29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeदिन विशेषनितीशाची यशोगाथा

नितीशाची यशोगाथा

।। जागतिक महिला दिन ।।

गोष्ट २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयपीएस होणाऱ्या नितीशाची

नितीशा संजय जगताप. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या भातगळी इथल्या नितीशाचा लोहारावासीयांना अभिमान वाटत आहे. अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या नितीशाचं कुटुंब मूळचं भातगळीचं.
नोकरीव्यवसायानिमित्त हे कुटुंब पुढे लातूरला स्थायिक झालं. माणसाच्या प्रगतीसाठी,सक्षमीकरणासाठी शिक्षण हेच माध्यम आहे, यावर नितीशाचे आईवडील संजय आणि अश्विनी यांचा ठाम विश्वास. त्यामुळे सुरुवातीपासून त्यांचं संपूर्ण प्राधान्य नितीशा आणि तिच्या बहिणीच्या शिक्षणाला होतं. त्यातूनच नितीशा सहाव्या वर्षांपासून आई व बहिणीसोबत पुण्यात राहू लागली.


”देशातली सर्वात लहान महिला आयपीएस म्हणून आज नितीशाचं कौतुक होत आहे, पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता.” अश्विनी जगताप सांगत होत्या. नितीशा लहानपणापासूनच अभ्यासू,हुशार जिद्दी. १० वी नंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेतला पण ११ वी संपतासंपताच मान आणि सामाजिक विज्ञान शाखांची अधिक आवड असल्याची जाणीव झाली. १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर जेईई मेन्समध्ये अपयश आल्यावर मात्र कला शाखेकडे जाण्याचं निश्चित झालं. आईबाबांनी तिचा निर्णय अत्यंत सहजतेनं स्वीकारला.
”यशाकडे कसं बघायचं ते कोणाला सांगावं लागत नाही. पण अपयशाकडे कसं बघायचं हे मात्र लहानपणापासून शिकवावं लागतं.” अश्विनीताई सांगत होत्या. ”आजच्या काळाचा, मुलांच्या भावविश्वाचा विचार केला तर मुलांना अपयशाकडे सकारात्मक दृष्टीनं बघायला शिकवणं खूपच आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक कठीण काळात आम्ही तुझ्यासोबत आहोत, हा विश्वास मुलांना द्यायला हवा. अपयश कितीही मोठं असलं तरी आपण मिळून ते पुसू आणि परत यशाचा प्रयत्न करू, हा विश्वास मिळाला की मुलांना एकटं वाटत नाही. ती कुठल्याही अडचणीवर मात करू शकतात.”


नितीशानं मग कॉलेज सुरू असतानाच यूपीएससीसाठी तयारी सुरू केली. आईमुळे वृत्तपत्र, सीएसआर, मनोरमा वाचण्याची सवय आणि आवड होतीच. कला शाखेच्या विषयांची जोड मिळाली. व्यवस्थेत राहून समाजातल्या गरजू लोकांना मदत करण्याच्या इच्छेतून प्रशासकीय सेवेसाठी तिने प्रयत्न सुरू केले. हे सुरू असतानाच फर्ग्युसन महाविद्यालयातून ती बीए (सायकॉलॉजी) झाली.


सप्टेंबर २०२१ मध्ये नागरी सेवा परीक्षेत देशात १९९ व्या क्रमांकानं ती उत्तीर्ण झाली. सध्या मसुरीत तिचं प्रशिक्षण सुरू असून हैदराबाद इथल्या नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये २६ मार्चपासून वर्षभराचं प्रशिक्षण सुरू होईल.
नितीशाचे अभिनंदन आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !

(साभार :नवी उमेद ,फेसबुक)

लेखन:गिरीश भगत,उस्मानाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]