मतदान प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षक, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची – निवडणूक सामन्य निरीक्षक निरंजन कुमार
लातूर, दि. २३( वृत्तसेवा ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सूक्ष्म निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका आयरे उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुक्ष्म निरीक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांच्या मतदान प्रक्रियेतील कामाविषयी माहिती देण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
मतदानाची गोपनियता पाळणे हे अत्यंत महत्वाचे असून त्यादृष्टीने मतदान केंद्रावर चालणाऱ्या सर्व कार्यवाहीवर सूक्ष्म निरीक्षकांनी लक्ष ठेवावे. यामध्ये काही चूक आढळून आल्यास किंवा गैरप्रकार घडल्यास निवडणूक सामान्य निरीक्षकांना अवगत करावे. मतदान यंत्र हे आदर्श मतदान केंद्राच्या नियमानुसार ठेवले असल्याची खात्री करावी. तसे नसल्यास संबंधित यंत्रणेला सूचित करावे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, वीज व इतर किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याची खात्री करावी, अशा सूचनाही निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी दिल्या.

सूक्ष्म निरीक्षकांचे काम आव्हानात्मक आहे, त्यामुळे सर्वांनी सतर्कतेने काम करावे. लातूर लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेत दोन बॅलेट युनीट लागणार असल्याने बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट जोडणीत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची खात्री सूक्ष्म निरीक्षकांनी करावी. ८५ वर्षेपेक्षा अधिक वय असलेले, ४० टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचे मतदान त्यांचे घरी जावून करून घेण्यात येणार आहे. यावेळीही सूक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती राहणार असून या प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
या प्रशिक्षण सत्रात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी, याबद्दल सूक्ष्म निरीक्षक, तसेच क्षेत्रीय अधिकारी यांना विस्तृत स्वरूपात मार्गदर्शन केले. दोन बॅलेट युनिट वापरण्यात येणार असल्याने त्याबाबतची तांत्रिक माहिती, मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सील कसे करावे, मतदान ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या ओळखपत्राच्या आधारे मतदान करून घ्यावे. तसेच मतदान सुरू होण्यापुर्वी ९० मिनिटे अगोदर मॉक पोलची प्रक्रिया पार पाडावी, यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी वेळेत मतदान केंद्रावर पोहचावे, अशा सूचना दिल्या.