जगत शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भाई किशनराव देशमुख साहेब हे होय.

त्यांचा जन्म नांदुरा(खु.)ता अहमदपूर येथे एका खेडेगावात 02 जून 1933 साली झाला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी बी.ए.एलएलबी हे शिक्षण पूर्ण केले.भाई किशनराव देशमुख म्हणजे प्रचंड प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व.महाराष्ट्र विवेक वहिनीचे अध्यक्ष,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते, मराठवाडा विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संस्थाचालक संघाचे संस्थापक अध्यक्ष,विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे संस्थापक सरचिटणीस,लोकायत शिक्षण संस्था अहमदपूरचे अध्यक्ष,किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सदस्य अशा विविध पदावर त्यांनी काम केलेले आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या अनुषंगाने विचार केला तर विद्यार्थी अवस्थेपासून पुरोगामी अभ्यास गट करून विद्यार्थ्यांच्या संघटना उभे केल्या.मराठवाड्यात रजाकरांचा अन्याय मोडून काढण्यासाठी सत्याग्रह केला.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला.यासाठी त्यांनी दोन वेळा तुरुंगवास सुद्धा भोगलेला आहे.गोवा विमोचन लढ्यात सूध्दा सक्रिय सहभाग घेतला.त्या काळात सामाजिक विषमते विरुद्ध प्रभावी संघटन केले.दलितांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला.शेतीमालास कीफायदेशीर भाव मिळावा व एकाधिकार खरेदीद्वारे सरकारने स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन मार्फत खरेदी करावी यासाठी शेतकऱ्याचे संघटन व चळवळी केल्या त्यासाठी अनेक वेळा अटक झाली.महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या लढ्यात सहभागी होऊन सीमा भागातील 865 गावांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी दिल्ली व राज्याच्या जिल्हा कचऱ्यावर त्यांनी मोर्चे काढले.महाराष्ट्र पाणी प्रश्नावर पाणी परिषदांचे आयोजन व सातत्याने त्या साठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. सन 1954 ते 1972 पर्यंत अहमदपूर येथे त्यांनी वकीली व्यवसाय केला.दहा वर्ष अहमदपूर वकील संघाचे ते सरचिटणीस होते.सहा वर्ष मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कार्यकारणी सदस्य होते यातच मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव कार्यकारणी मध्ये मांडून संमत करून घेतला हे विशेष.

चार वर्षे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. दोन वेळा मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कुलगुरू निवड समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. 1999 ते 2005 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम केले.लोकायत शिक्षण संस्था अहमदपूरचे ते संस्थापक अध्यक्ष होते. विचार विकास मंडळ अहमदपूरचे संस्थापक सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवणारा बालाघाट शेतकरी सहकार साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन होते. सन.१९७२ ते १९७८ आणि १९८० ते १९८५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांचे भरीव असे योगदान राहिले आहे. शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्याचे प्रश्न पोट तिडकेने विधानसभेत मांडून न्याय मिळवून दिलेला आहे.मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना,मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, वैधानिक विकास मंडळ निर्मिती,मराठवाड्याचे औरंगाबाद येथे स्वतंत्र उच्च न्यायालयाचे बेंच यासाठी विधानसभेत त्यांनी आग्रही भूमिका मांडून मान्यता मिळवून घेण्यासाठी भाई किशनराव देशमुख यांचे योगदान निश्चितच अविस्मरणीय असे आहे. विधानसभेच्या स्पीकर्स पॅनलवर आठ वर्षे त्यांनी काम केलेलं आहे.
लोकलेखा समिती व इतर वैधानिक समितीवर सदस्य म्हणून त्यांचे प्रभावी असे काम केले.महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जन्मशताब्दी शासकीय पातळीवर साजरी करणे व त्यांचे संपूर्ण वाङ्मय प्रकाशित करणे यासाठी निर्माण केलेल्या शासकीय त्रिस्तरीय समितीवर त्यांनी काम केलेलं आहे. मालमत्तेच्या खरेदी विक्रीवरील स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फिसच्या संदर्भात कर्नाटक-आंध्र प्रदेश- तामिळनाडू व केरळ राज्याच्या अशा व्यवहाराचा अभ्यास करून आपल्या राज्याच्या स्टॅम्प ड्युटीवर नोंदणी यासंबंधी शिफारस करण्यासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे ते अध्यक्ष म्हणून लक्षणीय काम केले.राज्यात सध्याची स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फीस याच शिफारशी प्रमाणे चालू आहे.महाराष्ट्र शेती महामंडळाचे चार वर्षे उपाध्यक्ष,पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बडव्यांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शासनाने नियुक्ती केलेल्या बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले.1978 ते 1980 या कालावधीत शरदचंद्रजी पवार यांच्या पूलोदच्या मंत्रिमंडळात महसूल व नियोजन खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले.त्यांची वैचारिक बैठक अतिशय प्रगल्भ स्वरूपाची होती. कार्ल मार्क्स,चार्वाक,गौतम बुद्ध,समाजवाद यांचा त्यांनी सखोल असा अभ्यास केला आहे.पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन,महात्मा फुले,भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहूजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारावर डोळस श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेल्या पुरोगामी विचाराचा वारसा पुढे चालवण्याची त्यांची जिद्द खूपच महत्त्वपूर्ण अशीच आहे.1976 सालात महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी इटली फ्रान्स स्विझर्लंड इंग्लंड पोलंड हंगेरी पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी सोवियत युनियन बेल्जियम इराण कुवेत इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिलेल्या होत्या. 1980 साली अमेरिकन शासनाच्या निमंत्रण वरून तेथील अध्यक्ष निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी 20 दिवसाचा दौरा करून महाराष्ट्रातील आठ आमदारांसोबत अध्यक्ष निवडणुकीचा अभ्यास त्यांनी केला.या सर्व कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र राज्य पुरस्कार देऊन त्यांचा यापूर्वी गौरव केला.
भाई किशनराव देशमुख यांची शिक्षणासाठी तिची धडपड व त्यांच्या बालमनावर झालेले संस्कार हेच त्यांच्या यशाचे गमक आहे असे म्हटले तर धाडसाचे ठरणार नाही. अहमदपूर येथे एलएलबी करून आल्यानंतर त्यांचा वकील व्यवसाय अतिशय जोरदारपणे सुरुवात होता. यातूनच अहमदपूर-चाकूर तालुक्यातील खेडोपाडी त्यांचा मोठा संपर्क झाला. यातूनच पुढे शेतकरी कामगार पक्षाच्या संपर्कात येऊन पक्षीय कार्यामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी भाग घेतला.अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी सलग दोन वेळेस निवडून येवून या मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व केले.एवढेच नाही तर शरदचंद्रजी पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये त्यांनी महसूल व नियोजन विभागाचे राज्यमंत्री म्हणून अतिशय प्रभावी असे काम केले आहे.अहमदपूर चाकूर च्या शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणण्याचा मौलिक विचार सर्वप्रथम भाई किशनराव देशमुख साहेब यांनीच कृतीतून केल्याचं आपल्याला इतिहासाची पाने चाळल्यानंतर लक्षात येईल. त्यांच्याच अध्यक्षतेखाली बालाघाट शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. भाईसाहेबांच्या विशेष आग्रहानुसार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या कारखान्याला मंजुरी दिली.मशिनरी बकाऊची असताना ती बदलून पवार साहेबांनी खास भाईसाहबांच्या आग्रहास्तव वालचंद नगरची खास मशिनरी बालाघाट साखर कारखान्याला दिली होती.
माझा आणि भाई किशनराव देशमुख साहेबांचा संपर्क साधारणतः एक वीस वर्षापासून चा आहे.मी लहानपणापासून त्यांच्या संपर्कात होतो.पत्रकार झाल्यानंतर मात्र आमचा वारंवार भेटी गाठी वाढल्या.माझे महाविद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालयात झाले. ते मंडळाचे सरचिटणीस/ अध्यक्ष या पदावर असल्याने महाविद्यालयात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने यायचे यातून माझा परिचय कालांतराने अधिक दृढ होत गेला.भाई किशनराव देशमुख यांचे संपूर्ण जीवन हे अतिशय प्रेरणादायी अशा स्वरूपाचं आहे.भाई किशनराव देशमुख यांच्या जीवनासंदर्भात एक आत्मचरित्र पुस्तक रूपाने असावं असा माझा सातत्याने आग्रह असायचा.वारंवार आग्रह केल्यानंतर आत्मचरित्रासाठी परवानगी दिली.आम्ही लिहायला सुरुवात केली.भाईसाहेब सांगायचे आणि मी वहीवर टिपण काढायचो… असा हा आमचा प्रवास तब्बल तीन ते चार महिने चालला. सकाळी दहा वाजता मी त्यांच्या घरी जायचो त्यांच्यासोबत चहा झाल्यानंतर वेगवेगळ्या आठवणी शब्दबद्ध करायचो, दुपारचे जेवण अनेक वेळा भाईसाहेबांच्या घरीच व्हायचे.भाईसाहेब थोडावेळ आराम करून पुन्हा सायंकाळच्या दरम्यान आम्ही लिहायला सुरुवात करायचो.यातून भाईसाहेबांच्या जीवनाचे अनेक अदृष्य पैलू आमच्या समोर आले.संघर्ष हे आत्मचरित्र मला प्रकाशित करता आलं हा मी सन्मान समजतो. वेगवेगळे प्रकाशक, वेगवेगळे लेखक,उमदे लिहीणारे प्राध्यापक त्यांच्या मदतीला असताना सुद्धा भाई किशनराव देशमुख साहेबांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांचं आत्मचरित्र प्रकाशन करण्यासाठी,शब्दबद्ध करण्यासाठी मला संधी दिली.सम्यक समता या प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक मी प्रकाशीत करू शकलो ही माझ्या जीवनातली एक मोठी गोष्ट आहे असं मानणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे.या पुस्तकाची प्रस्तावना करत असतानाच मी दोन शब्द म्हणून माझे काही शब्द या ठिकाणी लिहिले होते….कार्यकर्त्याचे आयुष्य म्हणजे एक प्रकारचे अग्निदिव्यच असते.विचाराचं,तत्त्वाचं आणि नैतिकतेचे अधिष्ठान जितकं पक्क तितकं अग्नी दिव्य सफल होत असते असे म्हटले जाते.चार्वाक, कार्ल मार्क्स,बुद्ध यांच्या विचारसरणीचा अफाट प्रभाव असल्याने एका सच्चा पुरोगामी कार्यकर्त्याची जी छबी उमटलेली असते ती छबी भाई किशनराव देशमुख यांच्यात आजही जशास तशी दिसते;नव्हे तर ती समाज मनात आज यारूढ झालेली रुजलेली आहे. एका चाळीस घराच्या खेडेगावात जन्मलेल्या व्यक्ती स्वकर्तुत्वावर वक्तृत्वाच्या जोरावर आणि पुरोगामी विचारसरणी जोपासत सबंध महाराष्ट्रभर नावलौकिक कमवतो हे निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे.सातत्याने पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीत अग्रगण्य रहात आमदार,मंत्री अशा विविध राजकीय पदावर काम करत आपल्या कार्याची छाप समाज मनावर सातत्याने भाई किशनरावजी देशमुख यांनी कोरले आहे. विधानसभेमध्ये जेव्हा ते भाषणाला उठायचे तेव्हा सत्ताधाऱ्या बरोबर विरोधक सुद्धा त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे विधिमंडळातील प्रश्न ऐकण्यासाठी आतुर असत. किंबहुना एखाद्या नवीन विधेयकावर जर चर्चा करायची असेल तर ओपनिंग बॅट्समन म्हणून भाई किशनरावजी देशमुख सभागृहात उतरायचे हे संबंध महाराष्ट्र पाहिजे ऐकल आहे.म्हणून अशा या लढवय्या कार्यकर्त्याच्या जीवनाच्या सुरुवातीपासून पदोपदी असलेला संघर्ष, नामांतराच्या प्रश्नाबाबत घेतलेली अतुलनीय भूमिका आणि कार्य राजकीय जीवनात सर्वसामान्यांच्या शेतकरी, कष्टकरी,उपेक्षितांच्या प्रश्नाबाबत विविध अंगाने विधिमंडळात, रस्त्यावर घेतलेली भूमिका या आजही संस्मरणीय आहेत. आपली वैचारिक बैठक प्रचंड वाचन,निर्व्यसनी, निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व हे उद्याच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे ठरणार आहे.अशा या वैचारिक व्यक्तीचे जीवन आणि कार्य दस्ताऐवज रूपाने जतन व्हावं त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या जीवन कार्याची खरी ओळख व्हावी म्हणून जीवन संघर्ष हा लेख प्रपंच करावासा वाटला ला याद्वारे निश्चितच भरकटलेल्या तरुणाईला आणि समाजाला नवदिशा दर्शन होईल अशी अपेक्षा मी पुस्तक लिहिताना व्यक्त केली होती.साधारणतः 250 पानाचा हा ग्रंथ म्हणजे भाई किशनराव देशमुख साहेबांच्या जीवन कार्याची छोटीशी ओळख असच याला म्हणता येईल.
मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा प्रश्न ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस विधानमंडळ सभागृहामध्ये हा ठराव मांडण्यासाठी अनेक आमदारांनी एक पाऊल माग घेतल्याचं बोलक चित्र होतं परंतु अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री नामांतरासाठी तयार असताना सभागृहामध्ये हा विषय मांडावा कोणी…?हा प्रश्न समोर आला असताना तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेबांनी वैचारिक बैठक असणाऱ्या भाई किशनराव देशमुख साहेबांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की,भाई…हा विषय सभागृहामध्ये तुम्ही मांडा आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव मांडणारे व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून भाई किशनराव नानासाहेब देशमुख होते हे या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावसं वाटतं.ते सुचक होते आणि मग सरकारने उठून त्यांनी अनुमोदन दिले.अशा पद्धतीचे एक पुरोगामी विचाराचा खंदा कार्यकर्ता चळवळीतला परिवर्तनवादी चळवळीचा बिनीचा शिलेदार भाई किशनराव देशमुख हे आहेत.अहमदपूर च्या शैक्षणिक विकासामध्ये ज्या महात्मा गांधी महाविद्यालयाचे नाव मोठ्या डौलाने घेतलं जातं त्या महात्मा गांधी महाविद्यालयाच्या संस्थापक सरचिटणीस म्हणून त्यांचं काम आहे. त्याचबरोबर अहमदपूर मध्ये लोकायत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमलाबाई देशमुख शाळा महाराष्ट्रात नावलौकिक आहे.चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालय असेल प्राथमिक शाळा असतील यांचे सूध्दा मोठे नांव आहे. अशा पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे कार्य अतुलनीय होते.साप्ताहिक सम्यक समता च्या वतीने मी प्रत्येक वर्षी दिवाळी विशेषांक प्रकाशित करत होतो त्या प्रत्येक दिवाळी अंकाला मोठी जाहिरात देऊन ते मला मदत करायचे.वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठी मला ते सातत्याने बळ द्यायचे.त्यांची ‘मराठवाड्याचा पाणी प्रश्न’,’मनूस्मृती एक विषमतावादी विद्रूप ग्रंथ’ असे ग्रंथ सम्यक समता प्रकाशनाच्या वतीने मी प्रकाशीत केले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अहमदपूर येथे पुरोगामी साहित्य संमेलन सुद्धा आम्ही भरवलेलं होतं. विवेक वाहिनीचं महाराष्ट्राचं दोन दिवसीय शिबिर अहमदपूर येथे घेता आले. त्यांच्याच मुळे मला महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून सलग पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली.या काळात मला सूसज्ज ग्रंथालय लाभले आणी मी माझी पीएच.डी करू शकतलो.भाई किशनराव देशमुख साहेब म्हणजे एक वैचारिक अधिष्ठान असणारे महाराष्ट्रातील एक मोठं नाव.मला त्यांचा खूपच सहवास लाभला.प्रत्येक दिवशी किमान तासभर आम्ही वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायचो. अनेकांना प्रश्न पडायचा सिद्धार्थ आणि भाईसाहेबांचं काय चालू आहे…??? त्यांच्यात रोज बैठका होत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,राजकीय अशा विविध विषयावर त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं… आमच्यात चर्चा व्हायच्या. यातून वैचारिक प्रगल्भता विकसीत होत गेली.माझ्या नगरपालीकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाईसाहेबांची मोलाची मदत राहिलेली आहे.जेंव्हा मी तासिका तत्त्वावर कामावर होतो तेव्हा त्यांनी निवडणूक लढवन्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले होते.एकूणच काय खऱ्या अर्थाने मला शैक्षणिक क्षेत्रात आधार देण्याचे मोलाचे काम भाई किशनराव देशमुख साहेब करू पाहत होते.आज महात्मा गांधी महाविद्यालयातील किमान 25 ते 30 टक्के ग्रंथ भाईसाहेबांनी वाचून काढलेले आहे.या प्रत्येक ग्रंथावर भाईसाहेबांनी काही गोष्टी अंडरलाईन केलेले आहेत.त्यावरून वाचनाची त्यांना किती आवड होती हे आपल्याला लक्षात येऊ शकेल.कोरोना काळाच्या नंतर भाईसाहेबाचे प्रकृती आणखी बिघडली.ते अंथरुणावर पडून असायचे मात्र हातात त्यांच्या कायम पुस्तक असायचे. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या उशाला पुस्तक आणि पेन मी पाहिलेला आहे.खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना जपणारा,आपल्या माणसांना मोठा करणारा माणूस या मतदारसंघातून आज हरवले आहेत.त्यांनी आपल्या आत्मचरित्राच्या शेवटच्या ओळीत सुद्धा सांगीतलं होतं…The woods are lovely dark and deep,But I have many promises to keep And I have to go to miles and miles before I sleep..जीवन हे सुंदर आहे.तसेच ते अंधकारमय व अगाध आहे.जीवनाची आणि समाजाची मला अनेक वचनं पूर्ण करायची आहेत.झोपण्यापूर्वी अनेक मैलाचा मला अजून प्रवास करावयचा आहे.अशी त्यांची आशावादी भूमिका मला प्रेरणादायक अशीच आहे.तसेच ‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ पण एक परिवर्तनवादी चळवळीचा पाईक म्हणून माझ्या जीवनाची आठवन राहिली तरी मला समाधान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.भाईसाहेबांचे नांव परिवर्तनवादी लढ्यातील एक बिनीचे शिलेदार,सच्चा पूरोगामी अशी अजरामर राहील किंबहूना त्यांचे नांव मतदारसंघाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहीले जाईल यात शंका नाही.भाईसाहेब…आपल्या कार्याला,आपल्या परित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो…काका अलविदा..!!
–डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,अहमदपूर जि.लातूर8180013511