*निलंग्याच्या शेतकऱ्याचा टाहो*
*कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून न्याय देण्यासाठी आक्रोश*
निलंगा,-(प्रशांत साळुंके)- सध्या मराठवाड्यात पावसाची संततधार सुरूच आहे. मात्र यामध्ये नेहमीप्रमाणे शेतकऱ्याचेच आयुष्य पणाला लागले.
निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) या गावात श्री.वामन मारुतीराव सूर्यवंशी हे शेतकरी गट नंबर 463 येथे शेती करतात. काही महिन्यांपासून सर्व कुटुंबाने अपार मेहनत करून सोयाबीनचे पीक लावले आणि आता ते काढणीलाही आले होते. मात्र पावसामुळे या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. आलेल्या सर्व सोयाबीनच्या पिकाचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
झालेल्या या नुकसानीमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला असून या कुटुंबाने कृषी अधिकाऱ्यांना अक्षरशः टाहो फोडीत हाक दिली आहे की, आम्हाला न्याय द्या, आमच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्या.
कृषी अधिकाऱ्यांनी या शेतकरी कुटुंबाचा आणि अशाच प्रकारे नुकसान झालेल्या इतर शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत तात्काळ पंचनामा करावा आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.