आवर्तन संगीत महोत्सव
संगीत हे आत्मानंदाचे साधन आहे – मा. दिलीपराव देशमुख
लातूर ; दि. ( प्रतिनिधी )-–
संगीत मनोरंजना बरोबर आत्मानंदाचे साधन आहे. त्यामुळे आवर्तन प्रतिष्ठान व अष्टविनायक प्रतिष्ठान यांच्यावतीने चालू असलेली अभिजात संगीत प्रचाराची चळवळ अविरत सुरू रहावी , असे प्रतिपादन माजी मंत्री व आवर्तन शतकपूर्ती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले.
अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने मागील 99 महिन्यांपासून आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने मासिक संगीत सभा अविरत सुरू आहेत. शतकपूर्ती संगीत महोत्सव आजपासून दयानंद सभागृहात सुरू झाला.. शनिवार दिनांक 24 व रविवार दिनांक 25 जून 2023 या दोन दिवसीय होणाऱ्या संगीत महोत्सवामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलावंतांची हजेरी लागणार आहे.
दि. 25 जून 2023 रोजी जयपुर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे यांचे गायन व उस्ताद शाकीर खान यांचे सतार वादन सादर होणार आहे.
या सर्व कलावंतांना तबला संगत पं. मुकेश जाधव, पं. मुकुंदराज देव ,श्री. प्रशांत पांडव , संवादिनी संगत श्री अभिनय रवंदे श्री. विशाल मिश्र तर सतार साथसंगत श्रीमती अलका गुर्जर या करणार आहेत.
पद्मश्री एम वेंकटेश कुमार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संगीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. स्वरमंचावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी, सौरभ व गौरव मिश्र, आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ रविराज पोरे, कार्यक्रम प्रमुख विशाल जाधव, अतुल देऊळगावकर, डॉ अजित जगताप, डॉ संदीपान जगदाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शशिकांत देशमुख यांनी केले.
तबलावादक तेजस धुमाळ याला पंडित शांताराम चिगरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून देण्यात येणारा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर शर्वरी डोंगरे ही अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या माध्यम प्रथम या परीक्षेत भारतातून सर्वप्रथम आल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.
शतकपूर्ती संगीत महोत्स वाची सुरुवात सौरभ व गौरव मिश्रा यांनी बनारस शैलीचे दर्शन घडवीत कथ्थक नृत्याचे अप्रतिम सादर केले. प्रारंभी रूपक तलातील शिव स्तुती ‘ओम नमो शिवाय इस संसार मे शिव आधार है‘ सादर केली. उठान तोडे, तत्कार,विविध तीहाई इत्यादींने नृत्यात मोठी रंगत आणली. नर्तकाचे घुंगरू प्रेक्षकांच्या टाळ्या व मुकुंदराज देव यांच्या तबल्याची जुगलबंदीने श्रोत्यात भावविभोर अवस्था आणली. नृत्याची सांगता ठुमरी सम्राज्ञी गिरिजा देवी यांच्या दिवाना किये शाम, क्या जादू डाला‘ या दादरा तालातील ठुमरी वर भावपूर्ण नृत्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
त्यांना मुकुंदराज देव यांनी केलेली तबला साथ तेवढीच तोलामोलाची ठरली. पखवाज साथ वैभव मांगकर यांनी केली तर अलका गुर्जर यांनी सतारीची साथ करून नृत्यात रंगत आणली.
ग्वाल्हेर व आग्रा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पद्मश्री एम वेंकटेश कुमार यांनी मारू बिहाग या रागात ‘ रसिया हो न जा ‘ ही बंदिश विलंबित एकतालात सादर करून श्रत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्याचे प्रशांत पांडव यांनी केली तर संवादिनी साथ अभिनय रवंदे यांनी केली. त्यांना तानपुरा साथ शिवराज पाटील व बस्वराज हिरेमठ यांनी केली.