मुरुड ( वृत्तसेवा ): निजाम संस्थानापूर्वी मराठवाड्यातील राष्ट्रकूट व यादवराजांनी संबंध भारतावर राज्य केले. मराठवाड्याने मराठी संस्कृती, साहित्य, भाषा व संतांचा सहिष्णुतेचा विचार दिला. सामाजिक, धार्मिक ऐक्याची मुहुर्तमेढ संतांच्या विचारात आहे.पण १७२४ पासून निजाम संस्थानाने मराठवाड्याची गळचेपी केली.सर्वक्षेत्रात आघाडीवर असलेला मराठवाडा रसातळाला गेला.१७ सप्टेंबर १९४८ आपण हैदराबाद संस्थानातून मुक्त झालो त्याला पंच्याहत्तर वर्ष झाली तरी मराठवाड्याची उपेक्षा थांबली नाही. असे प्रा. डॉ. जयद्रथ जाधव संभाजी महाविद्यालय मुरूड येथे १७ सप्टेंबर हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित व्याख्यानातून बोलत होते.
हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अनंत पिडगे होते. तर समाज जागृती शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.श्री व्ही. वाय. पाटील, संचालक श्री फुलचंद हिंडले,मा.दीपक पटाडे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते डॉ. जयद्रथ जाधव म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.५६५ संस्थानां पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड हे तीन संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात सामाविष्ट होत नव्हती.भारत सरकारने थोडासा दबाव दाखवताच जुनागड व कश्मीर संस्थान स्वतंत्र भारतात सहभागी झाले. पण हैदराबाद संस्थानाचा निजाम मीर उस्मानअली संस्थानाला सार्वभौम संस्थान करून स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ पाहत होता. परंतु जनतेच्या मनात क्रुर,अन्यायी संस्थानातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा होती.कासीम रझवी याने रझाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या साह्याने जनतेवर अमर्याद अत्त्याचार केले.
मात्र हा संघर्ष हिंदू – मुस्लिम विरोधी संघर्ष नव्हता तर हा संघर्ष अन्यायाविरुद्ध न्यायाचा होता, असमतेविरुद्ध समतेचा होता. अशा निजामांच्या विरोधात पू. स्वामी रामानंद तीर्थ यांनी लढा दिला. या मुक्ती लढ्याची नायक एकमेव स्वामी रामानंद तीर्थ होते. स्वामीजींच्या आंदोलनाला मराठवाडा, आंध्र आणि कर्नाटका मधील स्वातंत्र्य सैनिकांनी मोठी साथ दिली.हा लढा आर्य समाज, हिंदू महासभा, स्टेट काँग्रेस, किसान दल, वंदे मातरम विद्यार्थी चळवळ व महिला आंदोलकांनी उस्फुर्त सहभागातून सशस्त्र लढा दिला.कोणत्याही संकटाची पर्वा केली नाही.विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् चळवळीतून निजाम संस्थानाच्या विरोधात जन आंदोलन उभे केले. यामुळे निजाम संस्थानातून मुक्त होण्याच्या मागणीला मोठा जोर मिळाला आणि पोलीस कारवाईनंतर हैदराबाद संस्थानातून आपण मुक्त झालो. १९६० ला संयुक्त महाराष्ट्रात आम्ही विना अट सामील झालो. परंतु मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष आज पर्यंत ही पूर्ण झाला नाही. स्वतंत्र भारतात मराठवाड्याच्या वाटेला मोठी उपेक्षाच आलेली आहे. मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा इतिहास लिहिण्याचा प्रकल्प आजही पूर्ण झालेला नाही. मुक्ती संग्रामाचा आजपर्यंत समोर आलेला इतिहास अत्यंत विखुरलेल्या स्वरूपात आलेला आहे. मराठवाड्यातील राजकीय नेतृत्वाने एकजूट दाखवून मराठवाड्याच्या नशिबी बसलेला मागासलेपणाचा शिक्का दूर करून उपेक्षा थांबवावी असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.अनंत पिडगे यांनीही मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या इतिहासावरती प्रकाश टाकून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.बिडवे, प्रा. मधुकर क्षीरसागर, प्रा. एम. बी. गायकवाड, प्रा.ए.व्ही. सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर क्षीरसागर यांनी केले तर आभार आयक्युएसीचे समन्वयक प्रा. एम.बी. गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खूप सुंदर कव्हरेज दिले आहे.आपले आभार 🙏🙏🙏