लातूरच्या रेल्वे आरक्षण केंद्राचे अमृत योजनेतून
अत्याधुनिक सेवा सुविधेसह नूतनीकरण होणार
पत्रकारांना पूर्ववत प्रवास सवलत देण्याची केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे शिफारस-कातळे
लातूर -( वृत्तसेवा) लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राचे अमृत योजनेतून अत्याधुनिक सेवा सुविधासह नूतनीकरण लवकरात लवकर करण्यात येणार असून अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात पूर्ववत सवलत देण्याची शिफारस केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य चंद्रकांत कातळे यांनी दिली.
मध्य रेल्वे विभागाच्या क्षेत्रीय रेल्वे सल्लागार (झेडआरयुसीसी) समितीची 125 वी बैठक समितीचे अध्यक्ष तथा मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री रामकरणजी यादव यांच्या अध्यक्षतेखाली 1 ऑगस्ट रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाली या बैठकीस समिती सचिव तथा वरिष्ठ उपमहाप्रबंधक श्री अभय मिश्रा, उपमहा प्रबंधक अमितकुमार मंडल, श्रीमती मुदलियार सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीस लातूर येथील समितीचे सदस्य चंद्रकांत कातळे आणि शामसुंदर मानधना सहभागी झाले होते.
लातूर येथील नवीन रेल्वे स्थानक अस्तित्वात आल्यापासून जुन्या रेल्वे स्थानक परिसरात असलेले रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रांची अवस्था अत्यंत बिकट असून त्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आरक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही, लिहिण्यासाठी टेबल, लाईट असून प्रकाश नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी यासह कसल्याही प्रकारची सुविधा नाही आरक्षण केंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ताही नाही असा प्रश्न चंद्रकांत कातळे यांनी उपस्थित केला असता समितीचे अध्यक्ष श्री रामकरण यादव यांनी सदरील आरक्षण केंद्राचे अमृत योजनेतून लवकरच अत्याधुनिक सोयी सुविधेसह नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
त्याचबरोबर अधिस्वीकृती पत्रकारांना कोरोना काळात बंद केलेली रेल्वे प्रवास सवलत पूर्ववत देण्याची मागणी केली असता, सवलत देण्याचा अधिकार केंद्रीय रेल्वे बोर्डाला असल्याचे सांगण्यात आले तेव्हा या बैठकीत अधिस्वीकृती धारक पत्रकारांना प्रवास सवलत पूर्ववत देण्याची शिफारस केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे ठरावाद्वारे या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली.
विविध नवीन रेल्वे गाड्या बाबतचा प्रश्न केला असता लातूर रेल्वेस्टेशनकरिता मंजूर झालेल्या पीट लाईनचे काम पूर्ण होताच आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक रेल्वे गाड्या लातूर स्थानकातून देशभराच्या विविध भागात सुरू होतील. असे सांगून बहुतांशी महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेशातील काही भाग आणि ईशान्य कर्नाटक राज्य अशा मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात मध्य रेल्वे दररोज सरासरी ३७४ मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि १४५ पॅसेंजर/मेमू/डेमू गाड्या चालवते, ज्यात दररोज सरासरी ५.२ लाख प्रवासी प्रवास करतात. वन स्टेशन वन प्रॉडक्ट या योजनेद्वारे स्थानिक उत्पादित मालाच्या विक्रीसाठी मध्य रेल्वेने 159 स्टॉल सुरू केले आहेत अशी माहिती समिती अध्यक्ष यादव यांनी बैठकीत दिली.
या बैठकीत समिती सदस्यांनी रेल्वे संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. प्लॅटफॉर्म विस्तार, अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत कामे, गाड्यांचा वक्तशीरपणा आणि नवीन गाड्यांच्या मागण्यांसह अनेक सूचना केल्या. सदस्यांच्या सूचनांना महत्त्व आहे. रेल्वेला प्रवाशांसाठी सेवा अधिक चांगली होण्यास मदत होते. सर्व सूचनांचे परीक्षण केले असून त्यावर सविस्तर विचारविनिमय केल्यानंतर अंमलबजावणी करण्याचे बैठकीचे अध्यक्ष तथा महाव्यवस्थापक यांनी आश्वासन देऊन प्रवाशांची यात्रा सुखद आणि सुलभ व्हावी यासाठी मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अथक प्रयत्न केले जात आहेत असे बोलून दाखवले.