इचलकरंजी/प्रतिनिधी –
न्यू जनरेशन इनोव्हेटिस्ट स्कूलमध्ये शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग सायंटिस्ट’ नामक एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे आणि त्यांना प्रेरणा देणे हाच या या स्पर्धा आयोजनामागचा उद्देश होता. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेत विज्ञान विषयाशी संबंधित वर्किंग मॉडेल्स बनविले होते.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांचे सादरीकरण करत असताना त्या प्रयोगामागील मुख्य कल्पना, ते मॉडेल कार्य कसे करते तसेच त्याचे फायदे आणि तोटे उदाहरणांसह विषद करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेसाठी पालकांनी आपल्या पाल्याला विषय निवडण्यासाठी मदत करतानाच प्रयोगासाठी लागणारे साहित्यही पुरविले.
याच स्पर्धेचा दुसरा भाग म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भारती विद्यापीठाचे फिजिक्स विषय तज्ञ दादा पांडुरंग नाडे यांनी विद्यार्थ्यांना भावी वैज्ञानिक बनण्यासाठी प्रोत्साहित केले आणि विज्ञान क्षेत्रातील संशोधनाबद्दल अधिक ज्ञान देवून मोलाचे मार्गदर्शन केले.
स्पर्धा पाहण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या कल्पना शक्तीचे कौतुक करण्यासाठी शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. विजया मोहन, दादा नाडे, शाळा कार्यकारिणी समिती सदस्य राजेंद्र माने, मिरॅकल ग्रीनचे आशिष आडमुठे, रोहित गायकवाड, तसेच शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.