लातूर – परस्परांत प्रेम आणि नातं नाटकामुळेच जोडलं गेलं असलं, तरी आपलं पहिलं प्रेम नाटकच असल्याचं मनमोकळं प्रतिपादन प्रख्यात दिग्दर्शक-अभिनेता मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत-कदम या नाट्यक्षेत्रातील अत्यंत लाघवी व लोभस जोडप्यानं केलं. मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं ‘नाट्यस्पंदन प्रतिष्ठान’ या लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील रंगकर्मींच्या संस्थेतर्फे आयोजित ‘संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
या ‘संवादा’दरम्यान त्यांनी त्यांच्या नाट्यप्रवासाची वाटचाल श्रोत्यांसमोर अगदी दिलखुलास व्यक्त केली. लहानपणापासून जपलेले नाट्यवेड, ‘निनाद’ सारख्या संस्थेने दिलेले प्रोत्साहन व व्यासपीठ इथपासून ते अनेक यशस्वी नाट्यप्रयोगांसह अलीकडच्या झी नाट्यगौरव पुरस्कार व अखिल भारतीय नाट्य परिषदेने दिलेला विशेष नाट्यसेवा पुरस्कार या संपूर्ण प्रवासाचा मागोवा त्यांनी या छोट्या कार्यक्रमात अगदी प्रांजळपणे सांगितला. या नाट्यप्रवासातील आलेले अनुभव, शिकायला मिळालेल्या शिदोरीची उकल, हौशी आणि व्यावसायिक तसेच प्रायोगिक रंगभूमीचे अंतरंग, दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे अद्वैत नाते, अशा अनेक विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
आपल्यासह अनेक रंगकर्मींच्या उमेदवारीच्या काळातील व कोरोनाकाळातील संघर्षाची आठवण करत त्यांनी जाणिवेने नाट्यस्पंदनच्या उपक्रमांचे कौतुकही त्यांनी केले. रंगभूमी ही कलावंतांची जीवनरेखा असते आणि रंगभूमीवर येणारे अनुभव आयुष्य शिकवतात; त्यादृष्टीने आम्ही दोघे नाट्यचळवळीच्या कुठल्याही टप्प्यावर सहकार्य करण्यास तयार असतो, अशी ग्वाहीही दिली. यावेळी त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना अगदी मन:पूत उत्तरं दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी बालरंगभूमी ही नुसते कलाकारच नव्हे, तर उत्तम जाणकार प्रेक्षकही तयार करण्याचं काम करू शकते, असंही मत व्यक्त केलं. हल्ली उत्तम प्रेक्षक मिळणे, हीही एक गरज निर्माण झाल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सचिंतपणे सांगितलं. उभयतांच्या यशस्वी कारकिर्दीच्या वलयासोबतच सहज स्वभावानं मंगेश कदम आणि लीना भागवत यांनी लातूरच्या नाट्यकलावंतांची मनं जिंकली.
लातूर येथे अन्य कार्यक्रमासाठी हजर असलेल्या मंगेश कदम आणि लीना भागवत यांचा सत्कार नाट्यस्पंदनच्या वतीने अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड, डॉ. ज्योती सूळ, डॉ. उमा देशपांडे यांनी केला. सचिव डॉ. मुकुंद भिसे यांनी प्रास्ताविक करून ‘नाट्यस्पंदन’च्या वाटचालीबाबत अवगत करत या वाटचालीची चित्रफीत सादर केली.
‘नाट्यस्पंदन’तर्फे आयोजित या चर्चेत शहरातील नामवंत कलावंत श्रुतिकांत ठाकूर, बाळकृष्ण धायगुडे, शिरीष पोफळे, संजय अयाचित, अनिल कांबळे, उमा व्यास, शुभदा रेड्डी, बालनाटककार सुनिता देशमुख, डॉ. जयंती आंबेगावकर, डॉ. अर्चना कोंबडे, सुवर्णा बुरांडे, रंगभूषाकार भारत थोरात, नंदकिशोर वाकडे, गणेश पवार यांसह ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर आदी प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पदाधिकारी व सदस्य डॉ. अमित उटीकर, व्यंकट येलाले, डॉ. रविभूषण कासले, डॉ. सुधीर बनशेळकीकर, डॉ. अभय ढगे, डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. गणेश पोतदार यांनी परिश्रम घेतले.