“’मी हे करु शकतो’ हा आत्मविश्वासच यशापर्यंत घेऊन जात असतो” – निलेश गायकवाड यांचे मत
लातूर दि.27.09.2021 दयानंद कला महाविद्यालय संशोधन विभागाच्या वतीने आयोजित करिअर डेव्हलपमेंट अतंर्गत आय.ए.एस.गुणवत्ता प्राप्त निलेश गायकवाड यांच्याशी संवाद साधण्यात आला.निलेश गायकवाड यांनी यु.पी.एस.सी.परीक्षेत भारतीय स्तरावर 629 वा रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. आय.आय.टी.मुंबई येथून केमिकल इंजिनीअरिग मध्ये बी.टेक.आणि एम.टेक झालेले निलेश गायकवाड बेंगलोर येथे झीनोव्ह कंन्सलटन्सी या कंपनीमध्ये सेवेत असताना ही यु.पी.एस.सी.चे ध्येय ठेवले आणि जिद्दिने अभ्यास करून हे यश संपादन केले.
करीअर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत अशा गुणवंत व्यक्तीचा सत्कार करून कौतुक करण्याबरोबरच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा या साठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ.सुनीता सांगोले यांनी प्रास्ताविक मांडताना निलेश गायकवाड यांचा परिचय करून दिला कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ध्येया प्रती अखंड ध्यास घ्यावा लागतो. परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागते. निलेश गायकवाड हा जिद्दिचा प्रवास करताना निराशेचा वारा न लागू देता स्वत:च्या मनातला राजहंस जागा ठेवला सकारात्मक दृष्टीकोनातून ध्येयाप्रती चाललेल्या त्यांच्या प्रवासात कुटुंबीयांचा ही हतभार असतो. वडिल डॉ.श्रीकांत गायकवाड आणि आई डॉ.अनिता गायकवाड उभय समाजशास्त्राचे प्राध्यापक त्यामुळे समाजाशी अनुबंध राखण्याचे बाळकडू कुटुंबातच मिळाले म्हणूनच की काय एका चांगल्या पगाराच्या कंपनीच्या नोकरीत निलेश च मन लागले नाही समाजासाठी काही तर करायचे म्हणून त्यांनी यु.पी.एस.सी. करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या प्रवासाचे सुतोवाच करून डॉ. सुनीता सांगोले यांनी डॉ.अनिता गायकवाडआणि श्री. निलेश गायकवाड यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली.
डॉ .अनिता गायकवाड यांनी मुलाच्या या शैक्षणिक प्रवासात त्याची जिद्द व प्रेरणा महत्वाची आहे. या काळात मित्र, स्नेही, खेळ, मनोरंजन सारे विसरुन तो एकटा अभ्यास करायचा. आजचे हे यश अनुभवताना मला खूप आनंद होतो त्याच्या या शैक्षणिक वाटचालीत आम्ही कुटुंबीया बरोबरच त्याचे शिक्षक वृंद आणि स्नेही जणांचा ही खूप मोठा हातभार आहे. त्यांच्या पाठबळामुळेच निलेश यशापर्यंत पोहोचू शकला असे मला वाटते. असे मनोगत व्यक्त करून अनिता गायकवाड यांनी या वाटचालीत डॉ. श्रीकांत गायकवाड वडील म्हणून सातत्याने मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याबद्दलही अंतस्थ व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. शिवाजी गायकवाड यांनी निलेश गायकवाड यांच्या या यशाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आई-वडील कसे प्रेरक आहेत याबद्दलचा स्वतःचा अनुभवही व्यक्त केला. माझ्या स्वतःच्या जडणघडणीत सुद्धा डॉ. श्रीकांत गायकवाड यांचे योगदान आहे. त्यांच्या मुलाच्या बाबतीत तर तेच प्रेरणास्थानी होते. निलेश मराठी माध्यमातून लातूरच्या भूमीतून वडिलांच्या आईच्या शिस्तीत तयार झालेला मुलगा. अगदी मुळापासून अत्यंत सुसंस्कृत वाढलेला नीलेश लहानपणापासूनच अभ्यासू मेहनती होता हे मी स्वतः पाहिले आहे आणि म्हणूनच आजही एवढे मोठे यश मिळवून तो जमिनीवर आहे. याचे श्रेय त्यांनी कुटुंबाला दिले आणि सोबतच निलेश गायकवाड यांचे कौतुकही केले. निलेश बरोबरच त्यांचे धाकटे बंधू शैलेश यांनाही अशाच प्रकारचे यश लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करून निलेशच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
निलेश गायकवाड यांनी लहानपणी आई-वडिलांनी लावलेली अभ्यासाचे शिस्त मला माझ्या भविष्यासाठी खूप उपयोगी ठरली. आधी प्रयत्नांनी आयआयटीला प्रवेश मिळवला. त्यात यशस्वी होऊन नोकरीतही लागलो पण नंतर मला प्रशासकीय सेवेचे वेध लागले म्हणून मी पुन्हा कला शाखेतील विषय घेऊन यु. पी. एस. सी. साठी तयारी करत होतो. हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता पण आपण जेंव्हा करायचे ठरवतो तेव्हा तो तितका अवघडही नसतो. स्पर्धा परीक्षा तिचा निकाल ही गोष्ट अंदाजक्षम नसते तरीही स्वतःला त्या ध्येयाप्रती बांधून ठेवणे महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षेतील यश अनिश्चित असले तरी ‘ मी हे करू शकतो ‘ हा आत्मविश्वास यशापर्यंत घेऊन जात असतो. म्हणून मी स्पर्धा परीक्षेत इच्छिणाऱ्यांना सांगू इच्छितो की ध्येयाप्रती अढळ विश्वास हीच यशाची पायरी असते असे मानतो. मी मराठी माध्यमातून आलो, मी ग्रामीण भागातून आलो, मला भाषेचा संकोच आहे, माझी भाषा म्हणावी तितकी विकसित नाही, आपल्यामध्ये कोणत्याही उणिवा असोत या उणिवा शोधून त्यावर मात करत आपल्याला हे ध्येय गाठायचे असते. यासाठी प्लानिंग खूप महत्त्वाचे असते आणि ते करूनच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतील असे मला वाटते. निलेश गायकवाड यांनी सहज ओघवत्या भाषेमध्ये प्रामाणिकपणे आपल्या अनुभवाचे केलेली मांडणी विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल प्रस्तुत कार्यक्रमाची सांगता डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी निलेश गायकवाड यांच्या यशाचे कौतुक करत मान्यवरांचे आभार मानून केली. या करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम साठी महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ. सुनील साळुंके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ.दिलीप नागरगोजे, डॉ. अशोक वाघमारे, डॉ. युवराज सारणीकर, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. सचिन पतंगे, श्री विकास खोगरे कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, इतर प्राध्यापक प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी, विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पुढेही यू ट्यूब माध्यमातून हा कार्यक्रम पाहण्यास खुला आहे.