भावपूर्ण श्रद्धांजली
भारतरत्न लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण, पु ल देशपांडे, गोविंदराव तळवलकर, शरद पवार, हृदयनाथ मंगेशकर… या आणि अशा अनेक मान्यवरांना आपल्या रानातल्या कवितांची भुरळ पाडणारे नामवंत निसर्गकवी आणि प्रगतिशील शेतकरी ना. धों. महानोर यांचे निधन वेदनादायी आहे.
बॉलीवूडमधील श्रेष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या दुःखातून महाराष्ट्रातील कलाक्षेत्र सावरले नसताना महाराष्ट्राला हा दुसरा हादरा बसला आहे.
शंकर पाटील, रा रं बोराडे, आनंद यादव असे ज्येष्ठ साहित्यिक आपल्या साहित्य कृतींमधून ग्रामीण जीवनाचे चित्र रेखाटत असताना साठोत्तरी काळात महानोर नावाचा अद्भुत प्रतिभेचा धनी असलेला रानकवी आणि निसर्गकवी पुढे आला. काव्य संमेलने गाजवू लागला. पळस खेड्यातील त्यांच्या शेतावर मैफली जमू लागल्या. यशवंतराव, शरद पवार, गोविंदराव तळवलकर, पु ल देशपांडे असे दिग्गज लोक आपला ताम झाम सोडून केवळ त्यांच्या कविता ऐकण्यासाठी पळसखेडा येथे आवर्जून जाऊ लागले. अल्पावधीतच ते महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले.

महानोर यांची रानातल्या कविता, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, पानझड, कवितेतून गाण्याकडे, अजिंठा, सुलोचनेच्या पाऊसखुणा अशी अनेक पुस्तके तेव्हा आवर्जून घेतली होती. वर्षा सहली किंवा कृषी पर्यटन अशा गोष्टी अलीकडच्या काही वर्षात प्रचलित झाल्या. पण महानोर यांनी पन्नास वर्षांपूर्वी आपल्या कवितेच्या माध्यमातून अनेकांना निसर्गाच्या सानिध्यात नेले. मराठी माणसांच्या मनात निसर्गप्रेम रुजवले.
कवितांसोबतच आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती… ही त्यांनी लिहिलेली गीतेही अजरामर झाली.
आपल्या शेतीतही त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना नवी दिशा दिली. शरद पवार यांच्या आग्रहामुळे सहा वर्षे ते विधान परिषदेचे राज्यपालनियुक्त सदस्य बनले. त्या काळात शेती आणि शेती प्रश्नाशी निगडित विविध मुद्द्यांचा वेध घेणारी त्यांची परिषदेतील भाषणेही लक्षवेधी ठरली होती.
निसर्गावर मनापासून प्रेम करणाऱ्या या रानकवीने सर्वांच्या आवडत्या श्रावण महिन्यातच या जगाचा निरोप घेतला.
महानोर यांना आदरांजली.

- राजीव कुळकर्णी
जेष्ठ पत्रकार, ठाणे