*एआययू आणि एमजीएम विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अ.भा.आंतरविद्यापीठ सायकलिंग रोड स्पर्धा*
औरंगाबाद; (प्रतिनिधी ) —
भारतीय विद्यापीठ संघटना (एआययू), सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि एमजीएम विद्यापीठ, औरंगाबादच्या वतीने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सायकलिंग रोड स्पर्धेत मंगळवारी पुरुष गटाच्या ३९ किलोमीटर वैयक्तिक टाइम ट्रायल प्रकारात पटियालाच्या पंजाब विद्यापीठाचा खेळाडू हर्षवीरसिंग शेखान याने तर महिला गटाच्या २० किलोमीटर वैयक्तिक टाइम ट्रायल प्रकारात बेळगावच्या राणी चनम्मा विद्यापीठाच्या चैता बुरजी हिने विजेतेपद पटकावले.
मंगळवारी सकाळी ७ वाजता औरंगाबाद शहराजवळील धुळे-सोलापूर महामार्गावर देवळाई येथून स्पर्धेला सुरुवात झाली. एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा प्रारंभ केला. सुरुवातीला ३९ किलोमीटर वैयक्तिक टाइम ट्रायल स्पर्धा पार पडली. यामध्ये एकूण ६८ खेळाडूंनी सहभाग घेतला. यात पटियालाच्या पंजाब विद्यापीठाचा खेळाडू हर्षवीरा सिंग शेखान याने ५३ मिनिटे १८ सेकंद आणि २६४ मिलीसेकंद वेळेत ३९ किलोमीटर अंतर गाठत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. याच गटात पंजबामधील गुरुनानक देव विद्यापीठाचा खेळाडू दीपांशू याने ५४ मिनिटे ३५ सेकंद आणि ४४० मिलीसेकंदासह द्वितिय तर कुरुक्षेत्र विद्यापीठाचा खेळाडू रोहितने ५५ मिनिटे १ सेकंद आणि ३२० मिलीसेकंदाच्या अवधीसह तिसरा क्रमांक पटकावला.
महिला गटाच्या २० किलोमीटर वैयक्तिक टाइम ट्रायलमध्ये एकूण ४१ खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये बेळगावच्या रानी चनम्मा विद्यापीठाच्या चैता बुरजीने ३१ मिनिटे ८ सेकंद आणि ७२ मिलीसेकंदात अंतर पूर्ण करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या गटात पंजाबमधील गुरुनानक देव विद्यापीठाची खेळाडू पूजा दानोले हिने ३१ मिनिटे २७ सेकंद आणि ७०९ मिलिसेकंदासह दुसरे तर बिकानेरच्या महाराजा गंगासिंग विद्यापीठाची खेळाडू कविता सियाग हिने ३१ मिनिटे ४३ सेकंद आणि ५२० मिलीसेकंदासह तिसरे स्थान पटकावले. दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेपासून पुरुष आणि महिला गटातील पुढील स्पर्धा होईल. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सायलकिंग असोसिएशन, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, औरंगाबाद ग्रामीण पोलिस, स्पर्धा व्यवस्थापक प्रताप जाधव, धर्मेंद्र लांबा, स्पर्धा संयोजक डॉ. रवींद्र देशमुख, डॉ. दिनेश वंजारे, प्रा.शशिकांत सिंग, निलेश हारदे, सदाशिव झवेरी, रहीम खान, सुरक्षा प्रमुख खान तसेच तांत्रिक समिती सदस्य, पंच आदी मेहनत घेत आहेत.
अ.भा.आंतरविद्यापीठ सायकलिंग रोड स्पर्धेचे दि.१४ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान सोलापूर-धुळे महामार्गावर देवळाई चौक ते झाल्टा फाटादरम्यान आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सायलकिंग असोसिएशन, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, औरंगाबाद ग्रामीण पोलिस विभागाचे सहकार्य मिळाले आहे. स्पर्धेत देशभरातील ४८ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले असून यात ३९० खेळाडूंचा समावेश आहे. त्यापैकी २६० पुरुष व १३० महिला खेळाडू आहेत. ही स्पर्धा महिला गटात २० किमी वैयक्तिक, ३० किमी सांघिक, ५० किमी मॅस्ड स्टार्ट प्रकारात तर, पुरुष गटात ४० किमी वैयक्तिक, ५० किमी सांघिक, क्राईटेरिअम रेस प्रकारात होत आहे.